------------
वाढोना रेल्वे स्टेशन नजीक काही पालावरची घरे आहेत. घरे कसली ती ? झोपड्याच म्हणा की.
राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यासाठी समयदान करावं म्हणून आज म्हणुन मी आणि प्रतीक निघालो.
डोक्यात एक कल्पना आली. मी म्हणालो, " पालावर जाऊया का?"
प्रतीक ने होकारार्थी मान डोलावली.
आम्ही तिथे पालावर पोहोचलो. ती सर्व मंडळी कामात होती. महिला जास्त होत्या. आमच्याकडे पाहत होत्या. आम्ही सर्वांना "ताई ईकडे या, बोलायचे आहे " असे म्हणत त्या सर्व झोपड्याच्या मध्यभागी पोहोचलो.
सर्व बाया - बापडे लहान पोरं आमच्या भोवती गोळा झाले.
त्यांच्या नजरेत असंख्य प्रश्न होते.
त्यातली एक म्हातारी म्हणाली, "अस्सा हाय व्हय.. बापू , मला वाटलं कालच्या लग्ना बिग्नातलं उरेल जेवन घेवून जा मून आलासा. आमच्याकडं गावचे लोक असच काई बाई द्याला येत्यात. आज फकस्त तुमी काई तरी मागाय आलासा .
अन तीने आपले ओले डोळे पुसले..
मी म्हणालो "आजी मग राममंदिर ला मदत करता ना?"
तिने लगेच सर्व महिलांना आवाज दिला व सांगितले" समद्या जणी धा धा रुपये द्या. मी शंबर देतो. काई कम केल नाय मया रामानं...
देवळ आवधेत हाय ना?
तिच्या प्रश्नाने मी भानावर आलो..
आजी माहीत आहे तुम्हाला?
"मग नाय तर ? त्यों हाय मून हामी हाय" असे ती गर्वाने म्हणाली.
आम्हाला शब्दच सुचत नव्हते. आम्ही फक्त बघत होतो.
नंतर ती आजी म्हणाली... "आता आलासा तर च्या घुन जावा."
आम्ही एकमेकांकडे बघितले जवळच तीन दगडाची चूल होती.. पोर खेळायला घेतलेले भांडी धुतली व चहा तयार झाला.
कसं सांगावं... किती माया, प्रेम व आपुलकी होती त्यात.
मंदिर तर होतंय... पण राम आपल्याला समाजाचं दर्शन देखील घडवतोय. कश्यासाठी माहितीये... "सब समाज को लिए साथ आगे बढ़ते है जाना"... नव भारताच्या निर्मितीसाठीच बहुतेक!
- आडेलु नामदेव भाटे
मो. 9730281744

0 टिप्पण्या