@मधुरा डांगे
रामाचे तत्त्व समन्वयात्मक संघटनाचे आहे. आदर्श राजकुमार, आदर्श राजा या त्याच्या रुपांचा विचार करतांना त्याचे समन्वयात्मक संघटनाचे सूत्र सातत्याने समोर येते.
राम - सुग्रीव भेट हे या अर्थाने महत्त्वाचे उदाहरण वाटते. सीता हरणाच्या प्रसंगानंतर राम - सुग्रीवाची वनात भेट झाली. सुग्रीवाचा बंधू वालीचे अनितीचे वागणे लक्षात घेऊन रामाचे सुग्रीवाला मदतीचे आश्वासन दिले. वालीवध घडला. यानंतरची रामाची कृती जास्त महत्वाची आहे. वालीच्या अगदी शेवटच्या क्षणी रामाने वालीपुत्र अंगदाचा सांभाळ करण्याचे आश्वासन वालीला दिले, सुग्रीवाला किष्किंधा नगरीचे राज्य दिले आणि वानर या वन्य जातीचे धर्मकार्यात सहकार्य मिळवले. रामाच्या या कृतीने वालीच्या मनातील शेवटच्या क्षणीचा क्षोभ शांत झाला, अंगदाचा स्वाभिमान टिकला, सुग्रीवाच्या रूपाने किष्किंधा नगरीत धर्माचे राज्य प्रस्थापित झाले.
रावण वधाच्या घटनेपुढील भाग देखील अशाच अर्थाने महत्वाचा आहे. रावण वधानंतर रामाने लंकेचे राज्य बिभीषणाला सुपूर्द करून लंकेशी मैत्रीचे नाते प्रस्थापित केले, तिथल्या प्रजेला सुरक्षिततेची हमी दिली. या प्रसंगांचा अधिक साकल्याने विचार करता असे लक्षात येते की हे लोकसहभागातून राष्ट्र उभारणीचे तत्त्व आहे. स्थानिक व्यक्ती आणि संस्थांना योग्य ते सहाय्य करून रामाने सक्षम केले आणि धर्मराष्ट्राच्या उभारणीत त्यांचे सहकार्य प्राप्त केले.
रामाच्या जीवनातील अगदी छोट्या छोट्या कृती या अर्थाने समजून घेण्यासारख्या आहेत. सुग्रीवाच्या मदतीने केलेले सीता शोधाचे कार्य, सीतेचे स्थान कळल्यावर तिथपर्यंत निरोप पोहोचवण्यासाठी केलेली हनुमंताची निवड, सुग्रीवाला दिलेली सेना नायकाची जबाबदारी, नल आणि नील यांना दिलेले सेतू बांधणीचे काम, युद्ध सुरू होण्याच्या आधी रावणाला अखेरचा निरोप पोहोचवण्याची अंगदाला दिलेली जबाबदारी हे छोटे दिसणारे प्रसंग त्या त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. रामाच्या सैन्यात असणाऱ्या अगणित शूर योद्द्यांमधून ठराविक लोकांची निवड करणे हे नियोजन आहे. कुशल संघटक त्या त्या व्यक्तींमधील गुण समुच्च्ययांना हेरून तदानुषंगाने त्यांना कामे सोपवतो. रामाने हेच केले. प्रत्येकाचा सन्मान आणि त्यांचे गुण हेरून रामाने कामांची जबाबदारी सोपवली. पर्यायाने राम विजय सुनिश्चित झाला.
रामाच्या वरील कृती आदर्श लोकपाल म्हणून प्रशंसनीय आहेत. हे राष्ट्र आपले सर्वांचे आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते उभे करायचे आहे हा विचार रामाने आपल्या कृतीतून प्रजेवर बिंबवला. रामायणात खारुताईची एक छोटीशी गोष्ट आहे. रामसेतू बांधणीत ही खारुताई वाळू गोळा करून लहान सहान भेगा बुजवण्याचे काम करते. राष्ट्रातील लहान मोठ्या प्रत्येकाचा राष्ट्र उभारणीत असणारा यथाशक्ती वाटा उल्लेखनीय आहे, महत्वाचा आहे हे स्पष्ट करणारी ही एक प्रतिकात्मक गोष्ट आहे. राम एका मोठ्या साम्राज्याचा राजा होता म्हणून त्याने एककेंद्री सत्ता ठेवली नाही. राष्ट्रातील प्रत्येकाचा सन्मान आणि स्वाभिमान जागृत करत प्रत्येकाला राष्ट्र उभारणीत सहयोगाची संधी दिली. त्यामुळे त्या राज्याप्रति आणि राजाप्रति समाजात आपलेपणाचा भाव निर्माण झाला, राज्य एकजूट झाले. परिणामी, रामराज्य हे प्रजेचे राज्य ठरले.
रामाचे हे सूत्र आधुनिक काळात देखील अनुकरणीय आहे. धनाने आणि अधिकाराने ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्तींनी विविध स्थानिक संस्था, व्यक्ती यांना सक्षम करणे आवश्यक आहे. यानिमित्ताने राष्ट्र आपले आहे आणि त्याच्या उभारणीत आपले योगदान आहे ही भावना दृढ करणे आवश्यक आहे. राम मंदिर उभारणीत आपण सर्वजण यथाशक्ती देत असलेला सहयोग हे याच भावजागरणाचे मूर्त रूप आहे. राम मंदिर हे संपूर्ण राष्ट्राला स्फूर्ती देणाऱ्या राष्ट्रीय एकत्वाचे प्रतीक आहे.
- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार

0 टिप्पण्या