@मधुरा डांगे
रामाचा अभ्यास करत असताना त्याच्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रुपांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. राम जसा मानवी रुपात आहे तसा तत्त्वरूपात देखील आहे. सगुण म्हणजे दृश्य रूप आणि निर्गुण म्हणजे तत्त्वरूप. रामाच्या एका भजनातील ओळी आहेत -
सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर
सुजन रंजन रूप सुखकर
राम आत्माराम,
आत्माराम का सम्मान करिये, ध्यान धरिये ।
यात रामाला 'सगुण ब्रह्म' म्हटले आहे. ब्रह्म हे तत्त्वरूप आहे अर्थात निर्गुण आहे आणि राम हे या ब्रह्म तत्त्वाचे म्हणजे सृष्टीच्या उत्पत्ती तत्त्वाचे मूर्त रूप आहे, ब्रह्माचे सगुण रूप आहे असे कवी म्हणतो. रामाचे सगुण रूप असे निर्गुणात एकरूप झाले आहे.
राम ही केवळ व्यक्ती नसून एक तत्व आहे. त्यामुळे रामाला धर्म, जात, लिंग यांचे बंधन नाही. राम सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे. रामतत्वाचा अभ्यास म्हणजे रामाच्या गुणसमुच्चयाचे स्मरण, त्याचा अभ्यास. राम तत्त्वाचे अनेक पैलू आहेत. संयम, धैर्य, शौर्य, सावधपण, अलिप्तपण, विनम्रता या गुणांचा संग्रह म्हणजे रामतत्व आणि सर्व गुणांचे अखंड कृतीत केलेले रूपांतर म्हणजे रामतत्त्वाचे आचरण.
रामाची वृत्ती साधकाची होती. अत्यंत मर्यादाशील आणि आदर्श जीवनाचा सिद्धांत रामाच्या जीवनकार्यातून दिसतो. हे सहज शक्य होते का? नाही. रामाचा जन्म मानवी रुपात झाला. त्यामुळे मानवी मनाला असणाऱ्या भाव - भावना, मानवी जीवनात येणारी सुख - दुःखे त्यालाही होती. परंतु रामाच्या चित्तवृत्ती स्थिर होत्या. गीतेत म्हटले आहे - सुखदुःख समे कृत्वा । लाभालाभौ जयाजयौ ।। ही रामाची वृत्ती होती. साधनेने येणारे थोरपण रामाच्या ठायी अगदी स्पष्ट दिसते. सुखाच्या प्रसंगी त्याचे चित्त चळत नाही आणि दुःखाच्या वेळी तो हतबल होत नाही. अखंड राजश्रीचा अधिपती असतांना तो जराही कष्टी न होता संन्यास स्वीकारतो ही रामाची कृती त्याच्या साधक रूपाची साक्ष देते. तो अलिप्त होता. जशी अयोध्या तसेच अरण्य हा भाव त्याच्या मनात स्थिर होता.
रामाचे आपल्या अंतरात असलेले रूप म्हणजे आत्माराम. या आत्मारामाचे जागरण म्हणजे रामतत्वाचा अंगीकार होय. आत्म्याच्या ठायी असलेला राम साधनेने प्रकट होतो. असे म्हणतात - सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे ।' आत्म्याच्या ठायी असणारा राम प्रकट करणे म्हणजे कठोर व्रताचे आचरण करणे.
सुमारे ५०० वर्ष चाललेला राम मंदिराचा संघर्ष हा अखंड साधनेचे उदाहरण आहे. अत्यंत धैर्याने, संयमाने आणि शौर्याने हा लढा लढला गेला. अनेक रामभक्तांनी यासाठी आपले आयुष्य पणाला लावले. आज त्यांच्या साधनेचे फलित म्हणजे सन्निध असणारा देव सगुण साकार होत आहे. आपली पिढी रामाच्या पुनर्स्थापनेचा सोहळा बघू शकणारी भाग्यशाली पिढी आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेला रामसेवेचा वारसा आणि धैर्य, शौर्याची साधना पुढे चालविणे आपले कर्तव्य आहे. हे रामतत्त्वाचे स्मरण आहे, हेच आत्म्याच्या ठायी असणाऱ्या रामाचे जागरण आहे !
- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार

0 टिप्पण्या