छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले मराठी आरमार

आज २४ ऑक्टोबर म्हणजेच  मराठी आरमार दिन...

ज्याचे आरमार,त्याचा समुद्र !!

छत्रपती शिवाजीमहाराजांनी बलाढ्य आरमाराची निर्मिती करुन  पोर्तुगिज ,इंग्रज,सिद्दी आदी जलचर राजवटींना पायबंद घातला.

त्यापूर्वी पोर्तुगिज लोक समुद्रावर आपले वर्चस्व गाजवत होते. पोर्तुगालचा राजा म्हणजे "साता समुद्राचा धनी" अशी त्यांची  समजूत होती. समुद्रावर प्रवास करण्यासाठी पोर्तुगिजांचा "कार्ताझ" म्हणजे परवाना घ्यावा लागायचा. जमिनीवर हूकूमत गाजवणार्या मुघल बादशाहाचीही त्यातुन सुटका नव्हती.

पोर्तुगिज आणि सिद्दी या धर्मांध राजवटी होत्या. गोव्यात पोर्तुगिजांनी हिंदुच्या कत्तली केल्या. धर्मांतरे घडवली. सिद्दीनीही कोकण किनारपट्टीवर हैदोस घातला होता. मुलींना पळवुन गुलामांच्या बाजारात त्यांची विक्री केली जात होती. प्रजेला पुत्रासमान मानणार्या छत्रपती शिवाजीमहाराजांना हे  सहन होणे कदापि शक्य नव्हते. या समुद्रावरील अन्यायी शक्तीला रोखण्यासाठी आवश्यकता होती - एका स्वतंत्र आरमाराची!!

महाराजांनी  धनत्रयोदशीच्या शुभमुर्हूर्तावर मराठी आरमाराचा पाया घातला. कल्याण,भिवंडी,पेण येथे गलबत,गुराब,पाल,शिबाडे, तारवे आदी नौकांची निर्मिती केली.
सिंधुदुर्गासारख्य बलाढ्य सागरी किल्ल्याची निर्मिती करुन आपले  आरमार भक्कम केले. म्हणूनच महाराजांना "भारतीय आरमाराचे जनक" म्हणतात.

डोंगरातला शिवाजीराजा आता समुद्रात उतरला म्हणून परकीय राजवटी भयभीत झाल्या. महाराजांनी समुद्रमार्गे बसरुरवर स्वारी केली. इसवी सन 1666 मध्ये शिवाजीमहाराजांचे आरमार इतके बलाढ्य झाले की, त्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य आमच्यात नाही ,अशी कबुली इंग्रजांनीच लिहून ठेवली आहे. "आम्ही जगातील उत्तम दर्यावर्दी"  अशी घमेंड मारणार्या इंग्रजांचा छ.शिवरायांनी थेट समुद्रात पराभव केला.

पुढे स्वराज्याचे सरखेल कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या वंशजांनी  मराठ्यांचे आरमार इतके प्रबळ केले की , परकीय राजवटींना  समुद्रावर फिरण्यासाठी मराठ्यांचा दस्तक अर्थात परवाना घ्यावा लागत असे.

कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करून ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्ल्यावर तोफांचा मारा केला, पण हा हल्ला अपयशी ठरला. इंग्रजांनी पुन्हा  माघार घेतली.

१७२१ मध्ये पोर्तुगीज आरमाराने आणि इंग्रज आरमाराने मिळून ६००० सैनिकांसह आणि ४ मोठ्या जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घ्यावी लागली,एवढे सामर्थ्य मराठी आरमारात होते अशा  या कान्होजी आंग्रेंना  इंग्रज आणि पोर्तुगीज आरमार सुद्धा घाबरून होते. शेवटपर्यंत त्यांनी समुद्र संरक्षण करण्यात आपले आयुष्य खर्ची केले. छ. शिवरायांची प्रेरणा ह्रदयात धारण करत आंग्रे घराण्याने समुद्रावर मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.

पण दुर्देवाने आपल्या नंतरच्या सत्ताधिशांनी छ. शिवरायांची ही दूरदृष्टी टिकवली नाही. आरमाराचा अभाव म्हणजे पारतंत्र्य हेच आम्ही विसरलो. स्वातंत्र्यानंतरही आम्ही सागरी सुरक्षेकडे दुर्लक्षच केले. १९९३ चे मुंबई बाॅम्बस्फोट असतील किंवा २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला असेल,तो समुद्रमार्गेच झाला होता,कारण आम्ही छ,शिवरायांचा सागरी सुरक्षेचा विचार विसरलो!!

मराठी आरमाराची स्थापना करत परकीय जलचर राजवटींना पायबंद घालणार्या, आपल्या पराक्रमाने दाहीदिशा उजळून टाकणार्या आणि हिंदुचे रक्षण करणार्या छत्रपती शिवरायांना "शिवशंभु विचारदर्शनच्या" वतीने मानाचा मुजरा!!

- रवींद्र गणेश सासमकर

©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या