संभाजीनगर। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती येत्या 14 एप्रिल रोजी मंगळवारी साजरी होणार आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती असताना सर्व बंधू भगिनींनी ही जयंती आपल्या घरात राहूनच 'अध्ययन दिन' म्हणून साजरी करावी असे सामाजिक समरसता मंचाने आवाहन केले आहे. यासाठी सामाजिक विषयाशी संबंधित कोणत्याही पुस्तकाचे वाचन करावे असेही त्यांनी म्हंटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांनी कश्याकश्याचा अभ्यास केला हे म्हणण्यापेक्षा त्यांनी कश्याचा अभ्यास केला नाही हे विचारले जावे, इतकी त्यांची महानता. सर्व धर्माच्या धर्मग्रंथ व संस्कृतिचा त्यांचा अभ्यास होता. गीतेतील श्लोक तोंडपाठ होती. तुकोबांच्या गाथेतील अभंग त्यांचे मुखोद्गत होते. हिंदू धर्मग्रंथांप्रमाणे त्यांनी इस्लाम व ख्रिश्चन धर्म ग्रंथांचा अभ्यास केलेला होता. भगवान गौतम बुद्धांचे विचार तर त्यांच्या आचरणातच होते.
डॉ. आंबेडकरांनी अर्थशास्त्र विषयात एम ए, पीएचडीचे उच्च शिक्षण घेतले, लंडन विद्यापिठातून डीएससी ही पदवी घेतली, मायदेशी परतल्यावर बॅरिस्टरही झाले. त्यामुळे बाबासाहेबांनी शिक्षणाला किती महत्व दिले होते हे आपल्याला कळू शकते. डॉ. बाबासाहेबांच्या या अंगभूत वैशिष्ट्यापासून आपणही अनुकरण केले तर त्यांना खरी मानवंदना ठरू शकेल. म्हणूनच सामाजिक समरसता मंचाने या जयंतीच्या दिवशी सामाजिक विषयाशी निगडित कोणत्याही पुस्तकाचे वाचन करावे आणि घरातच बाबासाहेबांच्या प्रतिमेचे किंवा त्यांच्या ग्रंथाचे सहकुटूंब पूजन करून त्याचे छायाचित्र आपल्या व्हाट्सअप प्रोफाइल पिक्चर म्हणून ठेवावे, ज्यामुळे सकारात्मक वातावरण निर्मिती होईल असे आवाहन केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'शिका' व 'संघर्ष' करा असा संदेश दिला होता. आजची कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यापासून आपण योग्य तो संदेश घेऊन भविष्यात असे महाभयंकर आजार निर्माणच होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या परिस्थितीतून आपण काय शिकणार आहोत, याचा विचारही केला पाहिजे. तसेच कोरोनारूपी संकटातून आपण लवकरच मुक्त होऊ अशी आशाही सामाजिक समरसता मंचाने व्यक्त केली आहे.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या