कोरोनाचा व्यापारी वर्गावर प्रभाव



व्यापारी म्हटला म्हणजे आपल्यासमोर चित्र येते की, एका छोट्याशा जागेत भरगच्च माल भरलेला आहे आणि कुठेतरी एके ठिकाणी मान खाली घालून मालक काहीतरी हिशोबाचे लिहीत बसलेला आहे, दुकानात काम करणारा माणूस असेल तर तो काहीतरी आवरत आहे, माल जमवत आहे किंवा साफसफाई करीत आहे.

हो, अगदी बरोबर आहे. आज हीच परिस्थिती आहे. मोठे दालन, मॉल सोडले तर कमी-अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. लहान गावात, शहरात थोडाफार स्थानपरत्वे फरक जाणवतो. 

व्यापारी नेहमीच दैनंदिन व्यवहारातील अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आला आहे. तो स्वतःच्या दहा पैशाच्या नफ्यासाठी एक रुपयाची मेहनत करतो. अनेक प्रकारचे कर, सर्व प्रकारचे खर्च, चोरी, डुबत खाती यातून वर्षाखेरीस जे उरेल ते त्याचे. काही नफा राहील की नाही, किती राहील याची कोणतीही शाश्वती नसते. तरी ग्राहकाला चांगल्यातली चांगली सेवा देण्यास तत्पर असतो. दुकानावरील विश्वास टिकवण्याचा प्रयत्न करीत असतो.

मार्च अखेर पासून पूर्ण भारतात कोरोनाने अकांडतांडव माजवले आहे. यात कोणताही वर्ग, समाज, गाव, शहर महानगर किंवा राज्य अबाधित राहिलेले नाही. कोरोनासमोर सगळे सारखे. कोरोनाने सर्वांना एकाच पातळीवर आणून ठेवले आणि सर्वांना हतबल केले. याचा परिणाम सर्व प्रकारच्या उद्योग व्यवसायावर झाला. यातून छोटे असो की मोठे व्यापारी असो कोणीही सुटले नाही. याचा छोट्या व्यापाऱ्यांवर फार जास्त परिणाम जाणवला. अशा प्रकारचे संकट पहिल्या वेळेसच झाल्यामुळे कशा प्रकारची उपाययोजना करावी हे लवकर लक्षात आले नाही. शासकीय स्तरावरही कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती होती.

ज्यांचा व्यापार छोटा आहे, बँकेचे थोडेफार कर्ज आहे त्यांची अवस्था फार वाईट आहे. बँकेने व्याज माफ केले नाही. दुकाने बंद असतानाही व्याज चालू होते. व्यवसाय नसल्याने कमाई नव्हती. दैनंदिन गरजेचा खर्च तर चालू होता. दुकानाचे भाडे चालू होते. यामुळे आधीच घेतलेले कर्ज आणि परत हे संकट त्यामुळे तो अजून कर्जबाजारी झाला.

मध्यम व मोठा व्यापारी तर अजून जास्त दिव्यातून जात आहे. या बंदच्या काळात व्यापारी उलाढाल संपूर्ण बंद होती. कमाई बंद होती. दुकानातील मोठ्या प्रमाणावरील माल तसाच पडून होता. दुकानातील सर्व कर्मचारी वर्गाचा थोडाफार किंवा काही ठिकाणी पूर्ण पगार चालू होता. बँकेचे हप्ते, व्याज चालू होते. सर्वांप्रमाणे कमाई बंद होती. कर भरणे गरजेचे आहे, त्यावर पण व्याज लागत आहे.

हे तर आज पर्यंत झाले. व्यापारी वर्गाची खरी परीक्षा तर पुढे आहे. आता थोडेफार व्यवहार चालू झाले आहेत. पण, अनेक प्रकारच्या अडचणी समोर येत आहेत. मालाला उठाव नसल्याने मालाचे भाव कमी होत आहेत. दुकानात कर्मचारी कमी करणे गरजेचे झाले आहे. काही ठिकाणी कर्मचारी येतच नाही. आधी जो पगार होता तो देणे परवडत नाही. व्यापारीवर्ग कमीत कमी नफ्यावर जास्त उलाढाल या तत्वावर व्यापार करतात. या बंदच्या काळात मागील उधारी आली नाही. जीवघेण्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी फार मेहनत करावी लागते आणि नेहमी तत्पर राहावे लागते. जे व्यापारी आहेत त्यांना कंपनीकडे काही रक्कम ठेव म्हणून ठेवावी लागते आणि पेमेंट पाठवून माल मागवावा लागतो आणि विक्रेत्यांना काही दिवसाच्या उधारीवर हा माल द्यावा लागतो. या बंदच्या काळात त्याची साखळी पण बंद पडली होती.

यात भरीस भर म्हणजे ऑनलाईन व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक व्यापारी वर्गाला या स्पर्धेलाही तोंड द्यावे लागत आहे. व्यापारी स्वतःच्या जीवावर उदार होऊन व्यवसाय करत आहे, कारण त्याला तर आर्थिक नाकेबंदी मधून बाहेर पडण्याकरिता हे तर करणेच आहे. जेथे परिवारात एकच जण कमवत आहे, तेथे घर भाडे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कुटुंबाच्या दैनंदिन खर्च, औषधे वगैरे खर्च कसा भागवणार? 

जो व्यवसाय चालू आहे तो पुर्णतः चालू नाही. वेळेची अडचण येते. ग्राहकांची संख्या कमी आहे. जो माल आहे तो पूर्ण विकला जात नाही. कारण, पूर्ण रेंज नाही. ग्राहक कमी असल्याने नवीन माल मागण्याची हिंमत होत नाही. सध्या फक्त दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा व्यवसाय चालू आहे बाकी वस्तूंचा व्यापार अजूनही जवळपास ठप्प आहे.

यामध्ये ज्यांचे व्यवसाय मोठे आहेत, ज्यांनी बँकेचे कर्ज घेतले आहेत त्यांना बँकेने अजून जास्तीच्या कर्जाची सोय करून दिली आहे. ती पण परतफेड व व्याज सवलतसह. अशा शासकीय योजनेमुळे छोट्या व मध्यम व्यापारी वर्गाला काहीच फायदा झाला नाही. उलट नुकसानच झाले आहे. काहींनी तर आपली दुकाने बंद करून टाकले आहेत. तसेच कोरोनामुळे जी अभूतपूर्व भीती सर्वांना आहे, त्यामुळे काही व्यवसाय तर कमीत कमी एक वर्ष तरी बंद राहतील. त्यामुळे ही सर्व मंडळी दुसरा काहीतरी व्यवसाय पाहत आहे किंवा नोकरीच्या शोधात आहे. यालाही काही व्यवसाय अपवाद आहेत. परंतु सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात अशाच परिस्थिती आहे. प्रत्येक व्यापारी त्रस्त आहे. दुसरीकडे मास्क व सॅनिटायजर यासारखे नवीन व्यवसाय सुरू झाले आहेत. यावर्षी काही कमावणे ऐवजी फक्त टिकून राहणे हेच महत्वाचे वाटते. सर्वत्र निराशेचे वातावरण आहे. एकमेकांना हिम्मत देणे, संवाद साधणे, कोणतीही व्यक्ती वैफल्यग्रस्त तर होत नाही ना याची काळजी घेणे. इतकेच सर्वांच्या आधी आहे. माझ्या मताशी सर्व जण सहमत असतीलच असे नाही. 
सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. 

- कन्हैयालाल न. शहा, संभाजीनगर
 मो. ९८९०६७३९५५ 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या