श्रीरामनवमी विशेष--
'लक्ष्मणरेषा' हा शब्द आपल्या समाजव्यवस्थेत आणि वाङ्मयात सुद्धा अतिशय प्रचलित असा आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल जेव्हा मर्यादा पाळणे अपेक्षित असते तेव्हा लक्ष्मणरेषा पाळणे अपेक्षित असते. तेव्हा लक्ष्मणरेषा ओलांडू नको असे साधारणपणे म्हटले जाते. काय आहे ही लक्ष्मणरेषा? लक्ष्मणरेषा म्हणजे मर्यादा......!
लक्ष्मणरेषा म्हणजे आपणच स्वतःभोवती निर्माण केलेली एक विशिष्ट कक्षा.....!
आज या शब्दाचं विशेष चिंतन करण्याचं कारण असं की, आपण सध्या कोरोना या विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने ग्रस्त आहोत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला एकवीस दिवसपर्यंत घरामध्ये राहायला सांगितले आहे. त्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कोरोना हा विषाणू संसर्गजन्य असल्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी आपण सगळ्यांनी घरात राहणे आवश्यक आहे. एक विशिष्ट संयमपूर्ण मर्यादा पाळण्याचे नाव आहे लक्ष्मणरेषा.....!रामायणाच्या संदर्भात असं सांगितलं जातं, रावणाने छद्मी वेषाने सीता मातेचे हरण करण्याचा प्रयत्न केला आणि स्वर्ण मृग झालेल्या मारीचाने "धाव लक्ष्मणा... धाव... धाव" चा आर्त पुकारा केला, तेव्हा सीतामाईने लक्ष्मणाला "रामाच्या संरक्षणासाठी जा..." असे सांगितले.
मूळ रामायणामध्ये लक्ष्मणजी महाराज म्हणतात, भगवती सीते श्रीराम स्वतः मर्यादा पुरुषोत्तम व रणधीर असल्यामुळे ते या छद्मपाद जीवांपासून स्वतःचे रक्षण करण्यास संपूर्ण समर्थ आहेत. तरीही सीतामाईनी ऐकलं नाही आणि लक्ष्मणाला त्यांच्या रक्षणासाठी जाण्यास सांगितले. तेव्हा एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर न जाता तू स्वतःला तिथे गृहबंदी बनवून घे, अशाच अर्थाचं लक्ष्मण त्यांना म्हणाले असावे. ती मर्यादा न पाळल्यामुळे सीतामाई बाहेर आल्या आणि ती मर्यादा न पाळल्यामुळे रावणाने त्यांचे अपहरण केले, ही कथा सर्वश्रुत आहे.
आपणही आपल्या वरती असलेल्या राष्ट्रीय जबाबदारीने आपली नागरिक म्हणून असलेली कर्तव्ये स्वेच्छेने पाळली पाहिजे आणि जर आपल्याला हे कळत नसेल तर आपल्यातला जो निरपेक्ष, बुद्धीमंत आणि आपल्या वरती प्रेम असणाऱ्या अशा माणसाने सांगितल्यानंतर ती पाळलीच पाहिजेत. आज दुर्दैवाने आपण हीच व स्वकर्तव्याची लक्ष्मणरेषा पाळत नाही आहोत असे लक्षात येते. आज इटली, स्पेन, अमेरिका यासारख्या अतिप्रगत, वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्ट्या संपन्न असलेल्या राष्ट्रात हजारो माणसे या रोगाने मेल्याचे आपण बघतो आहोत. ही संख्या लाखात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. श्रीरामरक्षा स्तोत्रामध्ये काही छद्मचारी अशा जीवांचा उल्लेख केलेला आहे आज आपल्याच बरोबर राहून, आपल्या देशातलं खाऊन या कोरोना व्हायरसचे संक्रमण व्हावं, या अतिशय तुच्छ आणि घाणेरडया भावनेतून काही छद्मचारी जीव आपल्यातच वावरत आहेत. आपण त्यांच्यापासून दूर राहूया आणि या कोरोनाच्या संक्रमणापासूनही दुर राहूया....
अनेकदा नियोजित कार्यात लुडबूड न करणे हीच एक वेगळ्या प्रकारची मदत असते. अश्याप्रकारे या राष्ट्रीय कार्यामध्ये आपण प्रत्यक्ष मदत करू शकत नसू तर निदान स्वतःच्या घरामध्ये स्वतःला बंदिस्त करून आपण या कार्यामध्ये मदतगार सिद्ध होऊ शकतो. या छद्म वेशी जीवांचा संहार करण्यासाठी आपल्यातली एकजूट, आपल्यातली विज्ञान प्रियता, आपल्यातला संयम, आपल्यातलं आत्मसंयमन या गुणांचा आपल्याला खूप उपयोग होईल.
श्रीराम हे मर्यादापुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत, सर्व प्रकारच्या मर्यादा पाळूनही उत्तम पुरुष कसं होता येतं, हे भगवान श्रीरामचंद्राच्या चरित्रातून आपल्याला शिकायला मिळतं. परमात्मा श्री रामचंद्रांचा हा संयम व मर्यादा पालनाची ही कर्तव्य तत्परता आपणही आपल्या जीवनामध्ये अंगिकारण्याचा प्रयत्न करून या राष्ट्रीय संकटाला, या वैश्विक संकटाला... नव्हे नव्हे... तर मानवतेवर आलेल्या या एका वेगळ्या क्रूर आपत्तीला दूर सारून त्याचे निवारण करू शकू...
आणखी दोन आठवडे १५ दिवस हा संयम पाळूया... स्वतः जगुया आणि इतरांनाही जगण्याचा आनंद देऊया...
भारतीय संस्कृती म्हणते "आनंदात इमानी भूतानि जायंते". ज्ञानेश्वर माऊली म्हणतात "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक" हा संसार सुखाचा करायचा आहे. तिन्ही लोक आनंदाने भरायचे आहे. पण हे सगळं केव्हा होणार आहे. जेव्हा आपण सर्व प्रकारचा संयम पाळून स्वतःला सुरक्षित ठेवू आणि मग येणाऱ्या उज्वल, ऊर्जस्वल अशा भविष्यकाळासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध होऊ. या राष्ट्रमातेला विश्वगुरू बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सारे संयमाचे हत्यार उपसून कोरोना नावाच्या छद्मचारी राक्षसाला मारूया आणि खऱ्या अर्थाने रामनवमी साजरी करूया. अशाप्रकारे रामनवमी साजरी करण्याचे धैर्य मर्यादापुरुषोत्तम परमात्मा श्रीराम तुम्हा आम्हा सर्वांना देवो.....! हीच त्यांच्या जन्मदिनी म्हणजे श्रीराम नवमीच्या दिवशी त्यांच्या चरणी प्रार्थना....!धन्यवाद.....!
शुभाकांक्षी,
- राष्ट्रीय कीर्तनकार, भागवताचार्य,
ह.भ.प. योगेश्वर महाराज उपासनी,
समर्थ नगर,अमळनेर
9422284666
7972002870
Published by - VSK_Devgiri
0 टिप्पण्या