स्मृतींची चाळता पाने (भाग २)

यार की कोई खबर लाता नही...

आज पहाटे गच्चीवर फिरत होतो. सहज आकाशाकडे नजर गेली. गार वातावरणात पक्षी आकाशात विहरत होते. त्यांचे ते स्वच्छंदी मुक्त विहरणे पाहून आणि सध्याची लॉकडाऊनची स्थिती अनुभवत असताना सहज माझे मन पंचेचाळीस वर्षे मागे गेले आणि मी माझा राहिलो नाही.
तो १९७५ चा डिसेंबर महिना होता. आणिबाणी लागली होती. सारा देश भयग्रस्त होता. संघाच्या आदेशानुसार आणिबाणीच्या विरोधात देशभर सत्याग्रह करून स्वयंसेवक जेलमध्ये जात होते. मी सुद्धा डिसेंबरच्या पंधरा तारखेला माझ्या सहकार्‍यांसह जळगावच्या मु. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात घोषणा देत, आणिबाणी विरोधात बोर्ड झळकवत सत्याग्रह केला आणि पोलिसांनी आम्हाला अटक केली. आमची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आणि पाच दिवसानंतर कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला जळगावच्या जिल्हा कारागृहात टाकण्यात आले. 

संपूर्ण जिल्ह्यातून जवळजवळ १५० ते २०० सत्याग्रही त्यावेळी दोन कोठड्यांमधून या कारागृहात डांबण्यात आले होते. त्यातले बहुतेक संघ कार्यामुळे एकमेकांचे परिचित होते. भुसावळ शहरातून संघाचे अनेक कार्यकर्ते या कारागृहात शिक्षा भोगत होते. त्यापैकी मला ठळकपणे आजही आठवतात ते स्व. बाकेलाल रणधिर! 

रोज संध्याकाळी सहा वाजता साऱ्या कैद्यांना कोठडीत डांबले जाई! कोठडीच्या दाराला कुलूप लावून वार्डनचा खडा पहारा बसवला जाई. संध्याकाळी सहानंतरचा काळ मोठा कठीण असे. कातर वेळ असल्याने उदास उदास वाटे. जशी जशी रात्र सरकत जाई तसतशी भयाणता वाढीस लागे. 

अशा वेळी या गूढ वातावरणावर मात करण्यासाठी आम्ही स्वयंसेवक संघाची पद्ये, सिनेमातली गाणी, नकला, डान्स, विनोद या गोष्टींचा सहारा घेत असू. या साऱ्या कार्यक्रमाच्या शेवटी स्व. बाकेलालजी एक असे आर्त गाणे म्हणत असत तेव्हा आम्ही सारे अंतर्मुख होत असू. त्यावेळच्या आमच्या मनस्थितीचे नेमके वर्णन त्या गीतात होत असे. ते गीत सुरू असताना आणि त्यानंतरही काही वेळ सारे काही शांत असे. कुणाच्याही तोंडून शब्दही फुटत नसे. ती स्मशान शांतता नकोशी वाटे. 

त्या गाण्याचे बोल असे होते:

यार की कोई खबर लाता नही...
दम लबोपरसे निकल पाता नही ।। धृ ।।

जी मे आता हैं के मै पंछी बनू... 
पर बिना मुझसे, उडा जाता नहीं ।।१।।

जी मे आता हैं के मैं कश्ती बनूं...
पानी बिना मुझसे, चला जाता नही ।।३।।

यार की कोई...

आज या गोष्टीला ४५ वर्षे होऊन गेली आहेत. त्या काळात माझ्यासमवेत कारागृहात असलेले बहुसंख्य स्वयंसेवक आज हयात नाहीत. स्व. बाकेलालजींना जाऊनही बराच काळ लोटला आहे, पण त्यांनी धीरगंभीर आवाजात गायलेले हे गाणे आजही माझ्या कानात रुंजी घालते आणि मी हळवा होतो, अंतर्मुख होतो आणि आठवणींनी रडतो देखील!!

©️ हेमंत बेटावदकर, जळगांव
   भ्रमणध्वनी - ९४०३५७०२६८

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

---------------------------------------
Like & Follow us..

Click here 👉   Facebook
Click here 👉   Twitter 
Click here 👉   Instagram
Click here 👉   YouTube 
-----------–----------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या