तमा न आम्हा तुझी पावसा
साधारणतः १९८१ किंवा १९८२ ची गोष्ट असावी, मी संघाच्या अधिकारी वर्गाच्या द्वितीय वर्षासाठी नाशिकला गेलो होतो. प्रथम आणि द्वितीय वर्षाचे आयोजन एकत्रच असल्यामुळे स्वयंसेवकांची संख्याही भरपूर होती. त्यात विशेष म्हणजे संघ शिक्षा वर्ग पुणे सोडून प्रथमच नाशिकला होत होता. संघ शिक्षा वर्ग भर उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात भरण्याचे कारण हवामान कोरडे, पावसाची शक्यता नाही आणि सायंकाळी थोडी हवा हे होते की ज्यामुळे वर्गाचे दिवसभराचे कार्यक्रम यथास्थित होउ शकतील.
पंचवीस दिवसाच्या वर्गात रोज दुपारी ३ वाजता मान्यवर पदाधिकारी, प्रचारक यांचे बौद्धिक असे. कुणाचे बौद्धिक आहे आणि कोणत्या विषयावर आहे ते २/३ दिवस अगोदरच समजत असे. पण एक मात्र खरे की इतक्या वरिष्ठ पातळीवरचे हे मान्यवर बौद्धिकासाठी आल्यावरही संघशिक्षा वर्गात मुक्कामी असत. त्या मुक्कामात ते साऱ्यांमधे मिसळून जात, सर्वसामान्य स्वयंसेवककां प्रमाणे रहाणे, वागणे, सहभागी होणे, सोबत भोजन करणे हे अगदी सहजगत्या होत असे, त्यात कोणतीही कृत्रीमता नसे.
या संघशिक्षा वर्गात दोन दिवस सरकार्यवाह मा. भाऊराव देवरस यांचे बौद्धिक होणार होते. बौद्धिकाचा विषय होता पू. श्री गुरुजी आणि त्यांचे कार्य. पहिल्या दिवशी मा. भाऊरावांचे गुरुजींचे महान कार्य सांगणारे ओघवत्या भाषेतले बौद्धिक पार पडले. दुसरा दिवस उजाडला तोच मुळी ढगाळ वातावरणाने. मे महिना असुनही अवकाळी पावसाची लक्षणे दिसत होती. दुपारी बौद्धिक सुरु झाले आणि थोड्याच वेळात पावसाला आणि वादळाला सुरुवात झाली. पावसाचा जोर आणि त्याला वाऱ्याची साथ असल्याने ज्या मंडपात बौद्धिक सुरू होते त्याच्या कणाती कोलमडू लागल्या. आत बसलेल्या स्वयंसेवकांच्या अंगावर वारा असल्याने चोहीकडुन आणि वरतून धारांचा वर्षाव होऊ लागला. वरचे छप्पर उडून गेले, पावसामुळे भिजू लागल्यावर स्वयंसेवकांमध्ये चलबिचल सुरू झाली, जमीनीवर पाणि साचु लागल्याने बसणे मुश्किल होऊन काही स्वयंसेवक उभे राहिले. समोर बौद्धिक देत असलेल्या मा. भाऊरावांवर मात्र या साऱ्याचा काहीच परिणाम होत नव्हता. जराही विचलित न होता त्यांचे बौद्धिक सुरूच होते. जेव्हा काही स्वयंसेवक जागेवरून उठून गडबड करू लागले आणि बौद्धिकात व्यत्यय येउ लागला तसे मा. भाऊराव संतप्त झाले आणि जागेवरून उठून गोंधळ करणाऱ्या स्वयंसेवकांना रागावून म्हणाले "काय गोंधळ लावला आहे? एवढासा पाउस काय आला आणि भिजू लागलात तर लगेच जागेवरून उठून गोंधळ घालता? या भिजल्याने काय विरघळून जाणार आहात? ज्या महामानवा विषयी कालपासून मी जे काही सांगतो आहे त्या तपस्व्याच्या त्यागाची थोडी तरी जाण ठेवा!
असाध्य आजाराने साऱ्या शरीराला पोखरले असुन सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत ज्या प. पू. गुरुजींनी संघकार्य कसे वाढेल याचाच विचार केला, आपला देह झिझवला,अहोरात्र संघ, संघ आणि संघ आयुष्यात दुसरे काहीच नाही त्यांचे बौद्धिक ऐकताना तुम्ही असे वागता? मला तुम्हाला स्वयंसेवक म्हणायची लाज वाटते. बसा खाली आणि शांतपणे ऐका." त्यानंतर सारे शांत झाले, पाउस, वादळ, वारा सारे काही सुरू होते, मंडप कोसळत होता आणि मा. भाऊराव बोलत होते, सगळे स्वयंसेवक या साऱ्याची पर्वा न करता प. पू. गुरुजी बद्दल मा. भाउरावांकडून ऐकत होते, आणि तल्लीन होऊन गुरुजींचे कार्य मनात आणि हृदयात साठवत होते. धन्य ते मा. भाउराव, साक्षात तेजाचा स्त्रोत असलेले वंदनीय प. पू. गुरुजी आणि धन्य ते सारे स्वयंसेवक ज्यांनी त्या दिवशी ते अलौकिक बौद्धिक ऐकले.
©️ हेमंत बेटावदकर
मो. ९४०३५७०२५८
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
------------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉 Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या