आधुनिक भारतनिर्मितीचे प्रमुख नेते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर'
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती स्वातंत्र्य समता सामाजिक न्यायावर आधारित नव समाज निर्माण व्हावा तसेच राजकीय स्वातंत्र्यलढ्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्य लढयाला प्राधान्य दिले जावे कारण एक वेळ स्वातंत्र्य मिळणे सोपे आहे परंतु अस्पृश्यांची गुलामगिरीतून मुक्तता करणे हजारपटीने कठीण आहे. अस्पृश्यता उद्धार देशाच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचा होताच परंतु मानवतेच्या दृष्टीने देखील त्याचे महत्त्व जास्त असल्याने त्यांनी मानव मुक्तीच्या लढ्याला प्राधान्य दिले परकीय राजवटीतून तुम्ही जसे मुक्त होऊ पाहतात तसे स्वदेश बांधवांना सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा म्हणजे तेही तुमच्याबरोबर स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतील अशी त्यांची भूमिका होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक ग्रंथाला भाषणाला त्यातील निष्कर्षांना त्याकाळच्या विशिष्ट परिस्थितीचा संदर्भ आहे हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे त्यांचे हे लिखाण म्हणजे नुसते ज्ञान साहित्य नसून प्रबोधक व विशिष्ट ध्येयवादाने लिहिलेले प्रबोधक साहित्य आहे. समाज बदलला पाहिजे सामाजिक क्रांती झाली पाहिजे दलितोद्धार झाला पाहिजे त्यासाठी लोकांना प्रेरित केले पाहिजे, हा समाज परिवर्तनाचा समाज प्रबोधनाचा नवा इतिहास घडवण्याचा विचार प्रत्येक लेखन कृती मागे आहे. त्याचे सारे जीवनच दलित समाजाच्या उपेक्षित समाजाच्या आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी वाहीलेले होते त्यांची सारी तळमळ व प्रत्यक्ष शब्द परिवर्तनासाठी वाहिलेले होते. इतिहास लेखन इतिहास मिमांसा,धर्मचिकित्सा व ग्रंथ लेखन मानवाच्या उद्धारासाठीच होते. आपल्या सामाजिक क्रांतीच्या प्रेरक म्हणूनच त्यांनी इतिहास लेखन केलेले आहे. ज्यांना समाज घडवायचा असतो राष्ट्र घडवायचे असते क्रांती करायची असते त्यासाठी जनतेला उदयुक्त,प्रेरित,संघटित व कार्यान्वित करायचे असते ते इतिहासाचा आपल्या ध्येयासाठी उपयोग करून घेतच असतात बाबासाहेबांचे कार्य अशा इतिहास घडवणाऱ्या महापुरुषांचे होते केवळ पुराव्याचा कीस पाडीत काटेकोर तराजू घेऊन इतिहास संशोधन करून इतिहास लिहिणाऱ्या इतिहासकाराचे नव्हते.
डॉ.बाबासाहेब सातत्याने आपली भूमिका स्पष्ट करताना प्रथम मी भारतीय आहे हा विचार ठामपणे मांडत आले. आपण सारे एकाच समाजाचे घटक आहोत. एकाच भारतीय संस्कृतीचे वारसदार आहोत. हा विचार त्यांनी सातत्याने मांडला आहे. डॉ बाबासाहेबांची एकूण जीवनगाथा म्हणजे एक महाकाव्य व महानाट्य आहे. राष्ट्रनिष्ठेचे एक जाज्वल्य उत्तुंग उदाहरण आहे.डॉ. बाबासाहेबांनी आपल्या 65 वर्षाच्या जीवनात भारताच्या सर्वांगीण समतोल विकासासाठी जे बहुमोल योगदान दिले त्याला तोड नाही स्वातंत्र्य भारताच्या संबंधित असलेले सर्व प्रश्न आणि समस्या याचा सर्वसामावेशक विस्तृत खोलवर आणि गंभीरपणे विचार केला तसा आधुनिक भारताच्या राजकीय व सामाजिक इतिहासात फारच कमी जणांनी केल्याचे आपल्याला दिसून येईल जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेचे उच्चाटन करून भारत हा एकसंघ, आधुनिक आणि सामर्थ्याशाली निर्माण करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न होते. नवभारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार लोकशाहीचे त्राते मानवी स्वातंत्र्याचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र हे आधुनिक भारताच्या मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासाचे सोनेरी पर्व असून स्वतःच्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहून जो तपश्चर्याने अलौकिक धैर्यानी अखंड उद्योगशीलतेने उच्च ध्येयासाठी अविरत झगडतो तो उतुंग शिखरावर जाऊन कसा विराजमान होतो हे सिद्ध करणारे जगातील सर्व तरुणांना प्रेरणा देणारे एवढे मोठे महापुरुष अन्यत्र सापडणे कठीण आहे विद्या,शील आणि राष्ट्र या तीन निकशावर घासूनच आदर्श जीवन समोर ठेवणारे बाबासाहेब आजच्या तरुणा समोर सर्वोत्तम आदर्श आहेत.
अमरावतीच्या अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रहासाठीच्या सभेच्या अध्यक्षपदावरून डॉ. बाबासाहेब निग्रहाने ठणकावतात हिंदुत्व ही फक्त स्पृश्यांची जहागिरी नव्हे. ती जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच अस्पृश्यांचे आहे हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वशिष्ठा सारख्या ब्राह्मणाने,कृष्णा सारख्या क्षत्रियाने, हर्षा सारख्या वैशाने,तुकाराम व नामदेव सारख्या शूद्रांनी केली तितकीच किंवा त्यापेक्षा जास्त व्यास, वाल्मिकी,चोखामेळा व रोहिदास इत्यादी अस्पृश्याने ही केलेली आहे या हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी हजारो अस्पृश्याने आपली माणुसकी आपले प्राण खर्च घातले आहेत ज्या हिंदुत्वची रास स्पृश्य व अस्पृश्य या उभयांताने मुठ मुठ टाकून वाढवली त्या हिंदुत्वाच्या नावाखाली उभारलेले मंदिरे जितकी स्पृश्यांची तितकीच अस्पृश्यांची आहेत त्यावर जितका स्पृश्यांची तितकाच अस्पृश्यांचा वारसा व हक्क आहे. आजच्या पिढीने बाबासाहेबांच्या विचारांना स्विकारून सर्व समाजाला मंदिर प्रवेश स्मशानभूमी प्रवेश व पानवट्यांना प्रवेश दिले पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष कृतीयुक्त ठरतील आणि सामाजिक समता व बंधुता प्रवर्धित होईल.
पुण्यातील विद्यार्थी संमेलनात युवकांसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले, "माझ्या तरुण मित्रांनो तुम्हा सर्वांना पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. आज तुम्हाला माझ्या आयुष्याचे एक गुपित सांगतो. तुम्ही खूप शिका, पण विद्येबरोबरच आमच्यातील शील आवश्यक आहे. शिलाशिवाय विद्या फुकाची आहे. युवका जवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान नसेल तर तोच युवक विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील. शिलाशिवाय युवक निपजू लागले तर त्यांच्यामुळे क्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे.
बाबासाहेबांनी दलितांबरोबरच या देशातील प्रत्येक शोषित माणसाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. म्हणून बाबासाहेब केवळ दलितांचेच नव्हे, तर आधुनिक भारताच्या निर्मितीचे प्रमुख राष्ट्रीय नेते आहेत.
पण आपल्या समाज व्यवस्थेने बाबासाहेबांना कुठेतरी जातीच्या चौकटीत बसवण्याचा करंटेपणा केलेला दिसतो. बाबासाहेबांनी सातत्याने एकात्म भारताचा पुरस्कार केला. बाबासाहेब प्रखर राष्ट्रभक्त होते. भारतीय संघराज्यात विलीन न होता स्वतंत्र राहू पाहणाऱ्या हैदराबादच्या निजामाविरुद्ध भूमिका घेताना त्यांची राष्ट्रभक्ती प्रखरपणे जाणवते. तसेच काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे, यास्तव ३७० कलमाला बाबासाहेबांचा कठोर विरोध होता. आज ३७० कलम रद्द केले आहे, पण त्याचे सर्वात मोठे श्रेय बाबासाहेबांचे आहे. कारण घटनेमध्ये केवळ तात्पुरत्या स्वरूपाची योजना अशा पद्धतीने ३७० कलमला ठेवले होते, म्हणून आज भारत अखंड राहण्याच्या दृष्टिकोनातून काश्मीर आपल्याशी जोडला गेला.
कोणत्याही राष्ट्राच्या दृष्टीने 'समान संस्कृती आणि समान इतिहास' हा त्याच्या एकतेचा गाभा असतो. 'भिन्न संस्कृती भिन्न इतिहास' असलेले राष्ट्रीय धर्म जो पुढे भविष्यात देशाच्या एकतेला धोका होईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनवतील असा धर्म मी केव्हाच स्वीकार करणार नाही. कारण या देशाच्या इतिहासात स्वतःला विध्वंसक म्हणून घेण्याची माझी इच्छा नाही. म्हणजेच बाबासाहेबांनी अतिशय सखोल चिंतन करून या देशातीलच संस्कृती इतिहास आणि परंपरा यांच्याशी सुसंगत असणाऱ्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
अस्पृश्योद्धार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचे ध्येय असले तरी त्यांनी राष्ट्रीय हिताकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रनिष्ठा जोपासली देशाच्या इतिहासात आपली आणि आपल्या अनुयायांची अराष्ट्रीय अशी नोंद होऊ नये, म्हणून सतत काळजी घेतली. मी खरा देशभक्त आहे, स्वातंत्र्य चळवळीतील कोणत्याही मोठ्या नेत्यांपेक्षा माजी राष्ट्रनिष्ठा अधिक आहे, असे ते नेहमी म्हणत असत. त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचे साक्ष देणारी अनेक प्रसंग सांगता येतात.
बाबासाहेब महात्मा गांधींना म्हणाले होते की आपले अस्पृश्यता विषयावरती मतभेद असतील परंतु वेळ आलीच तेव्हा आपल्या राष्ट्राला नुकसान होईल अशी भूमिका माझ्याकडून घेतली जाणार नाही. आज बौद्ध धम्म स्वीकार करून मी देशाचे अधिकाधिक हित साध्य करीत आहे. कारण बौद्ध धम्म हा मूळ भारतीय धम्म आहे. भारतीय संस्कृतीतूनच उपजत हा धर्म आहे. या देशाच्या इतिहास व संस्कृतीला काही आघात होणार नाही याची काळजी मी घेतली आहे, असे ते स्पष्टपणे सांगत.
हैदराबाद संस्थानात तेथील जनतेने निजामाविरुद्ध लढा पुकारला त्यावेळी तेथील रजाकरी सेनेने अस्पृश्य जनतेवर अन्याय अत्याचार केले. त्यांची घरेदारे उद्ध्वस्त केली. त्यासंबंधी डॉ.बाबासाहेब यांनी सर्व समाजाला अवाहन केल, कोणत्याही परिस्थितीत कितीही संकटे आली तरी निजामाला साथ देता कामा नये आणि या पद्धतीने त्यांनी अतिशय प्रखरपणे आपली राष्ट्रीय भूमिका मांडली.
डॉ.आंबेडकरांचा कम्युनिस्टाच्या सर्वकष हुकुमशाहीच्या तीव्र विरोध होते. ते म्हणतात हुकुमशाही संसदीय लोकशाही आणि स्वातंत्र्य याचा अभाव असतो. संसदीय लोकशाहीत नागरिकापाशी अधिकार आणि कर्तव्य दोन्ही असतात ,पण हुकूमशाही नागरिकापाशी केवळ आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी असते. तक्रार करण्याचा कोणताही अधिकार असत नाही. बाबासाहेबांना रक्तरंजित क्रांतीसाठी लोकशाहीत कोणतेही स्थान नको होते. तसेच राजकारणातील व्यक्ती पूजेला विरोध होता. राजकीय जीवनात समानता आणि सामाजिक आर्थिक जीवनात असमानता अशी स्थिती होऊ नये यासाठी बाबासाहेब सजग होते एका बाजूने समानता आणि दुसऱ्या बाजूने असमानता अशा ढोंगाने लोकशाही धोक्यात येईल अशा पद्धतीने त्यांचे परखड मत होते.
'राष्ट्रवाद' म्हणजे काय या सर्वात मूलभूत तत्त्वाला बाबासाहेबांनी आपल्या जीवनाशी जोडलेले आहे.त्यांच्या भाषण व ग्रंथातुन पाहण्यास मिळते.राष्ट्रीयत्व ही सामाजिक भावना आहे ही एकाकीपणाची सामूहिक भावना आहे. ज्यांच्या मनात ही भावना निर्माण होते त्यांच्यात बंधुत्वाचे भावना नक्कीच निर्माण होते. आणि बंधुभाव निर्माण झाल्याशिवाय समता निर्माण होणार नाही, त्यासाठी बंधुत्वाच्या नात्याने सर्व समाज जोडला पाहिजे आणि त्यासाठी सर्व समाजाने आणि समाजातील नेत्याने पुढाकार घेऊन सर्व समाजाप्रती बंधुत्वाची नाळ जोडली गेली पाहिजे तरच भारत प्रगती करु शकेल यावर बाबासाहेब ठाम होते.
आजच्या नव्या पिढीसमोर बाबासाहेब आंबेडकर आदर्श असले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनाचा त्यांच्या विचारांचा डोळे उघडे ठेवून अभ्यास केला पाहिजे. मी जाणीवपूर्वक असे म्हणेल की डोळे उघडे ठेवूनच बाबासाहेबांचा जीवनाचा व त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेणे एवढे सोपे नाही. ते ज्ञानाचा अथांग महासागर आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या असंख्य लाटा प्रकट होत होत्या. माझ्या लोकांना अन्यायाच्या गर्तेतून बाहेर काढायचे हे त्यांच्या जीवनाचे लक्ष होते, परंतु लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना राष्ट्रहिताला थोडा ही धक्का लागणार नाही याचे भान त्यांनी ठेवले.
डॉ.बाबासाहेबांच्या ठाई ज्ञानसंपादन करण्याची अनिवार्य इच्छा होती जगात काहीतरी महत्तम कार्य करावे अशी त्यांची अबोल महत्त्वकांक्षा होती. ज्ञानासाठी त्यांचे मन आसुसलेले असायचे लंडनमध्ये शिकत असताना त्यांनी अतोनात हालापेष्ठा सहन केल्या परंतु शिक्षणाचा मार्ग सातत्याने चालत राहिले त्यांनी जगातील ज्ञानाचे अलौकिक असे एक नवीन विद्यापीठ निर्माण केले बाबासाहेबांनी दलिता बरोबरच या देशातील प्रत्येक शोषित,वंचित व सामान्य माणसाला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला म्हणून बाबासाहेब केवळ दलितांचेच नव्हे तर आधुनिक भारताच्या निर्मितीचे प्रमुख राष्ट्रीय नेते ठरतात पण आपल्या समाज व्यवस्थेने बाबासाहेबांना जातीच्या चौकटीत बसून त्यांना केवळ दलितांचेच नेते ठरवले यासारखे दुसरा करंटेपण नाही डॉ. बाबासाहेबांनी सातत्याने एकात्म भारताचा पुरस्कार केला बाबासाहेब प्रखर राष्ट्रभक्त होते. भारतीय संघराज्यात विलीन न होता स्वतंत्र राहू पाहणाऱ्या हैदराबादच्या निजामाविरुद्ध भूमिक घेताना निजाम हा भारताचाच नव्हे तर अस्पृश्यांचाही शत्रू असल्यामुळे दलित समाजाने त्याला साथ देऊ नये असे म्हटले होते तसेच हैदराबाद संस्थान मुक्त करणाऱ्या पोलीस कारवाईतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
डॉ.बाबासाहेब हे समस्त समाजाच्या नेतृत्वाची जबाबदारी जन्मसिद्ध कर्तव्य म्हणून त्यांच्यावर येऊन पडली होती. देशातील दलित समाजाच्या अस्मिता जागृत करण्यासाठी बाबासाहेबाच्या कार्याचा सर्वत्र विलक्षण परिणाम झाला हे अस्मिता जागे करण्याचे काम बाबासाहेबांनी या देशातील लोकशाहीला राष्ट्रवादाला आणि या देशाच्या अस्मितेला कोणताही धक्का लागू न देता ज्या सामर्थ्याने पार पडलेला आहे त्याचा अंदाज घेतल्यानंतर कोणत्याही प्रामाणिक देशभक्ताची मान नम्रतेने खाली वाकेल 'मी प्रथम भारतीय व अंतिमताही भारतीयच आहे" या बाबासाहेबांच्या विचाराने भारताची एकात्मता व अखंडता कायम राहील अशी भूमिका प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे.हेच खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिना निमित्त आहे.
प्रा.डॉ.सोमीनाथ सारंगधर खाडे
जालना,८२७५५१५९३८.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या