राज्यात पुन्हा एका साधूची हत्या; नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात शिवाचार्य स्वामींचा खून

नांदेड :  महाराष्ट्राला भावनिक हादरा देणाऱ्या पालघर घटनेला महिना उलटत नाही तोच नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात नागठाण या मठामध्ये सदगुरु निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य गुरुमाऊली नागठाणकर यांची दि. २४ रोजी मध्यरात्री हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गावातीलच एका व्यक्तीने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला व त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली. या घटनेने केवळ उमरी तालुक्यावरच नव्हे तर नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. मठातील ऐवज चोरटा घेऊन जात असताना महाराजांनी विरोध केला, तेव्हा चार्जरच्या वायरीने महाराजांचा गळा आवळून हत्या केल्याचे समजते. महाराजांच्या गाडीमध्ये चोरट्याने त्यांचा मृतदेह डिकीत टाकून चोरलेला ऐवज घेऊन पळून जाण्याच्या बेतात असताना मठाच्या गेट ला गाडीने टक्कर मारली त्यात मोठा आवाज आल्याने मठातील शिष्यगण जागी झाले व त्यांनी गावातील लोकांना जागे केले. त्यामुळे आरोपीने चोरलेले दागिने व मृतदेह तसाच गाडीत ठेऊन पळ काढला. रुग्णालयात घेऊन गेले असता महाराजांचा देह मृत पावलेला होता, असा घटनाक्रम एका वृत्तात समोर आला आहे.


अजून एक मृतदेह आढळला

नागठाणा येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्या जवळच अन्य एक मृतदेह सापडला असून  हा खूनही त्याच व्यक्तीने केला असावा शंका व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी उमरी पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू आहे. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला असून भाविकांत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पालघर येथील साधूंच्या हत्याकांडानंतर राज्यात नांदेड जिल्ह्यात शिवाचार्य स्वामींची हत्या झाल्यामुळे राज्यातील साधू संतांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गाव वस्तीतील साधू सुरक्षित नसतील तर, जंगलात, डोंगर दर्यात वास्तव्य करणाऱ्या साधूंच्या जीविताला व संरक्षणाचे काय, असाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. 

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

--------------------------------------------------------
Like & Follow us
--------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या