आद्य चरित्रकार व आत्मचरित्रकार - संत नामदेव

@ गजानन जगदाळे

आज आषाढ कृष्ण त्रयोदशी. आजच्या दिवशी महाराष्ट्रातील जेष्ठ संत नामदेव महाराज यांनी पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील महाद्वारात समाधी घेतली. आजच्या दिवशी महाद्वारातील दगड होण्यात नामदेवांनी धन्यता मानली. पांडूरंगाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांचे पाय मला लागावेत अशी नामदेवांचिची इच्छा होती. 

संत नामदेव हे महाराष्ट्रातील आद्य कवी, आद्य संत तसेच, पहिले चरित्रकार तसेच पहिले आत्मचारित्रकार आहेत. संत नामदेवांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव ह्या गावी कार्तिक शुद्ध एकादशीला झाला. दामाजीशेठ आणि गोणाई यांच्या पोटी विठ्ठलकृपेने नामदेव जन्माला आले. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. नामदेवांचे वडील शिंपी व्यवसाय करत. स्वतःला नामयाची दासी म्हणवणाऱ्या संत जनाबाई ह्या देखील नामदेवांच्या कुटुंबातील एक सदस्य होत्या. नारा, विठा, गोंदा व महादा हे त्यांचे चार पुत्र होते व ते चौघेही थोर विठ्ठलभक्त होते. राजाई त्यांच्या पत्नी होत्या.

संत नामदेवांना लहानपणापासूनच विठ्ठलभक्तीची प्रचंड आवड होती. एकदा त्यांच्या वडीलांनी त्यांना सांगितले की, जेवण करण्याआधी नैवेद्य देवासमोर ठेवून ये आणि मग जेवण कर. तेव्हा नामदेव देवाकडे गेले आणि देवाला प्रत्यक्ष नैवैद्य खायला लावला. असे नामदेव लहानपणापासूनच देवासोबत संवाद करणारे होते.

विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरू होते. संत गोरा कुंभारांकडे ज्ञानदेवादि चार भावंडे जमलेली असताना नामदेवांना नमस्कार केला नाही म्हणून नामदेवांना राग आला. यावरून मुक्ताईने त्यांना कच्चे मडके म्हटल्यावर नामदेव विठ्ठलावर रूसून बसले. यानंतर विसोबा खेचर यांनी महादेव मंदिरात शिवलिंगाकडे पाय ठेवून झोपण्याचे नाटक केले आणि नामदेवांना सगळीकडे देव असल्याचा अनुभव करून दिला. अशा रितीने नामदेव आत्मसाक्षात्कारी बनले.

नामदेव हे महाराष्ट्रातील पहिले चरित्रकार तसेच आत्मचरित्रकार आहेत. कारण त्यांनी रचलेल्या अभंगातून संत निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताई ह्या चारही संत भावडांची चरित्रे स्पष्ट होतात. याचबरोबर नामदेवांनी स्वतःचे चरित्रही अभंगातून मांडले म्हणून ते आत्मचरित्रकारही ठरतात.
संत नामदेवांनी त्यांच्या ८० वर्षांच्या आयुष्यात वारकरी संप्रदायाचा भरपूर प्रचार - प्रसार केला. महाराष्ट्राव्यतिरिक्त नामदेव प्रचार करत पंजाबपर्यंत जाऊन पोहचले आणि तेथेही त्यांनी पंजाबी व व्रज भाषेत अभंग रचना केली. शिखांचा परम पवित्र धर्मग्रंथ गुरूग्रंथसाहिब मध्ये नामदेवांचे एकूण ६२ अभंग समाविष्ट आहेत. शीख बंधू नामदेवांना नामदेव बाबा नावाने संबोधतात.

संत नामदेव महाराज निवृत्ती, ज्ञानदेवादि भावंडाचे समकालीन संत होते. संत ज्ञानदेवांसोबत त्यांनी महाराष्ट्र - गुजरात -राजस्थान - पंजाब - काश्मीर अशी पायी यात्रा करत वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. ज्ञानदेवादि भावंडांनी समाधी घेतल्यानंतर उर्वरित काळात नामदेवांनी कीर्तनच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्याचे मोठे काम केले.

संत नामदेवांनी अभंग रचनेद्वारे एकूण १०० कोटी प्रमाणे (सिद्धांत) रचण्याची प्रतिज्ञा केली होती; मात्र त्यांच्याकडून ९६ कोटी प्रमाणे रचली गेली आणि ४ कोटी शिल्लक राहिली. म्हणून उर्वरित ४ कोटी प्रमाणे रचण्यासाठी नामदेवांनी पुढे संत तुकाराम रूपाने जन्म घेतला आणि १०० कोटी प्रमाण रचनेची प्रतिज्ञा पूर्ण केली. ही गोष्ट तुकाराम गाथेत संत तुकारामांनी तसेच संत रामेश्वर शास्त्रींनीही नमूद करून ठेवली आहे.

नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ।। हा नामदेवांचा प्रसिद्ध अभंग आहे. ह्या अभंगालाच त्यांनी जीवनाचे ध्येय मानून आयुष्यभर कीर्तनाच्या माध्यमातून जगात ज्ञानाचा दिवा लावला. कीर्तन परंपरेला देशात खऱ्या अर्थाने रुजवण्याचे श्रेय संत नामदेवांकडेच जाते.

वारकरी संप्रदायाला महाराष्ट्रात रूजवण्यात संत नामदेवांचे अत्यंत मोलाचे सहकार्य आहे. संत तुकाराम हेच पुर्वजन्मातील नामदेव होते अशी सर्व वारकऱ्यांची श्रद्धा आहे. 'आम्ही प्रत्येक जन्मात हरीच्या सोबत होतो' असा तुकाराम महाराजांचा अभंग देखील आहे. सत्ययुगात ते प्रल्हाद होते, त्रेतायुगात अंगद होते, द्वापरायुगात उद्धव होते आणि कलियुगात नामदेव रूपाने जन्माला आले. यानंतर ते अभंग रचनेची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तुकाराम रुपाने पुन्हा जन्माला आले. "तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।" ह्या तुकोक्तीतून ह्या सत्याचा प्रकर्षाने प्रत्यय येतो.

अशा थोर विठ्ठलभक्ताची व महान संताची आज पुण्यतिथी. नामदेवांचे ऋण ही माती कधीच विसरू व फेडू शकत नाही. संत नामदेवांना कोटी कोटी नमस्कार.

(लेखक संतचरित्र व संत वाङ्मयाचे अभ्यासक आहेत) 

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या