देश संकटात असताना अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या चकचकीत सेवा देणाऱ्या कंपन्या कुठे गायब झाल्या? - अजयजी पतकी

#वेबसंवाद 
देश संकटात असताना अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या चकचकीत सेवा देणाऱ्या कंपन्या कुठे गायब झाल्या? - अजयजी पतकी

देवगिरी। कोरोना संकटामुळे देश मोठ्या संकटात असताना चकचकीत सेवा देणाऱ्या अमेझॉन, फ्लिपकार्ट, डोमिनोज, झोमॅटो यासारख्या कंपन्या कुठे गायब झाल्या, असा सवाल उपस्थित करत करत प्रा. अजय जी पतकी यांनी स्वदेशी व आत्मनिर्भर भारत अभियानाचे महत्व पटवून दिले. प्रा. अजयजी पतकी हे स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय सह-संयोजक आहेत. देवगिरी विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित ऑनलाईन वेबसंवाद दरम्यान ते बोलत होते.

भारतातील कंपन्या, आपल्या जिल्ह्यातील गावातील उद्योग समूह, किराणा दुकानदार, छोटे व्यापारी आज देश संकटात असताना आर्थिक व प्रत्यक्ष सेवेच्या स्वरूपात कर्तव्य बजावत आहेत.  परंतु, अश्या परिस्थितीत देशात चकचकीत सेवा देणाऱ्या अमेझॉन, फ्लिपकार्ट, झोमॅटो, स्वीगी, मॉल्स व मल्टीनॅशनल कंपन्या कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला. देश व समाज संकटात असतो तेव्हा जे धावून येतात त्यांना आपण प्राधान्य दिले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. या मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या स्वतःच्या देशात फायदा घेऊन जातात. येत्या काळात समाजाने याचा विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले. 

कोरोनाच्या निमित्ताने आपल्या अनेक बाबी लक्षात येत आहे. त्यामुळे स्वदेशीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने तब्बल 20 लाख कोटी एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद केली आहे. स्वदेशीचा पाठबळ देण्यासाठी सरकार प्रयत्नशिल दिसून येत आहे, त्यामुळे आता जनतेने पंतप्रधानाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले. 

आत्मनिर्भर भारत संकल्पना: 

प्रा. पतकी यांनी पुढे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचे राष्ट्रीय, सामाजिक व सांस्कृतिक आयाम स्पष्ट केले. ते म्हणाले, निसर्ग आपल्या सर्व आवश्यकता पूर्ण करू शकतो, पण हव्यास नाही. हा हव्यास सोडणं म्हणजेच स्वदेशीचे वाटचाल प्रगत करणे होय. घरगुती तयार होणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देणे म्हणजेच स्वदेशीचे आत्मसात करणे आहे. आपल्या गावातील, जिल्ह्यातील व अत्यावश्यक असल्यास अन्य राज्यातील सेवा व वस्तूंचा उपयोग करणे म्हणजे स्वदेशी, असे त्यांनी सांगितले.  स्वदेशीचा अवलंब करताना ब्रँडेड चा आग्रह सोडून अत्यावश्यक व देशांतर्गत अनुपलब्धता असलेल्याच सेवा वस्तूंचा वापर केला पाहिजे. यातूनच आत्मनिर्भरता यशस्वी होईल असे त्यांनी सांगितले. या संकल्पना स्पष्ट करताना "आदत से देशी", "जरूरत में स्वदेशी" आणि "मजबूरी में विदेशी" हे आयाम समजावून सांगितले. 

जगातील उपभोक्तावादी विकासाचं मॉडेल अपयशी

विकासाकरिता जगातील आजची उपभोक्तावादी संकल्पना तकलादू असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विकासाच्या नवीन मॉडेलचा जगणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंसाठी पर्यायी व्यवस्था उभी करणं भारतातील उद्योजकांच्या समोर आव्हान असून ते नक्कीच यात यशस्वी मार्ग शोधतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. स्वदेशीसाठी केवळ विचार न करता व्यवहारात व कृतीत बदल करावा लागेल असे सांगताना वीज, पाणी, कोळसा यांचा गरजेपुरता वापर करण्याची सवय आपल्याला करावी लागेल असे त्यांनी सांगितले. 

- विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या