नागपूर। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरांच्या धर्मांतर सोहळ्याची जबाबदारी सांभाळणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. यावेळी देशभरातून अनेक नेत्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी फुलझेले यांना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही पत्र लिहून सदानंद फुलझेले यांच्यासोबतच्या आपल्या स्मृती जिवंत केल्या. भावपूर्ण शब्दात त्यांनीही फुलझेले यांच्याप्रति शोकसंदेशाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या पत्रात म्हंटले, "बुद्धवासी श्री सदानंदजी फुलझेले यांची माझी प्रत्यक्ष भेट दोनदाच झाली असून विद्यार्थी दशेपासून नागपूर येथे त्यांच्या सार्वजनिक जीवनाच्या कर्तृवाचा व कीर्तीचा सौजन्यपूर्वक संपर्क व समन्वय राखून ठेवणारे रिपब्लिकन चळवळीचे ते आदर्श कार्यकर्ता होते. नागपुरातल्या पवित्र दिक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. दीक्षाभूमीचे विस्ताराने व भावसाहित दर्शन मला त्यांच्यामुळेच घडले आहे." याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. "त्यांच्या जाण्याने केवळ रिपब्लिकन चळवळीचेच नव्हे तर देशाच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला माझी व्यक्तिगत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे श्रध्दांजली अर्पण करतो." अश्या शब्दात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सदानंद फुलझेले यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. मोहन भागवत सध्या बंगळुरू येथे असल्याने त्यांनी एका पत्राद्वारे आपला शोकसंदेश पाठविला होता.
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नागपूर महानगराचे संघचालक श्री राजेश लोया, महानगर कार्यवाह श्री अरविंद कुकडे, सहकार्यवाह श्री रविंद्र बोकारे यांनी श्री. सदानंदजी फुलझेले यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या सुपुत्राला पूजनीय सरसंघचालकांचा शोकसंदेश त्यांनी दिला. यावेळी श्री. फुलझेले यांचे कुटुम्बिय, स्मारक समितीचे श्री. विलास गजघाटे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या