कारागृहातील आठवणी
आणीबाणीच्या काळात सत्याग्रह करून तुरुंगवास भोगत असताना अनुभवविश्व इतके संपन्न झाले की जेव्हा सुटका होऊन बाहेर आलो तेव्हा आमूलाग्र बदललो होतो. कारागृह ही अशी शाळा आहे की येथे दाखल झालेला विद्यार्थी जेव्हा ही शाळा सोडतो तेव्हा त्याच्यातला सारा "मी" पण गळून गेलेला असतो.
भल्याबुऱ्याची जाण आणि माणसे ओळखण्याची किमया, अन्नाचे महत्त्व, चारचौघात वागण्याचे नियम, माणसांचे स्वभाव, स्वातंत्र्याची किंमत हे सारे सारे त्याला कळते. कारण त्या चार भिंतीआड या सार्या गोष्टी एक तर उघड्या पडतात किंवा 'अति परिचयात अवज्ञा' या उक्तीप्रमाणे सततच्या सहवासाने एकमेकांचे गुणदोष ठळकपणे जाणवतात. कोण भांडखोर आहे, कोण मितभाषी आहे, कोण 'पोटात एक तर ओठात दुसरे' अशा स्वभावाचा आहे, चुगलखोर आहे, कोण खादाड आहे, कोण स्पष्टवक्ता आहे, कोण उगाचच दुसऱ्याला हिणवणारा आहे, कोण आपला, कोण परका आहे, कोण कृतज्ञ तर कोण कृतघ्न आहे हे सारे येथे आपोआपच शिकता येते. येथे आलेले सारेजण एकाच नावेचे प्रवासी असतात. त्यामुळे जे काही घडते ते साऱ्यांसाठी एक अनुभव असतो, फक्त तो ज्याचा त्याने स्वतःच्या कुवतीप्रमाणे अनुभवायचा असतो.
कारागृहात घरचा डबा किंवा पदार्थ आणण्यास बंदी होती. प्रत्येकाला जेलमध्ये शिजवलेले अन्न खावे लागे. प्रत्येकाला तो फक्त जगावा एवढेच अन्न म्हणजे तीन छोट्या पोळ्या आणि नेमकी कसली आहे हे ओळखता येणार नाही अशी पांचट वाटीभर भाजी मिळेे. या भाजीला बावन्न पत्ती भाजी म्हणत कारण खरोखरीच हाताला येतील त्या भाज्या, काठ्या, देठं, साली हे सारे त्यात असे. ही भाजी खाणे नकोसे वाटते. पण भूक आवरत नसे. घरी तरीबाज मसालेदार चविष्ट भाज्या खाणारे येथे मात्र स्वतःची भाजी संपवून इतरांकडे भाजी मागत. भुकेसाठी दुसऱ्याच्या पोळ्या भाजी मारणारे महाभाग तेथे होते. सकाळी नाश्ता म्हणून मिळणार्या कांजी बाबतीतही तसेच घडत होते.
दर रविवारी फिस्ट म्हणून आम्हाला एक वाटी गुळाचा शिरा मिळे. त्या वेळेचे अमळनेरचे नगराध्यक्ष स्व. देसराजजी अग्रवाल स्वतः हाताने हा शिरा बनतात कारण त्यांचे स्वतःचे हॉटेल होते. तर हा जाड्याभरड्या रव्याचा शिरा भरपूर मिळावा म्हणून अनेक जण भटारखान्यात पडेल ते काम करण्यास तयार असत. हा शिरा जास्त मिळावा म्हणून भांडणे देखील होत असत. बाहेरच्या जगात ज्या डालडा तुपाच्या शिऱ्याकडे बघून नाके मुरडली असती ते जेलमध्ये तो मिळावा म्हणून आक्रमक होत. अर्थात त्या शरीराची चव पंचपक्वान्नांपेक्षा थोडीशीही कमी नसे. मर्यादित मिळायचा त्यामुळे आणखी हवासा वाटत असे किंवा मग भुकेला चव असते त्यामुळे असे असावे. पण या प्रसंगात माणसे उघडी पडत. अर्थात त्यात दोष कुणाचा नव्हता पण एकूण परिस्थितीनेच माणसे असे वागत असावीत.
आज या घटना घडून ४५ वर्षे झाली आहेत. माझे बरेच त्या काळातले सोबती आज हयात नाहीत. जे आहेत त्यातले फार कमी संपर्कात आहेत. स्व. देसराजजी यांना जाऊनही फार वर्षे झाली, पण त्यांनी बनवलेल्या गुळाच्या शिऱ्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. त्यानंतर घरी तसा शिरा बनवण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण कधीच जमलं नाही, शेवटी तो नाद सोडून दिला! पण कारागृहाच्या चार भिंतीआड जे काही कडू गोड अनुभव आले ते विसरू शकत नाही आणि ते मिळाले म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.
©️ हेमंत बेटावदकर
मो. 9403570268
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
----------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या