प्रिंट मीडियासमोरील आव्हाने या विषयावर वेबसंवाद संपन्न
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाचक व वृत्तपत्रे यात नवसंबंध निर्माण करण्याचे अधिक प्रयत्न करावे लागतील - सहभागी मान्यवरांचे एकमत
देवगिरी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील पत्रकारिता आणि त्यात छापील माध्यमांचे योगदान यावर नारद जयंतीचे औचित्य साधत आज दिनांक २५ मे रोजी देवगिरी विश्व संवाद केंद्र आयोजित वेबसंवादामध्ये मान्यवर संपादक उपस्थित होते.
यात लोकमत समाचारचे संपादक श्री. अमिताभजी श्रीवास्तव, दै. जनशक्तीचे जळगाव विभागाचे निवासी संपादक डॉ. युवराजजी परदेशी आणि रा.स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख श्री. प्रमोदजी बापट यांनी सहभाग नोंदवत मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनात श्रीवास्तव सरांनी छापील वृत्तपत्रांसमोरची आव्हाने, त्यांचे अर्थकारण, जाहिरात व्यवसायावर बाजार ठप्प असल्याने झालेल्या परिणामांवर बोट ठेवताना वृत्तपत्र व्यवसायाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजच्या घडीपर्यंत कसे बदल स्वतःमध्ये घडवत नेले याचे अभ्यासपूर्ण विवेचन मांडले. १९८० च्या दशकात झालेल्या उदारीकरणाचा दाखला देताना त्यांनी सांगितले, की वृत्तपत्रे ही समाजाचा आवाज आणि जन-प्रबोधनाचे साधन होते. हा मूळ उद्देश काहीसा बाजूला होऊन, काही अंशी उपभोग्य वस्तू म्हणजेच प्रॉडक्ट्स झालीत, त्यामुळे "वाचक हा वाचक न राहता त्याचा ग्राहक झाला". याने वृत्तपत्र आणि वाचक यांच्यातील नात्यात काहीसा दुरावा निर्माण झाल्याने त्यांच्यातला संवाद कमी झाला आहे, तो दोहोबाजूने असावा - यासाठी आता प्रयत्न करणे आवश्यक आहे. छापील माध्यमांच्या भविष्याविषयी बोलताना त्यांनी विकसित देशांचेही उदाहरण दिले. तेथे अजूनही दर्जेदार वृत्तपत्रे आणि प्रकाशन संस्था टिकून आहेत याचा पुनरुच्चार करताना, वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त सकारात्मक वापर करून आपला जनमानसातील सहभाग वाढवला पाहिजे असे मत व्यक्त केले.
या नंतर डॉ. परदेशी सरांनी बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या "दर्पण" या पहिल्या वृत्तपत्राचा उल्लेख करत - कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर अशी विभागणी छापील माध्यमे आणि पत्रकारितेची केली जाईल, असे प्रतिपादन केले. यात ते पुढे म्हणाले, की वृत्तपत्र व्यवसायासमोर आव्हाने अगदी पूर्वीपासून आली आहेत, यात १९३० साली सुरू झालेल्या रेडिओ केंद्रे, १९५९ सुरू झालेला दूरदर्शन, १९९२ सालचा खासगी चॅनेलचा प्रवेश ते थेट २००७ साली सुरू झालेल्या २४ तास वृत्तांकन करणाऱ्या वाहिन्या - यांच्या गदारोळात अजूनही छापील माध्यमे टिकून राहिलीत. कारण वाचकांशी त्यांनी जोडलेली नाळ. आता या कोरोनाच्या काळात मात्र तंत्रज्ञानाची कास धरून त्यांच्या वृत्तपत्राने - कशाप्रकारे समाजात आपले स्थान निर्माण केले हे सांगताना, त्यांनी "गुगलच्या खास माध्यमात आणि वृत्तपत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी झालेल्या परिषदेचा" उल्लेख केला यात मराठी वृत्तपत्र समूहांसाठी देखील खास भर देण्यात आला होता. आपली तांत्रिक बाजू सांभाळून विविध डिजिटल तसेच समाज-माध्यमाचा वापर करत - अधिक वाचकांपर्यंत परिणामकारक रीतीने कसे पोहोचता येईल - याचा उहापोह त्यांनी यात केला.
या वेबसंवादाच्या समारोपात बोलताना श्री. प्रमोदजी बापट यांनी - लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी पत्रकारिता आणि तिच्या अधिक लोकाभिमुख आणि सकारात्मक प्रचार-प्रसारासाठी आजचे पत्रकार बांधव कसे कार्यरत आहेत, तसेच या कोरोनाच्या कठीण काळातही ते आपली सेवा बजावत असून - अभिनंदनास पात्र आहेत, अशी भूमिका मांडली. आजच्या काळातील आव्हाने आपल्याला आपल्या मर्यादा दाखवून देतांनाच - त्यावरील उपाय-योजनांचा, नव्या शक्यतांचाही विचार करण्यासाठीही उद्युक्त करतात. पूर्वीची साप्ताहिके ते आजची न्यूज पोर्टल्स ही वृत्तपत्रांची बदलेली रूपे आहेतचं, मात्र त्या अनुशंगाने आपण एक समांतर अशी तांत्रिकदृष्ट्या योग्य शिक्षण, प्रशिक्षण देणारी आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करणारी व्यवस्था आणि तिचा वापर या माध्यमाच्या वृद्धीसाठी करणे - ही आजची आपल्या समोरील आव्हाने आहेत. असे मत व्यक्त करताना, त्यांनी देवर्षी नारदांचा उल्लेख करत - त्यांचा त्रैलोक्य संचार आणि सकारात्मक कामांना दिलेले उत्तेजन, प्रसिद्धी हीच आजच्या काळातीलही पत्रकारितेचे उत्तरदायित्व आहे आणि त्यासाठी "वाचकाचा ग्राहक" न होता - तो वाचकचं राहावा आणि त्याच्याशी नातं जोडलं जावं- अशी अपेक्षा ठेवत समारोप केला.
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी प्रांत.
0 टिप्पण्या