बंगळुरू। रा. स्व. संघाची दरवर्षी होणाऱ्या सर्वात महत्वाची बैठक म्हणजेच अखिल भारतीय प्रतिनिधी सभा येत्या १५ ते १७ मार्च दरम्यान बंगळुरू शहरात पार पडणार आहे. या ठिकाणी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मोठी खबरदारी घेतली जात असून आयोजकांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठी तयारी केलेली दिसून येत आहे.
बंगळुरू शहरातील जनसेवा विद्या केंद्र, चननहल्ली येथे संघाची ही अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वीपासूनच मोठी दक्षता घेतली जात असून व्यापक सुरक्षा व स्वच्छता ठेवण्यात आली आहे. परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व वस्तूची स्क्रीनिंग टेस्ट करण्यात येत असून यासाठी मेडिकल टीम सज्ज झाली आहे.
अरुण कुमार बंगळुरू येथे १५ ते १७ मार्च दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीअगोदर माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा संघाविषयी निर्णय घेणारा सर्वोच्च विभाग असून अश्या प्रकारची दरवर्षी बैठक होत असते, तर प्रति तीन वर्षानंतर सरकार्यवाह निवडीसाठी ही बैठक नागपुरात आयोजित होते असे त्यांनी सांगितले. बंगळुरू येथे होणाऱ्या प्रतिनिधीक सभेचे उदघाटन १५ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता होईल अशी माहिती त्यांनी दिली.
बंगळुरू येथील सभेत मागील वर्षभराच्या कार्यासह आगामी वर्षभारताच्या कामाचे नियोजन करण्यात येते. यासोबतच विविध प्रांत व विभागातून आलेले प्रतिनिधी आपणास आलेले अनुभव व कार्यवृत्तांत सादर करतात. १४ मार्च रोजी अखिल भारतीय कार्यकारी बैठक होईल, ज्यामध्ये प्रतिनिधी सभेतील विषय व बैठकीचा अजेंडा ठरविण्यात येईल. कार्यकारी मंडळात प्रांत व क्षेत्र स्तरावरील मा. संघचालक, कार्यवाह, प्रचारक आणि अखिल भारतीय कार्यकर्ता उपस्थित राहतील. या बैठकीत आगामी वर्षातील संघ शिक्षा वर्ग व अन्य कार्यक्रमाशी संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
0 टिप्पण्या