संभाजीनगर। देशासह जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोनाशी सरकार, पोलीस प्रशासन, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स यशस्वी लढत असताना संघ स्वयंसेवकांनीही मोठ्या प्रमाणात सेवाकार्य सुरू केलेले दिसून येत आहे. देवगिरी प्रांतामध्ये मागील 25 दिवसात तब्बल 2 लाख 68 हजार जणांना स्वयंसेवकांनी मदत देऊ केल्याचे नुकतेच समोर आले आहे. जळगांव, भुसावळ, धुळे, नंदुरबार, बीड, संभाजीनगर, परभणी, धाराशिव, हिंगोली, जालना, नांदेड, किनवट व लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
'कठीण समय येता संघ कामास येतो' याचा प्रत्यय आज पुन्हा येताना दिसत आहे. कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले आहे. देशातही सरकार, डॉक्टर्स, नर्स, पोलीस प्रशासन व अन्य कर्मचारी आपले कर्तव्य यशस्वीपणे बजावत आहे. इटली, अमेरिका, फ्रांस यासारखे प्रगत देशात आज हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यापासून धडा घेत देशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सारे भारतीय एकवटले आहेत. अश्या परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकही विविध सेवाकार्य राबवित आहेत.
संभाजीनगर शहरातील सेवा वस्ती भागात गरजूंना शिधा वाटप करण्यात आला.
अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक परिवार, माणसे, स्त्रिया, शिक्षणासाठी बाहेर पडलेले तरुण आपल्या घरादारापासून दूर अडकलेले आहेत. त्यांना भोजन व जीवनावश्यक वस्तू संघ स्वयंसेवकांनी पुरविल्या आहेत. रुग्णालयात व रस्त्याने पायपीट करणाऱ्या कुटुंबाना भोजन व फूड पाकीट संघ स्वयंसेवक पुरवीत आहेत. भुसावळजवळ असलेल्या कुर्हे पानाचे या गावाजवळ चोपड्याकडे निघालेल्या कुटुंबाला तेथील स्वयंसेवकांनी पोटभर जेवण दिलेच, शिवाय पुढे वाटेत कमी येईल असा आवश्यक शिधाही देऊ केला. जामनेरहून निघालेल्या स्वयंसेवकांना जळगांव येथील स्वयंसेवकांनीही अशीच मदत केली होती. या कुटुंबाना पुढे वाटेत लागणाऱ्या गावातील स्वयंसेवकांशी, नातेवाईकांशी संपर्क करून पुढील व्यवस्थाही लावून दिली.
भुसावळ येथील नागरिकांकडून गोळा केलेले किराणा सामान किट
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद सीमेवर नवनाथ समाजाचे लोक पायपीट करत जात असताना त्या सर्व 35 जणांना स्वयंसेवक व गावातील सज्जनांनी मिळून भोजन दिले. भुसावळ, चोपडा, जळगाव येथील स्वयंसेवकांनीही अशीच मदत केली. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात व चोपडा तालुक्यात वनवासी परिवारांना किराणा सामान व शिधा तसेच धान्य वाटप करण्यात आले. संभाजीनगर, पैठण, नांदेड, किनवट व लातूर जिल्ह्यात भटके विमुक्त समाजातील परिवारांना किमान 10 ते 12 दिवस पुरेल इतका शिधा व किराणा सामान देऊन मदत करण्यात आली.
14 एप्रिल पर्यंत केलेल्या कामाचे वृत्त हाती आले तेव्हा 2 लाख 78 हजार जणांना सेवा पोहचविण्यात आली आहे. ज्यामध्ये 2 लाख 3 हजार जणांना घरोघरी किंवा रुग्णालयात जाऊन फूड पॅकेट देण्यात आले. 13 हजारहुन अधिक ठिकाणी कोरोना संक्रमणपासून काळजी कशी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. 16 हजारहून अधिक ठिकाणी किरणा सामान किट वाटप केली आहे तर 2 हजारपेक्षा अधिक स्वयंसेवकांनी रक्तदान केले आहे. एवढेच काय, तर ठिकठिकाणी स्वास्थ्य सहायता केंद्र स्थपन केले असून वृद्ध सहायता व सोशल डिस्टनसिंग साठी रेखांकनही करण्यात आले आहे. बंदोबस्तावर असलेल पोलीस व स्वच्छता कर्मचारी यांना प्रांतात 11 हजारपेक्षा अधिक कप चहावाटप करण्यात आला आहे, तर 23 हजारांहून अधिक नागरिकांना मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले आहे.
रा. स्व. संघाचे असेच सेवाकार्य संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू असून दररोज कोट्यवधी लोकांची सेवा करण्यात संघ स्वयंसेवक कटिबद्ध झाले असल्याचे दिसून येत आहे. 23 मार्च रोजी लॉकडाऊन घोषित केल्यापासून देशभरात स्वयंसेवकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे समाज सढळ हाताने मदत करीत आहे. दाते आर्थिक किंवा वस्तूच्या स्वरूपात उत्स्फूर्तपणे मदत करत आहेत. ही मदत गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी स्वयंसेवक आपली चोख भूमिका बजावत आहे.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या