बार्नेट। कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी संघ स्वयंसेवक देशभरात सेवाकार्य राबवित आहेत. गरजूंपर्यंत मदत पोहचवीत आहेत. संघाचे हे सेवाकार्य भारताप्रमाणे अन्य देशातही सुरू असून युकेस्थित बार्नेट शहरात संघ स्वयंसेवक करत असलेल्या सेवाकार्याचे कौतुक तेथील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या थेरेसा विलीयर्स यांनी केले आहे.
सेवाकार्य करताना एचएसएस कार्यकर्ते
युनायटेड किंगडमच्या बार्नेट शहरात हिंदू स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक लॉकडाऊन असल्यामुळे गरजू परिवारांना अन्न, धान्य, औषधी व अन्य जीवनावश्यक वस्तू पुरवीत आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक करताना कॉंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या थेरेसा विलीयर्स म्हणाल्या की, विशाल शाह व हिंदू स्वयंसेवक संघाच्या सहकाऱ्यांनी फूड पॅकेट वितरित करण्याची जी मोहीम सुरू केली ती फारच कौतुकास्पद आहे. एचएसएस ही हिंदू तरुणांनी सुरू केलेली एक चळवळ असून त्यांनी गरजू कुटुंबापर्यंत अन्न पोहचविण्याची जी सेवा सुरू केली आहे ती आश्चर्यकारक आहे. त्यांनी या कार्याबद्दल एचएसएस कार्यकर्ता विशाल, रॉबर्ट व हिंदू स्वयंसेवक संघाचे आभार मानले आहेत.
तेरेसा यांनी आपल्या दुसऱ्या एका फेसबुक पोस्ट मध्ये एचएसएस राबवित असलेल्या सेवाकार्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की हा व्हिडीओ हिंदू समाजातर्फे सुरू असलेल्या 'सेवा डे' या मोहिमेचा आहे. या मोहिमेत कोरोनाग्रस्त लोकांना व लॉकडाऊनमुळे समस्या असलेल्या लोकांना सेवा दिली जात आहे. सेवा या शब्दाचा अर्थ सांगताना त्यांनी 'सेवा' हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ दयाळूपणाने केलेले कार्य असून ते एक निस्वार्थी कार्य असल्याचे सांगितले आहे. थेरेसा यांनी केलेल्या कौतुकाबद्दल एचएसएस ने देखील त्यांचे आभार मानले आहेत.
हिंदू स्वयंसेवक संघ अर्थात एचएसएसतर्फे युकेतील 28 प्रांतात हे सेवाकार्य सुरू असून ज्यामध्ये 1400 पेक्षा अधिक स्वयंसेवक सहभागी आहेत. 24 गावस्थानी अन्नछत्र उभारले गेले आहेत. देशातल्या 36 मोठ्या रुग्णालयात स्वयंसेवकांतर्फे सेवा दिली जात आहे. "Everyday Sewaday" म्हणजेच प्रत्येक दिवस या घोषवाक्यसोबत हे सेवाकार्य अविरत सुरू असल्याचे दिसून येत आहे.
हिंदू स्वयंसेवक संघ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच एक शाखा असून विदेशात असलेल्या हिंदूंचे संघटन करून एचएसएसची स्थापना करण्यात आली आहे. जगातील 53 देशांमध्ये एचएसएस चे कार्य सुरू असून 1966 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती.
भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिशय व्यापक स्तरावर सेवाकार्य चालविले आहे. या अंतर्गत देशभरात 2 मे पर्यंत 67 हजार 336 स्थानी 50 लाख 48 हजाराहून अधिक परिवारांना संघ स्वयंसेवकांनी मदत पोहचवली आहे. या कार्यात तब्बल 3 लाख 42 हजारहून अधिक संघ कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत. संघाचे हे सेवाकार्य अमेरिका, जपान, इंग्लंड, युके, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, नायजेरिया, केनिया, युगांडा आदी देशातही सुरू आहे.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
------------------------------------------
Follow VSK devgiri
Facebook : www.facebook.com/devgirivsk/
Instagram :
https://instagram.com/vskdevgiri?igshid=13640n4dw8mtx
Twitter :
https://twitter.com/vskdevgiri?s=09
0 टिप्पण्या