कोरोनाबळींच्या अंत्यसंस्कारात या महीलेचाही सहभाग

आपल्याकडे महिलांनी स्मशानात जाणे निषिध्द मानले गेले आहे. पण नाशिकमधील एक महीला चक्क स्मशानात जाते .नुसती जात नाही तर अनोळखी  कोरोनाग्रस्त म्रुतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात सहभागी होते. ही आहे नाशिकच्या एका प्रेरणादायी महीलेची कथा. शुभदा देसाई यांच्या मानवतावादाची कथा.

'कोरोना' भयाने अंगावर काटा आणणारा शब्द ‌.सध्या प्रत्येक जण कोरोना पासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. कोरोना पेशंट पासून तर  चार हात  लांब राहिले जाते .अशा अवस्थेत कोरोनाग्रस्त मृतदेहाजवळ कोण जाणार ? त्याच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार?  सख्खा मुलगा, सख्खे नातेवाईक मृतदेहाला हात लावायला धजावत नाहीत. माणुसकी नाते-गोते वगैरे वगैरे फक्त पुस्तकात वाचायच्या गोष्टी उरतात. अशा भीषण परिस्थितीत या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारी एक भली मोठी टीम तयार झाली आहे अाणि या टीममध्ये आहे एक महिला. खंबीरपणे पुरुषांच्या बरोबरीने, न घाबरता,स्मशानात जाऊन अंत्यसंस्कार करणारी महिला. 

नाशिकमध्ये .रा स्व संघाच्या पुढाकाराने. पन्नास-साठ स्वयंसेवकांनी हे मानवतावादी कार्य हाती घेतले आहे .आतापर्यंत या टीमने 38 मृतदेहांवर माणुसकीच्या नात्याने अंत्यसंस्कार केले.

Covid ने मृत्यू पावलेल्या लोकांचे शव त्यांच्या नातेवाईकांच्या जवळ देत नाहीत. ते सरळ विद्युत वाहिनी  अमरधाम मध्ये न्यायचे असते.  कित्येक पेशंट चे जवळचे नातेवाईक क्वारंटायीन असल्यामुळे अथवा स्वतः बाधित असल्यामुळे अंत्यसंस्कार  करू शकत नाहीत . त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे कार्य करावे अशी विनंती प्रशासनाने केली आणि संघाने हे काम हाती घेतले.

गेले दीड ते दोन महिने हे काम अविरत सुरू आहे. 38 विविध जाती धर्माच्या तसेच लहान मोठ्या स्त्री, पुरुष पार्थिव देहावर या चमूने  अंत्यसंस्कार केले आहेत. या संपूर्ण टीम मध्ये ५०, ६० तरुण स्वयंसेवक. सगळे पुरुषच. एकावेळी त्यातले ६ जण अंत्यसंस्कारासाठी जातात. रुग्णालयातून सगळे कागदोपत्री सोपस्कार आटोपायचे,म्रुतदेह ताब्यात घ्यायचा, शववाहीनीतून स्मशानात न्यायचा. मग तेथे म्रुताच्या नातेवाईंकाना शंभर दोनशे फुट लांब ठेवत म्रुतदेहावर अग्नीसंस्कार करायचे. सगळी क्रिया आटोपली मग स्वत: ३६ तास क्वारंटाईन व्हायचे.  त्यानंतर पुन्हा सेवेला तत्पर .

या कार्यात स्वतःहून सहभागी झालेल्या सौ. शुभदा देसाई सांगतात,
"मन विदीर्ण करणारा अनुभव आहे. सिव्हिल हॉस्पिटल आणि अमरधाम या दोन्ही ठिकाणी आपले मन खंबीर असावे लागते. आपण अशा एका व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत असतो की, ज्याला  आज पर्यंत आपण कधी साधे पाहिले देखील नाही. पण  आपल्यावर आज ही जबाबदारी आली आहे ही जाणीव आपल्याला खंबीर बनवते."

संघाच्या या निस्वार्थी सेवेमूळे समाजावर आणि पगारी कर्मचार्यांवर कसा प्रभाव पडतो,त्यांच्यातली कर्तव्यदक्षता, माणुसकी कशी जागी होते याचं उदाहरण शुभदाताई देतात." एक दिवस शववाहिनीचे ड्रायव्हर होते त्यांनी आम्हाला ६ जणांना उभे करून आमचे हात जोडून आभार मानले. रोज   त्यांची ड्युटी ६ तास असते पण आमच्या टीम चे निस्वार्थ  सेवा कार्य बघून ते आता रोज स्वतःहून ८ तास काम करतात. आमच्या बरोबरची त्यांची ती त्या दिवसातली चौथी चक्कर होती आणि अजुन एकदा ते जाणार होते...."

ह्या कार्यात सहभागी प्रत्येक स्वयंसेवकांची तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सम्पूर्ण काळजी घेतली जाते.  मुख्य टीम चारही जण PPE kit घालतात. सहाय्यक दोघे जण ग्लोव्हज आणि मास्क घालतात. सहायक फक्त मुख्य टीम ला मदतीला असतात. त्यांना गाडीने परत घेऊन येणे त्यांना sanitise करणे, तसेच शासकीय रुग्णालयातील कर्मचार्यांशी आणि नातेवाईकांशी समन्वय साधणे ही कामे सहायक करत असतात.

मुख्य टीम ला भोसला नर्सिंग कॉलेज हॉस्टेल मध्ये ३६ तास quarantine व्हायचे असते. तिथे भोजन , निवास तसेच आरोग्यतपासणीची उत्तम सोय केलेली आहे, असे शुभदाताईंनी सांगितले 

या उपक्रमात पन्नास साठ स्वयंसेवक सहभागी आहेत.संघ स्वयंसेवक प्रसिध्दी पराङमुख असतात. सौ.शुभदा या स्मशानात जाऊन अनोळखी कोरोनाग्रस्ताचे अंत्यसंस्कार करणार्या पहिल्या महिला अाहेत.त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि स्त्री सबलीकरणाला नवा आयाम दिल्याबद्दल त्यांचे नाव लेखात घेतले आहे.

सौ.शुभदा देसाई यांनी जेव्हा या  कामात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर या सेवाकार्यात मार्गदर्शन करणारे आणि  सुरवातीच्या काही अंत्यसंस्कार विधिवेळी स्वतः हजर असणारे  आयाम नाशिक चे अध्यक्ष डॉ.भरत केळकर सरांनी सौ. शुभदाला सहभागी होण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले. शुभदाताईंच्या घरच्या मंडळीनीही भक्कम पाठिंबा दिला. त्या आयाम, नाशिक च्या विश्वस्त असून आयाम दुर्ग दुर्गा या अनोख्या उपक्रमाच्या संयोजक आहेत.
                                                     
-- विभाकर कुरंभट्टी

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या