संभाजीनगर। घरातील स्त्रीचे जे अधिकार आहेत ते पुरुषाचे कर्तव्य असून जे पुरुषाची अधिकार आहेत ते स्त्रीचे कर्तव्य आहेत. भारतीय धर्म व्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था आपल्या घराकडे लॉजिंग, बोर्डिंग म्हणून न बघता आपल्या घराकडे आश्रम म्हणून पाहते. त्यामुळे भारतीय कुटुंब पद्धती ही सहजीवन शिकवते असे मा. सुनीलाताई सोवनी (अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, राष्ट्र सेविका समिती) यांनी देवगिरी विश्व संवाद केंद्र आयोजित वेब संवाद मध्ये सांगितले. "भारतीय स्त्री - कुटुंबाचा आधार" या विषया अंतर्गत त्या बोलत होत्या.
भगवती सीता - कर्तव्यपूर्ती करणारी गृहिणी
मा. सुनीलाताई यांनी आपल्या विषयाला सुरुवात करताना भगवती सीतेचे उदाहरण दिले. सीतेच्या आयुष्याकडे पाहिल्यास असं लक्षात येतं, की सीतेने वनवासात असतानासुद्धा गृहिणी म्हणून कर्तव्य बजावले. गृहिणीने कसं असावं याचा वस्तुपाठ सीतेने शिकवला. वनात जाताना राम एकटा पडू नये म्हणून सीता स्वतः हट्ट करते, लंकेत रावणाला आपल्या तेजाने जवळ फिरकुही देत नाही. अयोध्येत परत आल्यानंतर लोकांनी चारित्र्यावर शंका घेतल्यावरही तिने न डगमगता अग्निपरीक्षा दिली. आपल्या माहेरी जाण्याचे किंवा भांडून अयोद्धेतच राहण्याचे किंवा त्याचवेळी भू- मातेच्या स्वाधीन होण्याचे पर्याय असतानाही तिने कर्तव्य म्हणून वनात जाणे पुन्हा पसंत केले व पुढे लव-कुश यांना जन्म देऊन त्यांचे यशस्वी संगोपन केले. त्याचप्रमाणे रावण धर्म मार्गावर राहावा म्हणून मंदोदरीने प्रयत्न केलेले दिसून येतात. द्रौपदीने आपल्या पाचही नवऱ्यांचे पौरुषत्व जागृत ठेवले व त्यांना धर्मयुद्धाला भाग पाडले. यावरून गृहिणीने आपले कर्तव्य वेळोवेळी पार पाडल्याचे त्यांनी समजावून सांगितले.
समाजासाठी सत्पुरुष घडवणारी भारतीय स्त्री :
समाजाला सत्पुरुष लाभावे म्हणून भारतीय स्त्रीने आपले कर्तव्य बजावले आहे. भगवान बौद्धांच्या सावत्र आईने स्त्रियांनाही सन्यास घेण्याची व्यवस्था असावी असा आग्रह केला, जो नंतर भगवान बुद्धांनी मान्य केला. इ. स. पूर्व 250 वर्षपूर्वी नागणिका या साम्राज्ञीने आपल्या राज्याचे नेतृत्व केलेच शिवाय आपल्या पुत्राला तिने चक्रवर्ती सम्राट केल्याचे दिसून येते. जिजाऊ मासाहेबांनी आपल्या शिवबावर असेच संस्कार केले ज्यामुळे त्यांचे आज जगात नाव उज्वल झाले आहे. यावरून भारतीय स्त्रीने आपल्या पुत्रांना अशी शिकवण दिली आहे की त्यांचे जगाने नाव काढले आहे, असे त्यांनी सांगितले.
घरासाठी कष्ट कसे घ्यावे, मुलांबरोबर सर्वांचे पोषण कोणत्या सात्विक पद्धतीने व्हावे, दिनचर्या कशी असावी, सेवा म्हणजे काय, समत्व कसं असावं याचा वस्तुपाठ सामान्य स्त्री समत्वाच्या व सर्वांना स्नेहाने बांधून ठेवण्याच्या उद्देशाने करत असते. म्हणूनच भारतीय समाज स्त्रीकडे स्त्री शक्ती म्हणून नाही तर मातृशक्ती म्हणून पाहत असतो. स्त्रीच्या कर्तृत्वामुळे घराचे मंदिर होते. तसेच स्त्री अर्थार्जनाचा निगुतीने उपयोग करत असते, असेही सुनीलाताई यांनी सांगितले.
एकविसाव्या शतकातील स्त्री :
आजच्या एकविसाव्या शतकातील स्त्री बद्दल सांगताना सुनीलाताई सांगतात, की आज पारंपारिक कार्य विभागणी करून चालणार नाही. आजच्या स्त्रीला केवळ घरातच बांधून ठेवणे अशक्य आहे. तिला बाहेर केवळ अर्थार्जनासाठी जायचे नाही तर, बाहेरच्या सर्व गतीविधींशी आपला आत्मिक, बौद्धिक संबंध यावा असे तिला वाटते. स्त्री आणि पुरुषाने 'मी', 'माझं' असा विचार करण्यापेक्षा 'आपलं' म्हणून विचार केल्यास सहधर्मचारिणी म्हणून ते योग्य ठरेल. कुटुंबाकडे शक्ती म्हNऊन पाहिल्यास अनेक समस्यांचे निराकरण होऊ शकेल. भारतीय भाषा हक्क, संघर्ष, विवाह यावर आधारित नसून भारतीय भाषा सहजीवन, सहनाववतु अश्या विचारावर उभी आहे व यातूनच आपल्याला नवनवीन आदर्श उभे करायचे असल्याचे मा. सुनीलाताई सोवनी यांनी सांगितले.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://youtu.be/pQ6razxraKM
0 टिप्पण्या