"सामाजिक समरसता निर्मिती, बंधूभाव व देशाच्या उन्नतीसाठी झोकून देणा-या लोकांचा समुह म्हणजे संघ"
....... भंते रावजी पिंडक
मानवाने मानवाच्या उन्नतीसाठी केलेले सेवाकार्य म्हणजे संघकार्य. येथे जातपात अजिबात पाळली जात नाही. संघामध्ये सर्वांना समाविष्ट करून घेण्यात येते. मैत्रीभाव आणि बंधूभाव हा संघाच्या कार्याचा गाभा आहे व हे मी स्वतः अनुभवले आहे असे सांगत नागपूर शहरातील भंतेजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी देशभरात सुरू केलेल्या कोरोना आपदा सेवकार्याचे कौतुक केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, सर्व व्यवहार ठप्प होवून लोकांना घरी बसावे लागले. हातावर कमवून पोट भरणा-यांची उपासमार होणार नाही याची काळजी घेण्यासाठी संघ पुढे सरसावला. नागपुरातच हजारो स्वयंसेवकांनी या मदतकार्यात स्वतःला झोकून दिले. ज्यांना कुणाचाही आधार नाही त्यांना संघाने आधार दिला. त्यांना साधारणतः पंधरा दिवस पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स तयार करून वेगवेगळ्या सेवावस्त्यांमध्ये वितरित करण्यासाठी स्वयंसेवक सिध्द झाले आहेत.
शहरातील अयोध्या भागाच्या उदय नगर व मानेवाडा परिसरात अनेक सेवा वस्त्या आहेत. तेथील अनेक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व किराणा सामानाच्या किट्सचे वाटप करावयाचे होते. स्वयंसेवकांनी आणलेल्या किट्सची संख्या बघता त्या कुठे ठेवाव्या हा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी अयोध्या भागातील काही कार्यकर्त्यांनी भंतेजींची भेट घेतली व विहार परिसरात किट्स ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. क्षणभर देखील विचार न करता भंतेजींनी ही विनंती मान्य केली व ताबडतोब विहार परिसरात किट्स जमा करून तेथून किट्स पुरविण्याचे सेवाकार्य सुरू झाले. स्वतः भंतेजी या कामावर देखरेख ठेवली हे विशेष.
दरम्यान भंतेजींशी झालेल्या चर्चेत संघ स्वयंसेवकांसारखी शिस्त मला अन्यत्र कुठेही दिसली नाही हे भंतेजींनी सांगितले. या सुरू असलेल्या सेवा कार्यातून मला काही मिळेल, याचा स्वयंसेवक विचार देखील करत नाही. मला सेवा करायची आहे हाच प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात भाव आहे. कुठे सेवाकार्य करायचे याची स्वयंसेवक इथे बसून चर्चा करतात, त्याची योजना तयार करतात, ज्यांना आवश्यक आहे त्यांना मदत मिळालीच पाहिजे या भावनेने ते त्या त्या भागात जावून निरिक्षण करतात व गरजूंपर्यंत मदत पोहचवितात. हे कार्य करतांना ते स्वतः जवळूनच खर्च करतात. स्वतःच्या खर्चानेच वाहनांमध्ये पेट्रोल भरतात व स्वतःच्या घरचे खावून ते वंचितांसाठी मदतकार्य चालवितात हे देखील भंतेजींनी आवर्जून सांगितले.
भंतेजींनी स्वयंसेवकांची त्यांच्या कौतुक करणाऱ्या शब्दांनी एक प्रकारे पाठ थोपटली आहे. अश्या अनेक संत महंत यांचे आशीर्वाद स्वयंसेवकांच्या पाठीशी आहेत. जिथे स्वार्थ नसतो तिथे साक्षात परमेश्वराचा अंश असतो असे म्हणतात. निस्वार्थी व निःपक्षपातीपणे सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांना त्याचमुळे यश येत असावे.
संघ स्वयंसेवकांनी देशभरात कोरोना आपदा सेवकार्या दरम्यान २४ एप्रिलपर्यंत ५५,७२५ स्थानी ३३ लाख ७५ हजार कुटुंबांना मदत पोहचवली आहे. प्रत्येक राज्यातील मिळून ३ लाखाहून अधिक स्वयंसेवक या सेवाकार्यात सहभागी झाले आहेत. ७७ हजारहून अधिक भटके विमुक्त कुटुंबांना या सेवकार्याअंतर्गत मदत झाली आहे, तर तब्बल २ कोटी ८५ लाख भोजन पॅकेट संपूर्ण देशभरात वितरित झाले आहेत. जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव संपत नाही व देश पुन्हा सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत हे सेवाकार्य अखंडपणे सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सौजन्य - विश्व संवाद केंद्र, नागपूर
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
2 टिप्पण्या
बौद्ध आणि हिंदू वेगळे नसून ते एकच आहेत. फक्त स्वार्थी मंडळी तेव्हढी वेगळेपणाचा अभास निर्माण करत असतात. हे असले लेख आणि घटना समाजासमोर सतत आल्या पाहिजे जेणेकरून स्वार्थी आणि दांभिक मंडळींना चाप बसेल. . .