सामाजिक समरसता आणि श्रीराम


@सौ. नीला रानडे

श्रीराम वयाच्या तेराव्या वर्षी अयोध्येला पोहचल्यावर रामांची जी मनस्थिती होती ती, त्यांना समाजाच्या वास्तव स्तिथीची प्रत्यक्ष दर्शन झाल्यामुळेच होती. अर्थात समाजातील राक्षसांचे वाढते संकट त्यांनी पाहिले होते. त्याचवेळी राक्षसांचे, दुर्जनांचे पारीपत्य आणि सज्जनांना अभय देण्याचे त्यांनी निश्चित केले. हे ध्येय त्यांना कुणी सुचवले नव्हते तर त्यांनी उत्स्फूर्ततेने आपल्या विचारांनीच ठरविले होते आणि हे ध्येय सुनिश्चित करण्यातच त्यांच्या मनातील समाजाबद्दल असलेले प्रेम, आत्मीयता दिसते!



आज रामायण ग्रंथामधून रामाच्या राज्यातील जनतेचे चित्र वाचल्यावर आपल्याला कळते की प्रजा रामांना किती मानत होती. रामाने आपल्या इच्छेप्रमाणेच त्यांनी समाजाची आखणी केली होती. प्रजाजनांच्या वैचारिकतेचा पायाच श्रीरामांनी भक्कम केला होता. मनातील जागरूकता बंधुभावना हीच महत्वाची असते आणि बंधूभवानेलाच समरसता म्हणतात. रामांनी प्रजेवर कोणतेही अवाजवी निर्बंध लादले नव्हते. रामांच्या मनात प्रजेबद्दल जी आस्था होती तीच आस्था प्रजाजनांना एकमेकांबद्दलही वाटावी यासाठीही रामाचे प्रयत्न होते.

सर्व समाजाकडे राम समरतेच्या भावनेने बघत असत. म्हणून शबरीची उष्टी बोरे रामानी आनंदाने सेवन केली होती. अगदी बालवयात गुरुगृही असतांना रामांना अनेक सहकार्य लाभले कारण सर्वांच्या प्रती त्यांच्या मनात स्नेह होता. श्रीरामांच्या मनात कोणतीही बद्दल, वाईट भाव कधी उद्भवले नाहीत.

यज्ञरक्षणाच्या आधीच्या रात्री त्यांना मंथरा पुत्र मंडुकाकडून गुपित कळलं होतं. मंडुकाने मारिच-सुबाहु यांच्याकडील सर्व सर्व शस्त्र निकामी करून ठेवली होती. अशावेळी रामांना आनंद वाटायला हवा होता, पण इच्छा असून सुध्दा त्यांना असुया वाटली नाही. त्यांच्यावर अन्याय होऊ नये असा मानवतावादी दृष्टिकोन होता. आणि ह्याच दृष्टिकोनातून ते स्वतः मारिच आणि सुबाहु यांना त्यांच्या छावणीत निःशस्त्र असतांना जाऊन भेटतात आणि आपण उद्या शस्त्रे तपासून पूर्ण तयारीने या. तुम्ही निःशस्त्र असतांना तुमच्यावर वार करणार नाही. तेव्हा उद्या मी यज्ञाचे रक्षण करतांना सशस्त्र या असे ते सांगतात. इथे रामांचा मोठेपणा व औदार्यभाव दिसून येतो.

मन मोठ्ठ असलं की मनात समरसता येते. विषमतेला मनात स्थान राहत नाही. पूर्ण अवतारकार्यात त्यांनी समोरच्याकडे 'तो' आणि 'मी' सारखेच आहेत या दृष्टीने त्यांनी बघितले. म्हणूनच ते प्रजेमध्येही सर्वांना प्रिय होते. मनाचे समतोल विचार त्यामुळे समान विचार आणि याच मुळे समतेमुळे समरसता येते आणि ही समरसता त्यांच्यात स्वभावात: होती, म्हणून ते सर्वांना समान वागणूक देत असत.

जनतेला, समाजाला त्रास देण्याची त्यांचा जाच करण्याची त्यांच्याकडून विविध करवसुली करण्याची व न भरल्यास दंड देण्याची क्षमता रामांमध्ये होती. पण त्यांनी त्यांच्या या क्षमतेचा कधी वापर केला नाही. कारण तसे भाव त्यांच्या मनात नव्हते. उलट माझा राजेपणामुळे मी इतरांना कसे समाधान देऊ शकतो. कसे आनंदी ठेऊ शकतो याचा विचार राम करीत होते. आणि हे केवळ मनाच्या आणि ओघाने आणि वर्तमानातील समरसते मुळेच शक्य झाले होते.

समाज हा माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे ही त्यांची मनोवृत्ती होती. ती भावना त्यांनी नित्य जपली. मानवतेचा स्थायीभाव रामांमध्ये होताच. करुणेचा सागर असे संबोधन आपण रामाच्या बाबतीत वापरतो. करूणा, दया, क्षमा, औदार्य त्यांच्याजवळ स्वाभाविक होतच आणि अश्याच भावनेतून समरसतेचा उगम होतो. केवळ समतेने सर्व साध्य होत नाही तर समरसतेने जगही जिंकता येते!

वनवासाच्या १४ व्या वर्षात म्हणजे शेवटी राम पंचवटीत रहात होते. तिथूनम त्यांना रावण वधासाठी आणि सीतेच्या शोधासाठी निघावे लागलं. आधीच तेरा वर्षांच्या वनवासात अनेक वर्षांच्या वनवासात अनेक माणसांच्या वस्त्या लागल्या. खरं तर ती माणसं अयोध्येची प्रजा नव्हती पण तरीही रामांना त्यांच्याबद्दल मनात स्नेह होता. त्यांना यापुढे राक्षसांचा त्रास होऊ नये ही भावना होती. यासाठी अनेक ठिकाणी त्यांनी स्वसंरक्षणाचे पाठ दिले, ते कसे गिरवायचे ते शिकले. हा माणूस धर्म! रावण वध झाल्यावर देवतांनी त्यांची स्तुती केली आणि काय हवं आहे असं विचारल्यावर रामांनी काय मागावं? त्याक्षणी रामांना बऱ्याच गोष्टी मागत्या आल्या असत्या. पण त्यांनी युद्धात प्राण गेलेल्या सर्वांचा जीव मागितला. वानर कुळात जन्म नसतांना रामाने त्यांचा हात धरला. आपल्या शौर्याचा पराक्रमाचा उपयोग त्यांनी अनाठायी कधीच केला नाही.

समता समरसतेचा आग्रह धरणारे बरेच असतात. पण श्रीरामांनी स्वतः कधीच केला नाही. केलेल्या उपकाराचे भांडवल कधीच केले जाही. सहजतेने होणारी क्रिया असता त्याप्रमाणे स्वभावातील एक अनिवार्य, अक्षर असा भाव होता . मृदू, स्नेहल स्वभावामुळे ते लोकप्रिय होत गेले. त्यांच्या अन्य गुणवैशिष्टामुळे त्यांची समानता समरसता उघड कोणाला जाणवली नसेल पण त्यांच्या व्यतिमहत्वाची एक पैलू समरसता आहे निर्विवाद आहे.

वानरसेनेसह सुग्रीव ,सिताशोधासाठी जातात तेव्हा रामांना आनंद झाला. सेनेतील प्रत्येकाला श्रीराम बद्दल आदर होता. पण त्यांनी एखाद्याला कामात सहभागी करून घेताना बळजबरी कधीच करून घेतली नाही. त्यामुळे रामाचे प्रत्येक वानराशी बोलणे झाले नसले तरी प्रत्येक गटप्रमुखजवळ राम सन्मानपूर्वक वागले बोलले होते आणि याच समरसता वर्तनामुळे 'रामाचे काम ते माझे काम' हा विचार सर्वांना वाटू लागला. कार्यात यश प्राप्त करण्यासाठी हे काम माझं काम आहे हा विचार सर्वांच्या मनात निर्माण करणे मनाच्या समरसतेसी भावने शिवाय शक्य नसतं.

रावण वधानंतर बंधुभावनेतून त्यांनी कित्येकांना पुष्पक विमानाने आयोध्येला नेले. दैत्य कुळ जन्मलेल्या बिभीषनला आपला पाचवा भाऊच मानले. रामराज्य अयोध्येत जेव्हा प्रत्यक्षात आले तेव्हा सर्व समाजाला मनातील आणि समरसतेमुळेच आपलेसे केले. रानात जायच्या वेळेस सर्व अयोध्या त्यांच्या बरोबर आली होती. सर्व अयोध्या ओस पडली होती. हे प्रजेचे रामावर प्रेम नव्हते तर त्यांचे प्रजेपती असलेल्या कर्तव्यदक्षतेतून मानवाच्या वर्तनातून आले होते हे लक्षात घ्यावे लागेल. 'प्रजा हीच कोटीरूपे मला ईश्वराची' असे म्हणणारे राम हे होते. बंधुभाव ठेऊन वागावे यासाठी रामांनी प्रजेला घडवले होते. लोकमान्यत्व प्रजेची केलेली काळजी मुळे प्राप्त झाले होते. प्रत्येकजण दुसऱ्यासाठी सहकारी होता, कर्तव्यदक्ष होता धर्मरक्षणासाठी सदैव तत्पर होता. आपल्या मनातील समरसता प्रजेतही प्रस्थापित केली होती. अश्या प्रजेमुळे ते रामराज्य असे म्हंटले जाते.

- सौ. नीला रानडे, धुळे
मो. 9657059784

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या