निष्कलंक स्वराज्यसूर्य - छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराज जयंती विशेष

स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या तेजःपुंज आयुष्यातून आजही सर्व रयतेला स्वाभिमानाने जगण्याची आणि त्याच स्वाभिमानासाठी प्रसंगी या नरदेहाची आहूती देण्याची दिव्य प्रेरणा प्राप्त होत आहे. संभाजी महाराजांच्या दिव्य चारित्र्यावर  इतिहासाने जो अन्याय केलेला होता तो आज वा.सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, डॉ. सदाशिव शिवदे यांसारख्या अभ्यासू इतिहासकारांनी दूर केला आहे. संभाजी महाराजांची तेजस्वी प्रतिमा सर्वांसमोर आणण्याचे महत्कार्य या महान तज्ञांनी केले आहे. आजच्या तरूण पिढीतील आदर्श युवा इतिहास संशोधक डॉ. केदारदादा फाळके हे संभाजी महाराजांविषयी अभ्यास करून त्यांचे अपरिचित दिव्य चरित्र अजून जास्त तेजस्वीपणे आपल्या सर्वांच्या समोर आणतील हा विश्वास आहे.


ज्येष्ठ शुद्ध द्वादशी शके १५७९ म्हणजेच १४ मे १६५७ रोजी शंभूबाळ हे राजे शिवछत्रपती आणि महाराणी सईबाईसाहेब यांचे पोटी पुरंदर या किल्ल्यावर जन्माला आले. शंभूबाळाच्या जन्मानंतर सईबाईंची तब्येत ढासळल्यामुळे दुर्दैवाने शंभूबाळाला आईच्या दुधाला मुकावे लागले आणि पुढे धाराऊ त्यांच्या दुधमाता झाल्या. वयाच्या दोन अडिच वर्षाचे असतांना मातृछत्र हरपले. या काळात पिता शिवाजी राजांवरही अफजल खानाचे मोठे संकट आले होते. एकंदर संघर्ष हा जन्मतःच शंभूराजेंच्या नशिबी आला होता आणि तो शेवटच्या श्वासापर्यंत टिकला. शंभूराजेंवर संस्कार आऊसाहेबांनी म्हणजेच जिजाऊंनी केले. शिवबांना शिकवतांना आऊसाहेब रामाच्या , कृष्णाच्या कथा सांगायच्या आणि आता शंभू राजेंना राम, कृष्ण तसेच शिवरायांच्या पराक्रमाच्या कथाही त्या सांगत होत्या. महाभारतासोबतच शिवभारतही ऐकत शंभूराजे घडत होते. तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर शंभूराजेंनी वेगवेगळ्या भाषेंवर प्रभुत्व मिळवले होते. 


वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी शंभूराजांनी "बुधभूषणम्" हा संस्कृत ग्रंथ लिहिला त्यात एकूण ८८३ श्लोक असून तब्बल ६३० एवढे श्लोक राजनितीशास्त्रावर आधारित आहेत. पुढे "नायिकाभेद" व "नखशिख" हे ब्रज भाषेतील श्रृंगाररसावर आधारित ग्रंथ आणि "सातशतक" हा अध्यात्मशास्त्रावर आधारित असे हे एकूण चार ग्रंथ शंभूराजेंच्या अष्टपैलू बुद्धिसामर्थ्याची प्रचिती आजही देत आहेत.


पुरंदरचा तह झाल्यावर वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी शंभूराजेंचा राजकारणात प्रवेश झाला, तेव्हाही एवढ्या लहान वयात आपल्या ओजस्वी वाणीतून आणि बुद्धियुक्त कृतीतून त्यांनी मिर्झाराजा जयसिंगाला प्रभावित केले होते. शिवरायांसोबत आग्र्याच्या भेटीला गेल्यानंतरचा समंजसपणा आणि सुटकेनंतरचा संयम या विषयीचे वर्णन ऐकल्यावर आपण आश्चर्यचकित होतो. कारण एवढ्या कमी वयात इतकी समज शंभूराजेंना होती हे असामान्यतेचे लक्षण होते. 


शिवरायांनाही आपल्या प्राणप्रिय छाव्याला खुपवेळा मृत्यूच्या दाढेत टाकावे लागले आहे. प्रसंगी जिवंत मुलाचे श्राद्ध घालावे लागले आणि हे फक्त स्वराज्यासाठी, या प्रत्येक प्रसंगी स्वराज्यहितासाठी शंभूराजे त्यांच्या कार्यकर्तृत्वात आणि या भयानक परिक्षांमधे खरे उतरले आहेत. संघर्ष पाठीशी बांधून फिरणाऱ्या शंभूराजेंना खुप संकटांना सामोरे जावे लागले. दुर्दैवाने गृहकलहालाही त्यांना तोंड द्यावे लागले. यातच त्यांच्याबद्दल अपप्रचार झाला. त्यांच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले गेले. मात्र तरिही या सर्व संकटांचा सामना करत शंभूराजे नव्या तेजाने सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ चारित्र्य घेऊन सर्वांसमोर उभे राहिले. रयतेच्या मनात एक आदर्श राजाचे स्थान त्यांनी निर्माण केले.

छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर औरंगजेबाने दख्खनच्या स्वारीकडे लक्ष दिले आणि स्वराज्याचा घास घेण्यासाठी हा औरंगशहा चालून आला. या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी पोर्तुगीज, सिद्दी यांसारखे स्वराज्याचे शत्रूही आठही दिशांनी टपून बसले होते. परंतू, आपल्या अतुल्य पराक्रमाने छत्रपती संभाजी महाराजांनी या सर्व शत्रूंचा सामना केला. एकही युद्ध न हरता सर्व शत्रूंना त्यांनी धूळ चारली. औरंगजेब दक्षिणेत आल्यावरसुद्धा त्याचा मनसुबा सफल होत नव्हता. स्वराज्यातील एक साधा किल्ला घेण्यासाठी या आशिया खंडातल्या सर्वात मैठ्या बादशहाला संघर्ष करावा लागत होता. 

अवघ्या २३ वर्षांचे असतांना छत्रपती झालेले शंभूराजांचा अतुलनिय पराक्रम अवघा हिंदूस्थान बघत होता. छत्रपती संभाजी राजे हा पराक्रम करत होते आणि सर्व मावळेही पराक्रमाची शर्थ करित होते आणि त्यामागे एकच प्रेरणा होती आणि ती म्हणजे संभाजीराजेंनी अनेकदा उच्चारलेले "आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य" हे वाक्य. शिवछत्रपतींच्या स्वराज्य विचारासाठीच ही लढाई चालू होती आणि त्यात शंभूराजे यशस्वी होत होते.


एक दिवस दुर्दैवाने स्वजनांच्याच फितूरिने स्वराज्याचा छावा या लांडग्यांच्या समुहात अडकला गेला. आपल्या स्वाभिमानासाठी, देश आणि धर्मासाठी अनेक यातना या धर्मवीराने सहन केल्या. त्याचे वर्णन शाहीर योगेश करतो, 
"देश, धरमपर मिटने वाला शेर शिवाका छावा था
महापराक्रमी, परमप्रतापी एकही शंभूराजा था..."
छत्रपती संभाजी राजे जर थोडे झुकले असते, नमले असते तर वाचले असते, परंतू अशा षंढ गुलामी जीवनापेक्षा त्यांनी रोज होणारा हा महाभयानक मृत्यू स्वीकारला आणि स्वराज्याचा महाराष्ट्रधर्म अबाधित ठेवला. 

"शिवरायांसी आठवावे, जिवित तृणवत मानावेl
इहलोकी परलोकी उरावे, किर्तीरुपे ll" 

या समर्थ वचनांना खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज जगले.  आजही त्यांच्या किर्तीचा सुगंध सर्वदूर दरवळतो आहे आणि सर्वांना प्रेरणा देत आहे.

संभाजी महाराजांना मारल्यानंतर स्वराज्य संपणार आणि छत्रपतींची धिंड काढल्यानंतर रयतेच्या मनात धडकी बसणार हा आत्मविश्वास औरंगजेबाला होता मात्र फार काळ तो टिकू शकला नाही. छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले होते आणि त्यांनी बलिदानाचे सर्वोच्च शिखर गाठले होते. कवी कलश हा सच्चा स्वामीनिष्ठही त्यांच्या सोबत होता. छत्रपतींच्या बलिदानामुळे स्वराज्यात प्रत्येकाच्या रक्तात संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि संताजी, धनाजी सारखे वीर प्रतिसंभाजी म्हणून लढू लागले. छत्रपती राजाराम महाराज व भद्रकाली महाराणी ताराराणींच्या नेतृत्वात अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि औरंजेबाला या मातीत गाडून आणि पुढे दिल्लीचे तख्त राखूनच शांत झाला. संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. 


अतुलनिय शौर्य गाजवणारे, असामान्य बुद्धिमत्तेचे धनी, पवित्र चारित्र्य असणारे, रणधूरंधर, पराक्रमी, कलापूजक, कुशल राजनितीज्ञ, बलिदानाचे सर्वोच्च मानक... अशा अनेक उपाध्यांनी छत्रपती संभाजी राजे ओळखले जातात. संभाजी महाराजांच्या चरित्रातून खुप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि आजच्या युगात आचरणीय ही आहेत. संभाजी महाराजांना अवघे ३२ वर्षेच आयुष्य लाभले आणि यात त्यांनी अनेक असामान्य पराक्रम केले तेही अनेक संकटांना तोंड देऊन. संभाजी राजे हे सवाई शिवाजीच होते असे अनेक इतिहासकार आजही मान्य करतात. 

मित्रांनो आपल्याला शिवशंभू लाभलेले आहेत परंतू या छत्रपतींचा स्वराज्य विचार समजून घेण्यासाठी आपण त्यांच्या चरित्राचा अभ्यास करायला पाहिजे आणि  त्यांच्या विचाराचे आचरण करायला पाहिजे. या स्वराज्य मंत्रानेच आपण आपले राष्ट्र "आत्मनिर्भर" करू शकतो. या महान छत्रपतींच्या चरित्रातून आपण बोध घेऊन, प्रेरणा घेऊन आपले जीवन कृतार्थ करावे ही प्रार्थना...
       
 ©️ प्रविण प्रल्हाद नायसे (भुसावळ)
     
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

------------------------------------------
Like & Follow us..

Click 👉   Facebook
Click 👉   Instagram
Click 👉   Twitter
Click 👉   YouTube
-------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या