देवगिरी । कोरोनाचा विळखा संपूर्ण जगाला बसला आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम होणार आहेत. भारत सरकारने नुकतेच नवीन पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोना व लॉकडाऊन मुळे भारतच नव्हे तर जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला असून भारताचा जीडीपी आणि वृद्धी दर कमी होत असला तरी देशात उपासमारीची वेळ येणार नाही. भारत जगाच्या तुलनेत कोरोना संकटावर यशस्वी मात करत असल्याचे आरबीआय संचालक सतीश मराठे यांनी सांगितले. देवगिरी विश्व संवाद आयोजित वेबसंवाद दरम्यान 'भारताची अर्थस्थिती - आज आणि लॉकडाऊननंतर" या विषयावर बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
भारताची आजची अर्थस्थिती मांडताना मा. सतीशजी मराठे म्हणाले, की देशात अन्न धान्य मुबलक प्रमाणात असून मान्सून पाऊसही उत्तम पडणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तवले आहेत. त्यामुळे देशात उपासमार होण्याचे वर्तवलेले अंदाज चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनामुळे भारतात ३० ते ४० लाख लोक प्रभावित होतील अशी शक्यता सुरुवातीला वर्तविण्यात येत होती. परंतु, देशात मागील अडीच महिन्यात जवळपास ९० हजार लोक कोरोनामुळे प्रभावित झाले असून त्यापैकी जवळपास २५ हजारहून अधिक लोक बरे होऊन घरी परतले आहेत. सुरुवातीला कोरोना संक्रमण दुपटीचा दर ३ ते ४ दिवस होता, जो आता १३ ते १४ दिवस झाला आहे, असे सांगून भारत कोरोना संकटाचा यशस्वी सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले.
चलन तुटवडा पडू न देणं हेही भारताचं यशच
देशात आज डेबिट व क्रेडीट कार्डवरून होणारे व्यवहार काही प्रमाणात कमी होऊन रोख व्यवहार वाढले आहेत. त्यासोबतच फोन पेमेंट एप्पवरील व्यवहारही वाढले आहेत. परंतु, आरबीआयने दीड लाख कोटी रुपये उपलब्ध करून दिले असल्यामुळे रोख चलनाचा कुठेही तुटवडा पडल्याचे दिसून आले नाही असे त्यांनी सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्था व जीडीपी याविषयी मत व्यक्त करताना सप्टेबर - ऑक्टोबर महिन्यापासून वृद्धीदर पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तथापि, भारताच्या अर्थव्यवस्थेतील मोठा हिस्सा मागील अडीच महिन्यात खर्ची पडला असून व्यवहार व आर्थिक सक्रियता १५ ते २० टक्क्यावर थंडावली आहे. त्यामुळे अनेकांचे मार्च, एप्रिल महिन्याचे पगार झाले परंतु, मी महिन्याचे किती जणांचे पगार होतील याबाबत शंका असल्याचे त्यांनी सांगितले.
मजूर वर्ग आपल्या मायदेशी परतत असून कोरोना संकट व अर्थव्यवस्थेच्या उतरंडीचा फटका कारखानदारी क्षेत्राला सर्वाधिक बसेल पण, पुढील २ - ३ महिन्यात परिस्थिती बरीच स्थिर झालेली असेल असेही सतीशजी मराठे यांनी सांगितले. विदेशातील भारतीय देशात परत येताहेत, त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारा निधी ८० टक्क्याने कमी झाला आहे. तसेच, सरकारने पॅकेजच्या माध्यमातून किती पैसे दिले हे महत्वाचे नसून सरकार व बँका यांनी एकत्र येऊन लिक्विडीटीच्या माध्यमातून किती मोठा स्टीमुलस दिला हे महत्वाचे आहे. असे सांगून सरकारला पुन्हा एकदा पॅकेज घोषित करावं लागू शकतं अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
केंद्र व राज्य सरकारे करताय यशस्वी सामना
कोरोना संकटाचा केंद्र व राज्य सरकारे योग्य प्रकारे सामना करत असून देशातील जनधन योजना, मेक इन इंडिया यासारख्या योजनांचा आज नागरिकांना फायदा होत असल्याचे सतीशजी मराठे यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले. देशात यापूर्वी पीपीई कीटचे उत्पादन जवळपास नव्हतेच. आपण चीनवर अवलंबून होतो. परंतु, मागील दोन महिन्यात ५१ लाख पीपीई किट्स तयार होणं हे मोठं यश आहे. देशात ७० प्रयोगशाळा सक्रीय असून आपले शास्त्रज्ञ सकारात्मक दिशेने जात असून ते यश मिळवतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विविध योजना व बँकिंग व्यवहार यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन लोकांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
---------------------------------------------
Like & Follow us..
Click here 👉 Facebook
Click here 👉. Instagram
Click here 👉 Twitter
Click here 👉 YouTube
0 टिप्पण्या