"रक्तदानाशी कोरोनाचा संबंध नाही, रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवा" असे आवाहन करण्यात आले आहे

"रक्तदानाशी कोरोनाचा संबंध नाही, रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवा"... राज्य रक्त संक्रमण परोषदेचे आवाहन

मुंबई । देशभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्यावर प्रतिबंध घालण्याचे पुरेपूर प्रयत्न सरकार करत आहे. जनजागृती व अनेक खबरदारीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तथापि, देशासह राज्यात कोरोनाच्या धास्तीमुळे रक्तदान करण्यास दाते कचरत असल्याचे दिसून येत असल्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने जनतेस रक्तदान करण्याचे टाळू नका, रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी रक्तदान करा. रक्त संक्रमणामुळे किंवा रक्तदान केल्यामुळे कोरोना विषाणूची लागण होत नाही असे अनेक तज्ज्ञांचे मत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. 


कोरोना विषाणूचा प्रसार हळूहळू वाढत असला तरी उपाययोजना व प्रशासन सांगत असलेली खबरदारी घेतली तर त्याचा नायनाट होऊ शकतो असे अनेक अभ्यासक मत व्यक्त करत आहेत. तथापि, कोरोनाच्या भीतीमुळे संक्रमण जाऊ नये म्हणून लोक रक्तदान करणेही टाळू लागल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्तांसाठी, थॅलेसेमिया व हिमोफिलिया सारख्या आजारांसाठी रक्ताची नितांत आवश्यकता आजही भासत आहे. या रुग्णांना रक्त मिळाले नाही तर त्यांचाही जीव जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे रक्ताला पर्याय नाही, कोरोना रक्तामार्फत संक्रमित होत नाही असे सांगून सामाजिक, धार्मिक स्वयंसेवी संस्थांनी गर्दीचे नीट व्यवस्थापन करून रक्तदान शिबिर आयोजित करून जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याचे आवाहन परिषदेने केले आहे. 


राज्यात दर दिवसाला 4500 ते 5000 एवढ्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. त्यामुळे रक्त न मिळाल्यास मोठ्या संख्येने रुग्ण दगावण्याची शक्यता वाढली आहे. रक्तदान करणाऱ्या दात्यांची लक्षणे पाहून, त्यांच्या प्रवासाचा इतिहास लक्षात घेऊन व सुरक्षा व स्वच्छतेचे पालन करण्याच्या सूचनाही परिषदेतर्फे देण्यात आल्या आहेत.  त्यामुळे गरजू रुग्णांचे प्राण वाचवून कोरोनाच्या लढाईसोबत रक्तदानाचेही आव्हान स्वीकारूया असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केलं आहे. 

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या