पन्ना - एक स्वयंसेवक
बाल स्वयंसेवक असतानाच्या बऱ्याच जुन्या गोष्टी स्पष्टपणे आठवतात. अगदी पन्नास वर्षांपूर्वी घडलेले प्रसंग अगदी काल घडल्यासारखे वाटतात. माझा संघात व्यतीत केलेला शिशु ते स्वयंसेवक ते तरुण स्वयंसेवक हा कालप्रवास तर मला ठळकपणे आठवतो. या कालखंडात केलेल्या गमतीजमती, भांडणे वादविवाद, मारामाऱ्या, आलेले कडू गोड प्रसंग, विदारक अनुभव, हेवे दावे, भोगलेला त्रास, मनाला उभारी देणारे क्षण, कमावलेले शरीर, जिव्हाळा या साऱ्यांशी निगडीत सारे सारे आठवते, त्यापैकीच एक हृद्यप्रसंग की जो मला प्रचंड आत्मिक समाधान आणि आत्मविश्वास देऊन गेला तो आपणांस मी आता सांगतो.
त्या वेळी मी आमच्या घराजवळच भरत असेलल्या विक्रमादित्य सायं शाखेचा कार्यवाह होतो. शाखा अशा लोकवस्तीत होती की जिथे जवळजवळ प्रत्येक घरात संघ माहिती होता, त्यामुळे शाखेची दैनंदिन उपस्थिती भरपूर असे. परंतु त्या क्षेत्रात असेही काही भाग होते जेथे प्रयत्न करूनही संघविचारांचा शिरकाव होत नव्हता. मेहतर समाज अधिक संख्येने असलेला गुरुनानक नगर हा भाग असलेला त्यापैकीच एक होता. जिथे एखादा अपवाद वगळता स्वयंसेवक नव्हते. उलट शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांना त्रास देणारी टवाळखोर मुले मात्र तेथे राहत होती.
पन्ना नावाचा एक दांडगट, मवाली मुलगा रोज शाखा भरण्याअगोदर गेटजवळ आपल्या इतर मवाली साथीदारांसोबत उभा राही व शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांना त्रास देऊन, मारहाण करून शाखेत जाण्यास मज्जाव करी. स्वयंसेवक बिचारे भीतीने शाखेत येण्याचे टाळत. पन्नाची दहशतच इतकी होती की त्याचा शाखेच्या दैनंदिन उपस्थितीवर परिणाम होऊन ती रोडावू लागली. कार्यवाह म्हणून मला काहीतरी करणे आता भाग होते!
एके दिवशी शाखा भरली असतांना अचानक मला पन्ना गेटपाशी साथीदारांसह उभा दिसला. त्यावेळी एका गणात कुस्त्यांचा खेळ चालू होता. मी पन्नाला ओरडून आव्हान दिले की, माझ्याबरोबर कुस्ती खेळ, पाहूया कोनात किती ताकद आहे ते ! मीही जवळपास पन्नाच्याच वयाचा होतो पण, तब्बेतीने मात्र तो माझ्यापेक्षा दणगट होता. पण या पन्नाची दादागिरी मोडून काढणे आवश्यक होते.
पन्ना माझ्या आव्हानाला लगेच तयार झाला. झाले! त्याचे टारगट साथीदार, सारे स्वयंसेवक आणि इतर बघे जमले. आम्ही दोघांनी शड्डू ठोकले आणि एकमेकांना भिडलो. पन्ना खरोखरच ताकदवान होता. पण, त्यादिवशी माझ्या अंगात एकाएकी कसले बळ संचारले कोणास ठावूक, पण पाचच मिनिटांत त्याला मी चारी मुंड्या चीत केले! पन्ना खजील होऊन खाली मान घालून उभा राहिला. मी त्याला जवळ घेतले आणि मित्र भावनेने म्हटले, तू ताकदवान आहेस पण ताकदीचा उपयोग शाखेसाठी, आपल्या समाजासाठी केलास तर किती चांगले होईल नाही? तू रोज शाखेत येत जा! तुझ्यातल्या चांगल्या गीष्टींचा उपयोग शाखेसाठी होऊ दे. पन्नाला ते पटले.
त्यानंतर पन्नाची दैनंदिन शाखा कधीच चुकली नाही. अंगभूत गुणांमुळे पन्ना गटनायक, गणशिक्षक झाला. त्यानंतरची प्रत्येक हिवाळी शिबिरे, प्राथमिक वर्ग, हिवाळी वर्ग आणि संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्याने हिरीरीने भाग घेतला. आम्ही पैसे जमवून त्याला संपूर्ण गणवेश करून दिला. त्याच्याचमुळे नंतर गुरुनानक नगरात संघाची स्वतंत्र शाखा सुरु झाली. संचालनात शिस्तीत चालणारा पूर्ण गणवेशातला पन्ना पाहून मला वाटणारे समाधान व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत!
©️ हेमंत बेटावदकर
मो. 9403570268
-विश्व संवाद केंद्र, देवगिरी
-----------------------------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या