स्मृतींची चाळता पाने (भाग १)

   "एक फोटो - शेकडो आठवणी"

        लॉकडाउनमुळे घरातल्या घरात काही ना काहीतरी करत असतो. काल माळयावरुन जुने चित्रांचे अल्बम काढले. माझ्या कै .वडिलांनी प्रयत्नपूर्वक जमविलेली आणि जपलेली असंख्य दुर्मिळ चित्रे त्यांनी अल्बमच्या रुपात ठेवली होती. वारसरुपाने हा बहुमोल ठेवा मी जपून ठेवला आहे. तर सांगायची गोष्ट अशी, की ही सारी चित्रे अगदी १९३० ते १९८० सालापर्यंतची आहेत. ही चित्रे बघता बघता एक चित्र फोटोच्या स्वरूपात माझ्या दृष्टीस पडले आणि मी क्षणभर दिग्मुढ झालो. त्या चित्राकडे पाहता पाहता मी एकदम पन्नास वर्षे मागे गेलो आणि स्मृतीला ताण देताच मला त्या काळात घडलेले सारे काही लख्ख आठवले.


        मी त्यावेळी साधारणतः बारा वर्षांचा असेन. आमच्या घराजवळ भरणाऱ्या विक्रमादित्य सायं शाखेचा मी शिशु असल्यापासून स्वयंसेवक होतो. त्या काळात केव्हातरी तत्कालीन सरसंघचालक पु. गोळवलकर गुरुजी अर्थात श्री गुरुजी यांचे जळगावला संघकार्याच्या निमीत्ताने आगमन झाले होते आणि दिवसभरातल्या भेटिगाठी, बैठका यांसह संध्याकाळी सात वाजता पु. गुरुजींचे बौद्धीक महाराणा प्रताप सभागृहात आयोजीत केलेले होते. तोपर्यंत पु. गुरुजींबद्दल फक्त ऐकले होते आणि निरनिराळ्या छायाचित्रांच्या स्वरूपात त्यांचे दर्शन घडत होते. परंतु, आता या बौद्धिकाच्या निमीत्ताने मी प्रत्यक्ष या महामानवाला  पाहू शकणार होतो, ऐकू शकणार होतो. बौद्धिकातले काही कळावे या वयाचा नसूनही बाल स्वयंसेवकांना या बौद्धिकाला उपस्थित राहण्याची परवानगी होती हे विशेष. 

         संघाच्या कार्यपद्धतीनुसार सारे काही ठरलेले होते. त्यानुसार सांघिक पद्य, वैयक्तिक गीत आणि बोधपटाचे वाचन होवून मग पु. गुरुजींचे बौद्धिक सुरु होणार होते. आवाज खणखणीत असल्याने बोधपट वाचनाचे काम माझ्याकडे होते आणि त्यामुळे मी साहजिकच सगळ्यात पुढे बसणार होतो आणि त्यामुळेच मी थोडा बावरलेला पण तरीही उत्साहाने भारलेला होतो. कारण, प्रत्यक्ष श्री गुरुजीं समोर मी बोधपट वाचणार होतो.

         पावणेसात वाजता संपत् झाले आणि सारे आतुरतेने पु. गुरुजींच्या आगमनासाठी सज्ज झाले. पुढील पाचच मिनिटात पु. गुरुजींनी सभागृहात प्रवेश केला आणि सारे सभागृह सळसळ्त्या चैतन्याने भरुन आले. शाखा भरली आणि उपविश: होवून सांघीक, वैयक्तीक पद्य व बोधपट वाचन झाल्यानंतर जेव्हा गुरुजी बोलायला उठले तेव्हा त्यांचे ते झपाझपा माईकपर्यंत चालत जाणे, त्यांचा तेज:पुंज चेहरा, चष्म्याच्या आतुन समोर उपस्थित सारया  स्वयंसेवकांकडे मायाळू आणि आश्वासकपणे पाहणारी त्यांची नजर आणि बोलत असताना त्यांना वाटणारी मातृभूमीविषयीची कळकळ हे सारे मी जणू अनिमिष नेत्रांनी न्याहाळत होतो आणि कर्णसंपुटाद्वारे हृदयात साठवून ठेवत होतो. 

        माझ्यासमोर पु.गुरुजींच्या रुपाने कुणी पुराणकाळातला तेजस्वी ऋषी-मुनि संस्कृती, मातृभूमी, पुर्वजांचा त्याग, संघटनेचे महत्त्व, स्वयंसेवकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, संभाव्य धोके, गीता, वेदातील ऋचा हे सारे ओघवत्या वाणीने बरसत होता आणि सारे स्वयंसेवक त्या अमोघ वाणीच्या वर्षावात न्हाऊन निघत होते. सन्ध्याकाळची वेळ असुनही प.पु.गुरुजींच्या चेहर्यावर दिवसभरातल्या व्यस्त कार्यक्रमांचा थकवा किंचीतही जाणवत नव्हता उलट त्यांचा चेहरा नुकत्याच सुस्नात अवस्थेतल्या तेजपुंज योग्यासारख्या भासत होता. पु. गुरुजींचे ते तेजोमय दर्शन आज हा फोटो पाहताच माझ्या डोळ्यासमोर इतक्या वर्षांनंतरही जसेच्या तसे उभे राहिले, जे मी कधी विसरु शकत नाही.

©️ हेमंत बेटावदकर (जळगांव) 
भ्रमणध्वनी : 9403570268

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी 
                               
---------------------------------------------------------

Like & Follow us..

Click 👉   Facebook
Click 👉   Instagram  
Click 👉   Twitter
Click 👉   YouTube       

---------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या