कुशल व्यवस्थापक म.गो.खाडीलकर

🪔नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती...

संघाच्या शाखेत आपल्याला अनेक स्वभावाचे, विविध विषयात आवड असणारे स्वयंसेवक भेटतात.एखाद्या स्वयंसेकाला शारीरिक विषयाची आवड असेल तेव्हा त्याच्या संपर्कात आलेले म्हणतील, संघ अनुशासनबध्द शिस्तप्रिय संघटना आहे.एखादा स्वयंसेवक संघातील सेवाभावी कार्यक्रमास अगक्रम देत असेल तेव्हा  त्याच्या संपर्कात येणारे म्हणतील संघ सेवाभावी आहे.काहींना संघाच्या स्वयंसेवकांचे चारित्र्य, निस्पृहपणा, प्रामाणिकपणा याविषयी प्रबोधनात रस असेल तेव्हा त्यांच्या संपर्कात आलेले म्हणतील, संघ प्रामाणिक, चारित्र्य संपन्न  संघटना आहे.मधुकरराव खाडीलकर या गटात काम करणारे स्वयंसेवक होते.चारित्र्य,निस्पृहपणा, प्रामाणिकपणा यावर केवळ प्रबोधन न करता ते स्वतः आचरण करत. ते शनिपेठेत राहात असतांना गुरुगोविंदसिंह प्रभात शाखेत जात असत.
 
मधुसुदन उर्फ मधुकर गोविंद खाडीलकरांचा जन्म. 25 डिसेंबर 1940 ला झाला. वडिल रेव्हेन्यू खात्यात नोकरी करत असतांना महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात भाग घातल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली. मधुकररावांच्या शालेय जीवनात वडिलांचे निधन झाल्याने घरची जबाबदारी मोठ्या भावावर आली. मधुकररावांचा शालेय जीवनात हुशार विद्यार्थी म्हणून लौकिक होता. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी सांगली येथे अवास्तव खर्च न करता काटकसरीने सिव्हिल इंजिनीअरची पदवी प्राप्त केली. नोकरी न करता स्वतःचा स्वतंत्र  व्यवसाय सुरु करण्याचे त्यांनी अगोदरच ठरवले होते. जळगांवात त्र्यंबक इंजिनीअर्स अँड काँट्रॅक्टर्स या नावाची फर्म उभी केली. मधुकरराव यांचा  विवाह शशिकला (कोल्हटकर) यांचेशी धुळे येथे झाला. घरातील सात्विक वातावरणाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर नकळत झाला.त्यांच्या मोठ्या भावामुळे ते संघात आले.

मधुकररावांचे व्यवसायिक जीवन

मधुकररावांनी जळगांवात व्यवसायास सुरवात केल्यावर त्यांनी व्यवसायात काय करावे व काय करु नये अशी बंधने स्वतःहूनच घालून घेतली होती आणि ती मुल्ये त्यांनी जीवनभर पाळली. जळगांवात बिल्डींग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केल्यावर  मोठे काम त्यांना पाॅलिटेक्नीक काॅलेजचे मिळाले.ते काम त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने Turning Point ठरले. कामाची Quality व कामास लागणारा वेळ हे मध्यमवर्गीय लोकांना परवडणारे होते. आम्ही घाणेकर कुटुंबीय याचे साक्षीदार आहोत.पोस्टल काॅलनीतील परशुराम अपार्टमेंट व बळीराम पेठेतील 'सार्थक' ह्या राहते घराच्या बाबतीत आम्ही समाधानी आहोत. मधुकररावांचे सर्व व्यवहार पारदर्शी असत. सन्माननीय करदात्यांचे ते उदाहरण होते.

आदर्श व्यवस्थाप्रमुख :

मधुकरराव अनेक वर्ष जिल्हा व्यवस्थाप्रमुख होते.संघाचा आय आणि व्यय पाहण्याची जबाबदारी प्रामुख्याने व्यवस्थाप्रमुखाकडे असल्यामुळे मधुकरराव सर्व व्यवहार काळजीपूर्वक पाहात असत. संघाचा 'गुरुदक्षिणा समर्पण ऊत्सव' हेच केवळ उत्पन्नाच साधन असल्यामुळे पूजन व समर्पण करणा-या स्वयंसेवकांची संख्या मर्यादित असल्यामुळे आय-व्यय याची तोंड मिळवणी करतांना मधुकररावांना तारेवरची कसरत करावी लागे.त्यामुळे गुरुदक्षिणा वाढली पाहिजे असा प्रयत्न मधुकरराव करत असत.

शाखेच्या  समर्पणाचा आकडा (रुपयात) दरवर्षी वाढता असला पाहिजे, असे मधुकररावांचे मत असे. शाखेवरील पूजन करणा-या स्वयंसेवकांची संख्या वाढली पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. काही स्वयंसेवक समर्पण करतांना समर्पणाचा भाव लक्षात न घेता आर्थिक स्थिती सक्षम असूनही कमी समर्पण करत. मधुकरराव अशा स्वयंसेवकांची यादी करुन प्रत्यक्ष भेटीस जात असत. अशा नाजूक विषयांवर बोलतांना स्वत:चा नैतिक अधिकार असला पाहिजे, तो अधिकार मथुकररावांपाशी होता. त्यांचे स्वतःचे समर्पण वाढत्या उत्पन्नाच्या प्रमाणात वाढते असायचे.
त्यांचे संघाच्या खर्चावर लक्ष असायचे. संघामध्ये खर्च काटकसरीनेच व्हावा असे त्यांचे मत असे. संघाचे काम करत असतांना प्रवास खर्च, बैठक खर्च, उत्सव खर्च, कार्यालय भाडे, संघाच्या अधिका-यांचा प्रवास खर्च असे विविध खर्च करावे लागतात. हे खर्च करत असतांना टाळता येऊ शकणा-या खर्चाची मधुकरराव स्पष्टपणे कल्पना देत असत. गुरुदक्षिणेतल्या पैशांचा विनियोग योग्य कारणासाठी व्हावा असे त्यांना वाटे.प्रत्येक खर्चाचे व्हाऊचर (पावती) त्यांना लागत असे. प्रचारक देखील स्वतःचे मासिक आयव्यय पत्रक देतांना काळजी घेत असत.

वाचनप्रिय मधुकरराव 

मधुकररावांना वाचनाची विशेष आवड होती.नवीन वाचनीय  पुस्तक  बाजारात आले की ते पुस्तक खरेदी करण्या-यात त्यांचा अग्रक्रम असे.बरेच वेळा संघ कार्यकर्ते उत्सवात वक्ता म्हणून जात असत तेंव्हा मधुकररावांच्या पुस्तक लायब्ररीचा उपयोग होत असे.चांगले पुस्तक हाताळणा-यालाच ते पुस्तक वाचण्यास देत असत.ते पुस्तकांवर जीवापाड प्रेम करत. भारतीय विचार साधनेनी प्रकाशित केलेली  संघ विचारांशी संबंधित बरीच पुस्तके आज देखील मधुकररावांच्या लायब्ररीत उपलब्ध आहेत.

व्यवस्थापकीय संचालक  ( Managing Director )

1978 मधे जळगांव जनता सहकारी बँकेची स्थापना झाल्यावर मधुकररावांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली. Managing Director ह्या पदावर काम करत असतांना केवळ एक रुपया मानधन घेऊन ते काम करत असत.बँकेच्या सभासदांचे हित हे सर्वतोपरी असल्यामुळे बँकेत अनावश्यक खर्च कमी करत. बँकेत स्टेशनरीवर खर्च जास्त होत असल्याचे दिसताच त्यांनी सर्व कर्मचारी बंधुंना एकत्र बोलावून त्यांना खर्च कमी करण्याबाबत सुचना केल्या, ही कर्मचारी बंधुंची मिटींग घेत असतांना आपले म्हणणे सप्रमाण ते पटवून देत.त्यांनी बँकेच्या शिपायास बोलावून लोहचुंबक मागून घेतले व बँक कर्मचारी काम करतात त्यांच्या टेबलाखालून ते लोहचुंबक फिरवण्यास सांगितले ब-याच टाचण्या त्या लोहचुंबकाला चिकटून बाहेर काढल्या. छोट्या छोट्या गोष्टीतून मधुकरराव बँकेत काटकसरी कसे वागले पाहिजे याचे उदा.देऊन प्रबोधन करत. मधुकररावांच्या जीवनपटाचा समारोप करतांना, मधुकरराव उत्कृष्ट वक्ता, संघटक नव्हते परंतु संघाच्या स्वयंसेवकाने आपल्या जीवनात जी जीवनमुल्ये अधोरेखित केली आहेत त्याचे मधुकरराव आदर्श उदाहरण होते. आपल्या वागणुकीतून ते अनेकांना प्रबोधन करत.त्यांच्यावर अती काटकसरी (कंजूष) अशी टीकाही बँकेत संचालक असतांना झाली पण त्या टीकेकडे दुर्लक्ष करून सभासदांच्या हिताचा त्यांनी विचार केला. आज बँकेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे, इतर बँकाशी स्पर्धा वाढल्या आहेत,बँकेचा खर्च वाढत आहे असे असले तरी मधुकररावांनी बँकेच्या खर्चाच्या बाबतीत जो मापदंड घालून दिला त्याची कार्यवाही आजही तेवढीच आवश्यक आहे.संघाच्या बाबतीत आदर्श व्यवस्था प्रमुख म्हणून सदैव लक्षात राहतील.पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारे, निगर्वी, चारित्र्य संपन्न मधुसुदन गोविंद खाडीलकर जळगांवकरांच्या  नेहमी  स्मरणात राहतील.

दीपक गजानन घाणेकर 
(9423187480)

-------------------------------------------

मनोगत.......

श्रीमती शशिकला खाडीलकर (पत्नी)

श्री. मधुसूदन गोविंद खाडिलकर..
जन्म 25 डिसेंबर 1940
मृत्यु 1 जानेवारी 2016
चार बहिणी व एक भाऊ यांचा धाकटा लाडका भाऊ, वडिल रेव्हेन्यू खात्यात, सुखवस्तू कुटुंबात जन्म.

गांधीजींच्या असहकार आंदोलनात भाग घेतल्यामुळे वडिलांची नोकरी गेली. भाऊ - सच्चीदानंद इंजिनिअर होऊन त्याने स्वतःचा construction व्यवसाय अमळनेर येथे सुरू केला व तेथेच स्थायिक झाला. वयाच्या 14 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले आणी सगळे कुटुंब अमळनेरला रहायला गेले. तोपर्य॔त (दहावी पर्यंतचे) शिक्षण ला.ना. शाळेत 11 वी अमळनेर मधून, त्यावेळी बोर्डात यादीत नाव लागले. 

लहानपणापासूनच इंजिनियर होऊन बिझिनेस करायचे हे मनाशी नक्की केलेले. पहिल्या यादित सांगलीच्या वालचंद काॅलेजमधे नाव लागले तिथे अॅडमिशन घेतली. भावावर सगळ्यांची जबाबदारी आहे वायफळ खर्च नको म्हणून नाटक-सिनेमा बघायचे नाही आणि कुठल्याही सहलींना जाऊन खर्च करायचा नाही, पैसे वाचवायचे त्यातून जमतील तेवढी पुस्तके घ्यायची हा ध्यास घेतला.
अमळनेरला भाऊ संघाचा कार्यवाह म्हणून काम पहात होता, त्याच्याकडे संघाचे सर्व वरिष्ठ जसे अटलबिहारी वाजपेयीजी, गुरूजी आणि अनेक जण कायम येत, त्यात संघाची विचारसरणी समजली-आवडली आणी तीच आत्मसात केली व शेवटपर्यंत जपली. व्यवसायात दिवसा संघासाठी वेळ देता येत नव्हता तरी सकाळची प्रार्थना नेमाने शाखा स्थानावर जाऊनच म्हंटली. आणीबाणीच्या आधी संघाचे व्यवस्थाप्रमुख म्हणून जबाबदारी अंगावर घेतली आणि एकेक पैशाचा हिशोब ठेवला, आणीबाणीत जे काही लोक सुरवातीच्या काळात आत गेले त्यातच तेही होते. तो काळ खूप कठीण होता, कुठलीच शाश्वती नव्हती, कधी बाहेर पडू याविचाराने कोणीही depression मधे जाईल. सगळ्यांना आशावादी ठेवण्यासाठी सकाळी सूर्यनमस्कार करायला शिकवले, इतके की जेलमधले पोलीस सुद्धा त्यांचे बघून रोज सूर्यनमस्कार घालू लागले. 

व्यवसायात सुद्धा सगळे व्यवहार एकदम कायद्याच्या चौकटीत बसवून केले, construction business सगळ्यात corrupt business समजला जातो पण खाडिलकरांकडे त्या शब्दासाठी जागाच नव्हती. त्यांनी ज्यांची घरे बांधली ते नेहमीच कामाबाबत समाधानी होते, आणी म्हणूनच mouth publicity  ने बरीच कामे मिळत गेली. त्याकाळात engineering degree घेतल्यावर चांगल्या पगाराची नोकरी पुण्या मुंबईला मिळे, त्यामुळे जळगावात रहायला कोणी फारसे उत्सुक नसे. अर्थातच साध्या गवंड्याकडून काम करून घेण्यापेक्षा लोक खाडिलकरांकडे काम सोपवू लागले.

आणीबाणीनंतर परत इंदिराजींचे सरकार आले आणी लोकं संघवाल्यांकडे काम द्यायला घाबरू लागले, त्यात कामे बरीच कमी झाली. याच काळात समविचारी लोकांना बरोबर घेऊन जळगाव जनता सहकारी बँकेची स्थापना केली. स्वतःहा managing director हे पद सांभाळले. हिशोब इतके जलद करीत की नुसती नजर टाकली तरी चूक शोधत. म्हणजे बँकेतले कर्मचारी ऑडिटरला सांगत, खाडिलकर साहेबांना चूक सापडली नाही म्हणजे तुम्हाला मिळणे शक्य नाही.
80-85 च्या दरम्यान जळगावात बर्याच हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या. घराच्या समोरच्या गल्लीत मुसलमानांची वस्ती होती. साधारणपणे दंगलीला सुरूवात म्हणजे त्यांच्या मोहल्यात जमाव एकत्र यायचा आणि आरडाओरडा दगडफेक सुरू व्हायची, यात जोपर्यंत खाडिलकर बाहेर उभे असायचे तोपर्यंत एकही दगड घरावर यायचा नाही, अशा परिस्थितीत घाबरून घरात बसले तर कोणीच नावं ठेवणार नव्हते पण धिटाईने समोर जाऊन मागे फिरा सांगायची हिंमत त्यांच्यात होती आणि त्यांच्या समोर त्यांच्यावर दगड भिरकावण्याची हिंमत जमावात नव्हती किंवा आदर होता.
सर्व विचारसरणीच्या लोकांची पुस्तके विकत घेतली व लोकांसाठी मोफत ग्रंथालय चालवले. यातील बऱ्याच पुस्तकांचे वाचन केले होते. कुठलाही संदर्भ कुठल्या पुस्तकात मिळेल हे त्याना नक्की माहित असायचे. जरी त्यानी फारशी ठिकाणे बघितली नाहीत तरी कोणत्या ठिकाणाचे काय वैशिष्ट्य आहे हे त्याना माहित असायचे. कुटुंब व्यवस्थेवर त्यांचा खूप विश्वास होता. घरी शिजवलेले ताजे अन्नच सगळ्यांनी खावे, एकत्र जेवण करावे व शिजवलेले अन्न वाया जाऊ द्यायचे नाही हा त्यांचा आग्रह होता. कोणाला 70% मिळाले तर पुढच्या वर्षीची शाळा सुरू होईपर्यंत उरलेल्या 30% अभ्यास करून ठेव म्हणजे पुढचे वर्ष जड जाणार नाही ही त्यांची शिकवण होती. कधीच कशाच साठी त्यानी आदळ आपट केली नाही की आवाज चढवला नाही, त्यांना काय अपेक्षित आहे ते खूप स्पष्ट होते आणि ते मिळवण्यासाठी स्वतः कष्ट घ्यायची त्यांची तयारी होती.

70 च्या दशकात कामावरच्या मजूरांची दारू सोडवण्यासाठी, ज्या दिवशी दारूपिणार नाही त्याच्या नंतरच्या दिवशी एक रूपया बक्षिस देऊन काही मजूरांची दारू सोडवली. दरवर्षी आसाममधील दोन मुलांच्या शिक्षण व रहाणीमानाचा, यमगरवाडीतील एका विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च ते करीत होते. Constro world  च्या जीवनगौरव पुरस्काराने त्याना सन्मानित करण्यात आले होते.
 ___________

सौ.सुनेत्रा काळे (मुलगी)

बाबा - स्वतःच्या आचरणातून वागण्या बोलण्याचे धडे देणारे आमचे बाबा!

बाबांच्या आठवणी- खूप लहान होते, कडेवर बसायचे तेव्हाची गोष्ट. रात्री बहूदा मी खूप दंगा करीत होते म्हणून आईने बाबांना सांगितले, त्यांनी मला कडेवर घेतले आणि तळघरात उतरले,"इथे ठेवू?" आमच्या तळघरावर देवघर होते, मी लगेच म्हणाले "बाप्पा बघतोय", पटकन हसले," मग नाही नं मस्ती करणार?" मी मान डोलवली आणि विषय संपला. आरडाओरडा नाही आदळआपट नाही, मारण्याचा तर संबंधच नाही. खूप लहान वयातला हा प्रसंग अजूनही विसरले नाही.

4 थीत स्काॅलरशीप मिळाली त्याचे पैसे 5 - 6 महिन्यांनी मिळाले. खूप आनंदात मी त्यांना दिले. तशी लगेच जनता बँकेचा फाॅर्म काढून हातात दिला आणि खाते उघडायला सांगितले, मी म्हणाले "त्यातले मला कळत नाही", त्यावर उत्तरले, 'कमवणार्याला हे कळालेच पाहिजे.'

याच वयात सकाळी 5 वाजता उठायचे आणी रात्री 11 पर्यंत जागावे म्हणून रोज 1 रू. सकाळी वेळेत उठले तर आणी 1 रू वेळेत झोपले तर आमच्या अकाऊंटला जमा केले. हातात कधी पैसे दिले नाहीत आणी बाहेरचे कधी खाऊ दिले नाही. आम्हाला आईस्क्रीम आवडते म्हणून फ्रीज घेतला आणि घरी करून खा असे सांगितले. रस्त्यावरची धूळ उडलेले पदार्थ खाणे किती वाईट हे मनावर इतके बिंबले होते की स्वतः कमवायला लागल्यावर सुद्धा कधी इच्छा झाली नाही. 

माझ्या 12 वीच्या परिक्षेच्या वेळी जवळच्या नातेवाईकांकडे  मौंज होती, त्यामुळे मला एकटीला 2 दिवस घरी रहावे लागले. तेव्हा घरातील दागिने बँकेच्या लाॅकरमधे ठेवा, या माझ्या सांगण्यावर, 'चोर आलाच तर पुस्तकांना हात लावू देऊ नकोस ती परत मिळवणे कठीण आहे', असे सांगून एकप्रकारे priority ठरवण्यासाठीचा धडाच घालून दिला.

लायसन्स मिळाल्याशिवाय गाडी चालवायची नाही, हाच दंडक. आपण चुकीचे वागले नाहीतर कोणीही आपल्याला त्रास देऊ शकत नाही, म्हणून नेहमी खरे बोलायचे आणि खरे वागायचे हीच शिकवण!
80-85 च्या सुमारास नेहमीच जातीय दंगली होत होत्या, आमच्या समोरच्या गल्लीत त्यांची वस्ती, पहिला दगड आमच्या घरावर ठरलेला!

एकदा बाबा घरी होते, समोरच्या गल्लीत अचानक गलका ऐकू आला, आम्ही दोघे अंगणात गेलो. जमाव आरडाओरड करीत पुढे येत होता, आणि बाबा,"थांबवा हे सगळं, मागे व्हा", असे सांगत तिथे उभे होते, मी घाबरले आणि त्यांना आत ओढले, आणि आमच्या खिडकीची काच फुटली! तेव्हा म्हणाले, घाबरून कसे चालेल, धीट व्हायला हवे!
नेहमी वेगवेगळ्या समाजसेवी संस्थांना, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पाठवत! 

नेहमीच वेगवेगळ्या विचारवंतांची पुस्तके घेऊन येत, आणि सर्व लेखकांच्या लिखाणाचा अभ्यास करीत, त्यातले सार नोंदवून ठेवत!
एकही दिवस सुट्टी घ्यायची नाही, सकाळी 8 ते रात्री 8 ऑफिस चालू ठेवायचे. या त्यांच्या वर्तणुकीतून मेहनतीचे महत्व न सांगताच शिकवले.
Construction business मधे राहून इतके सरळ आणि पारदर्शक, तत्वाला धरून काम करणारे फार कमी लोक असतात!
Constro world  ने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.

सौ. अदिती (सुनेत्रा)

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या