'अशोकजी सिंघल' अनेक भारतीय लोकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदु असलेले व्यक्तिमत्व, काहीसे कठोर, बऱ्यापैकी शिस्तप्रिय, आक्रमक पण खरं सांगु अशोकजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक छटा बाहेरच्या जगाला दिसल्या किंबहुना दाखविण्यात आल्या पण कदाचित एक छटा बाहेरच्या जगाला फारशी कधी दिसलीच नाही किंवा कदाचित ती अभिप्रेत देखील नसावी, आणि ती होती 'स्वयंसेवक' अशोकजींची. आम्ही नागपुरची स्वयंसेवक मंडळी तशी बऱ्यापैकी भाग्यवान कारण ज्या लोकांचं जीवनच एक कादंबरी सारखं असत अशी कित्येक मंडळी आम्ही जवळून बघितली नव्हे ही सगळी मोठी नावं त्यांच्या खऱ्या आयुष्यात कसे वागतात बोलतात हे जवळून बघता आले. पण बिलिव्ह मी सत्तेच्या, समाजाच्या शिखरावर असणारी ही जवळपास सगळीच मंडळी कमालीची जमिनीशी जुळलेली आणि तितकीच सभ्य व्यक्तिमत्व होती.
अशोकजींची आठवण सांगायची तर १०,१२ वर्षांपूर्वीची प्रतिनिधी सभा असेल नागपुरला अशोकजींच्या प्रबंधक व्यवस्थेत ५ दिवस राहता आलं. तेंव्हा माझं महाविद्यालयीन जीवन सुरु होतं, आणि राम मंदिर आंदोलनाबाबत आज जितकं आकर्षण आहे त्यापेक्षा कैक पटीने अधिक तेंव्हा होतं. एका रात्री त्यांच्या मागे लागुन आम्ही ६-७ स्वयंसेवकांनी अगदी जमिनीवर बसुन साक्षात अशोकजींकडुन रामजन्मभूमी आंदोलनाची कथा ऐकली होती. संत समाज ह्यांचं एकत्रीकरण ते कारसेवा, अनेक मुद्द्यांवर ज्या प्रभावीपणे अशोकजींच्या ओघवत्या वाणीत आम्ही रामजन्मभूमी आंदोलनाची कथा ऐकली होती तेंव्हा साक्षात महर्षी वाल्मिकींच्या तोंडून रामायण ऐकण्याचा अनुभव काय असतो ह्याची प्रचिती आली होती. अशोकजींची दिनचर्या देखील अगदी संघप्रचारकाला शोभेल इतकी साधी सरळ होती. पहाटे साडे तीन वाजता दिवस सुरु व्हायचा आणि दिपनिमिलन रात्री अकराला!! त्यात त्यांना शेवटपर्यंत Z+ सुरक्षा होती त्यामुळे त्यांच्या व्यस्त दिनचर्येपायी कधीकधी सुरक्षारक्षक आणि त्यांचे स्वीय सचिव ते व्यवस्थेतील सगळीच मंडळी ह्यांची तारंबळ उडायची!! एकदा तर अशोकजी आंघोळीला जात असतांना त्यांच्या बंदुकधारी सुरक्षा रक्षकाला म्हणाले होते 'अब हमे स्नान करने दीजिये, हम सावरकरजी थोड़े हैं की इस खिडकी से भाग जाएंगे, आप निश्चिंत मन से बैठ लीजिये संघभूमी है कोई डरने की बात नहीं"
अशोकजींचे अनेक किस्से त्यांच्या आठवणी, त्यांच्या सोबत मारलेल्या गप्पा भरभरून लिहिता येईल. पण अशोकजींच्या एका गोष्टीबद्दल मला फार अप्रूप वाटतं की BHU सारख्या तत्कालीन टॉप १० इंजीनियरिंग इंस्टीट्यूट मधुन मेटलर्जी सारख्या विषयात अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या (हे आजपासून ७५-८० वर्षांपूर्वी बरं का) माणसाने सबंध आयुष्य देशकार्यासाठी वाहून घेतले, आणि त्याकरिता त्यांच्या कुटुंबाने देखील परवानगी दिली!! आज जेंव्हा मी स्वतःला ह्या परिपेक्षतेत बघतो तेंव्हा लक्षात येतं ही इतकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. उज्ज्वल करियर, पैसा हे सगळं समोर वाढून ठेवलेले असतांना त्याला झिडकारणे नक्कीच सोपे नसते. अशोकजी ज्या पिढीत जन्माला आले कदाचित त्यांचा हा गुण असावा कारण स्वतंत्र भारतातील पहिली पिढी ही इतकीच नेशन फर्स्ट मानणारी होती. आज अशोकजींचा स्मृतीदिन आणि कदाचित ह्यावर्षी तो जितका अभूतपूर्व आहे तितका क्वचितच पूर्वी असेल. जिथे कुठे असतील तिथे कदाचित आज मोरोपंत पिंगळे, अटलजी, बाळासाहेब देवरस, रज्जुभैयाजी, सुदर्शनजी, अशी रामजन्मभूमी आंदोलनाशी संबधित ही सगळी संघपरिवारातील मंडळी किती आनंदात असतील?? सबंध आयुष्य ह्या मंडळींनी जे स्वप्न बघितले होते ते प्रत्यक्षात येतंय!! अशोकजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन ..
- प्रसाद देशपांडे
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या