@स्नेहलता स्वामी, नांदेड
'यत्र नार्यस्तु पुज्यंते' ही
उदात्त परिपक्व विचारधारा घेऊन शतकानुशतकाचा प्रवास करणारी भारतीय संस्कृती. अपाला , घोषा, विश्ववारा ,गार्गी , मैत्रेयी सारख्या विदुषींच्या ऋग्वेद ऋच्या अभिमानानं धारण करणारी ही संस्कृती.राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई ,राणी गिडालू च्या पराक्रमांना इतिहासाच्या सुवर्ण अक्षरात लिहिणारी ,क्रांती ज्योती सावित्रीबाई च्या अपार कष्टाला ,धेर्याला मानाचा मुजरा करणारी ही संस्कृती.
मुळात भारतीय संस्कृतीच मातृप्रधान. गौतमीपुत्र सातकर्णी यांचे नाव सुद्धा भारतीय संस्कृतीच्या या उदात्त विचारांना पाठबळ देणारे ठरते. परंतू कालौघात परकीय आक्रमणापासून संरक्षण म्हणून स्त्री घरात बंद झाली, घरात ही पडदे आले, डोक्यावर पदर आला याचा अर्थ भारतीय संस्कृती स्त्रि चा सन्मान करणारी नाही असा नव्हता ते एक काळाच्या ओघात भारतीयांना अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेला पर्याय होता कारण ही आक्रमणेच एवढी भयान होती की तो काळ ही रोखू शकत नव्हता त्यावेळी पर्याय म्हणून प्राधान्याने स्त्री दाक्षिण ,स्त्री सुरक्षा म्हणून काही बंधने लादली गेली आणि इंग्रज जाईपर्यंत ही बंधने तशीच राहिली तरी सामर्थ्यवान स्त्रीयांचा पराक्रम इतिहासातून उजळलाच . त्यात विविध प्रांतातून स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होणाऱ्या स्त्रीया ठळकपणे दिसतात. मराठवाडा मुक्तीसंग्रामातही स्त्रीयांनी जे धारिष्ट्य दाखवले ते अतुलनीयच. एवढी बंधने स्वतः स्वीकारून ही ती सर्व क्षेत्रात हळूहळू पुढे आली व आज स्थीर स्थावर झाली.विविध क्षेत्रात ती स्वाभिमानाने काम करते. तीच्या नैसर्गिक सहनशीलता , सृर्जनशीलता गुणांमुळे ती धैर्याने काम करते. आज भारतीय स्त्री मुळेच संस्कृती टिकून आहे. भारतीय संस्कृती चे वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब व्यवस्था होय ती स्त्रीयांच्या अपार धैर्याने स्थिर राहते.तेच धैर्य घेऊन ती प्रत्येक क्षेत्रात वावरते आहे व यशस्वी होते.
प्रेम ,ममता ,उदात्तता, संयम ,सहनशीलता यामुळे तीच्यात जी चिकाटी आली ती तीच्या धैर्याची पाठराखण करते त्यामुळे मुली मुलांपेक्षा वेगळ्या ठरतात.मुलगी असेल तर तो बाप स्वतः ला धन्य समजतो. आई च्या नंतर आपली काळजी करणारी कोणी असेल तर ती आपली मुलगी ही जाणिव पित्याच्या डोळ्यातील सत्यजाणिवेची ओळख आहे. तीचा हट्ट ,तीची समज, तीची जिद्द मुलांपेक्षा कितीतरी वेगळी.घराला घरपण देणारी. छोट्या नाजूक हातांनी दारात रांगोळी टाकणारे हेच हात ,पणती लावणारे हीच बोटे ,स्वयंपाक घरात हळूच आपल्या ही नकळत स्थीरावतात.घरातील माणसांची मने ओळखत काय हवे नको पाहत पाहत अभ्यासातही रमतात.जिद्दीने लेखणी घट्ट धरत स्वतः च्या आवडी निवडी जपत विविध क्षेत्रात पदार्पण करतात व तसे काम ही करतात. खरे तर पुरूषांपेक्षा ती काकणभर सरसच. तरीही आज ही विविध पदांवर काम करताना तीच्या कडे अत्यंत महत्वाची जबाबदारी देताना विचार केला जातो , जाणिवपूर्वक टाळले जाते.तसे तीच्यात पुरूष अधिकारी पेक्षा कोणता गुण कमी भासतो की असा विचार केला जातो.कदाचित ती बाब म्हणजे तीचे मातृत्व,तीची कौटुंबिक जबाबदारी असेल.परंतू काळाच्या या प्रवाहात आम्ही ती सक्षमपणे पेलली आहेच की ज्यामुळेच तर सर्व क्षेत्रात आम्ही पोहोचलो.जे कुटूंब तीला त्या क्षेत्रात पाठवते त्यावेळी ते कुटुंब तीच्या पाठीशी भक्कम उभे राहतेच की, जरी नसले तरी तीची थोडी तारांबळ होते पण ती जिद्दीने रेटतेच की हे सारे.
नौकरीसाठी ती कुटू़ंब कधीच नाकारत नाही वा त्यागत नाही तर कुटूंबासाठीच नौकरी चा स्वीकार वा त्याग ही करते.अर्थात तीच्या दृष्टीने कुटुंब महत्वाचे आहे म्हणून अशी महत्वाची जबाबदारी देणे टाळले जात असेल तर निश्चीतच ते चुकीचे ठरते.माझ्या दृष्टीने जिच्यात कुटुंब सांभाळण्याची जिद्द, चिकाटी, धैर्य आहे ती स्त्री जगातील कोणतीही महत्वपूर्ण जबाबदारी लिलया पेलू शकते.हे तीचे सामर्थ्य स्थळ आहे तथापि हीच उणीव आहे असे समजले जाते.शिवाय तीची नैसर्गिक शारीरिक ठेवण ही व्यवस्थेने अद्याप स्वीकारली
नसल्याचे बरेचदा जाणवते. निश्चीतच तीच्या दृष्टीने महिन्यातील काही दिवस व मातृत्वाचा काळ सोडला तर फारसे काही वेगळे नाही .
होय हे खरे की पुरूषांपेक्षा आमच्याकडे शारीरिक ताकत कमी आहे परंतू बौद्धिक ताकत जास्त आहे , कौशल्य आहे , संयोजन शैली , व्यवस्थापन आदी गुणांचा समुच्चय असतानाही एक व्यक्ती म्हणून तीच्याकडे पाहिले जात नाही.आणि त्यातल्या त्यात एखादी लेडी आॅफीसर असेल तर अजूनही समाजाने ते फारसे स्वीकारले नाही हे लक्षात येते. ते स्वीकारावे लागणारं सत्य आहे तरी अजून आमची माणसिकता होत नसेल तर आपण कोणत्या काळात जगत आहोत याचे मुल्यमापन करणे बरे! काळ हा पुढेच जाणार आहे काही वर्षांपूर्वी मोजक्याच स्त्रीया असणाऱ्या क्षेत्रात किंवा स्त्री नसणाऱ्या क्षेत्रात ती आली आहे...आणि हा प्रवाह वाढतच जाणार आहे तरीसुद्धा आपली माणसिकता तयार होत नाही याचे नवल वाटते काही ठिकाणी तर जाणिवपूर्वक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो . आपण एक लेडी आॅफीसर आहेत याची जाणीव करून देणारे प्रखर घाव बसतात...मग त्यात पाठीमागे होणारी टिंगल असेल वा ती बाई फार शहाणी आहे म्हणण्यासारखे अनेक शब्द आहेत. परंतू यातून आमचे सामर्थ्य दिसते तर असे वागणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते.असे वागताना बोलताना आपली आई, बहिण, यांचे साधे स्मरण केले तरी असा विचार कोणी करणार नाही परंतू इतर स्त्री कडे पाहताना तो दृष्टीकोन ठेवला जात नाही त्यामुळे विकृत विचार डोक्यात घुसतात व त्यातून गैर प्रकारही घडताना दिसतात.
खच्चीकरण करणे ही मानसिक प्रक्रिया आहे ती उलटी सुद्धा होते बरेचदा.अनेकांना वाटते की एखाद्या महिला अधिकारी यांना अधिकारी दर्जाचे काम दिले नाही किंवा तीचे अधिकार कमी करण्याच्या प्रयत्न केला तर तीचे खच्चीकरण होईल परंतू असे होत असल्याचे तीला तीव्र जाणिव झाली तर न खचता ती तीच्या बाजूने तुम्ही फेकलेला प्रत्येक चीरा पायाखाली घेऊन उभी राहते व तेवढीच कणखर होते.कधी कधी एखाद्या ठिकाणी काम करताना सर्वसामान्य जनतेकडून जो सन्मान महिला अधिकारी कर्मचारी यांना मिळतो. तो बरेचदा तीचे वरीष्ठ व कर्मचारी जाणिवपूर्वक देण्याचे टाळतात.जरी त्यांना ह्याची माहिती असते की मॅडम चांगले काम करतात पण ते स्वीकारण्याची त्यांची शक्ती नाही त्याला आम्ही काय करणार? ते तेवढे कमजोर मनाचे आहेत असे समजून आम्ही न थांबता न खचता पुढे जातो.कारण कळून पण सत्य स्वीकारण्याची ताकत नसेल तर तुमचे तेवढे सामर्थ्यच नाही पचविण्याचे हे सत्य आम्हाला तरी स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही.कारण आता थांबणे, खचणे हा शब्द आम्ही आमच्या शब्दकोशातून काढून टाकला आहे. तुमचे तुमच्याजवळ ,आमचे आमच्याजवळ.
ज्याचे त्याने सांभाळावे जे योग्य वाटेल ते. हा दृष्टिकोन आम्ही जोपासला आहे. त्यामुळे अशा लोकांचा मुलाहिजा न बाळगता त्यांचा विचार करणे ही टाळत जातो व आज बऱ्यापैकी विविध क्षेत्रात स्थीर झालो व बीईंग अ लेडी(बाई) विविध क्षेत्रात कसोशिने कुटू़ंब सांभाळत काम करणाऱ्या तमाम लेडींना मी मानाचा मुजरा करते. आजही एखाद्या लेडी ऑफीसर / कर्मचारी यांना मॅडम म्हणताना काही कर्मचारी व सहकारी यांना थोडं जड जातं व तीच्या अनुपस्थित तीला हिनविण्यासाठी म्हणून बाई शब्दाचा उल्लेख केला जातो त्यामूळे मी म्हणते की म्हणू द्या बिनधास्त तुम्हाला जर कोणी जाणिवपूर्वक म्हणत असेल 'बाई' तर .खच्चीकरण करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे कारण त्यांना स्वतः ला वर चढणे माहित नाही त्यामुळे तुम्हीच त्यांचे आभार माना...म्हणा.. बाबा रे बरे झाले बाई म्हणालास...अरे सावित्रीबाई, जिजाबाई, लक्ष्मीबाई या बाईच होत्या अख्या जगानं त्यांना स्वीकारलं. तू बाई म्हंटल्यामूळ मला पण खूप मोठं झाल्यासारखं वाटलं. अभिमानाने सांगा होय मी बाईच आहे व मला अभिमान आहे बाई असण्याचा.
आता प्रत्येक क्षेत्रात स्थीर होत असलेल्या सर्व माझ्या सर्व सखींना मी सांगू इच्छिते की....
"भिऊ नकोस तूच तुझ्या पाठीशी भक्कम उभी रहा...
हा समाज वरकरणी दिसतो तसा मुळीच नाही
हे तुला ठाऊक आहेच.
तरीही भिऊ नकोस तूच तूझ्या पाठीशी भक्कम उभी रहा...
इथे वासलेली तोंडे आहेत
वेंगाडलेली दाते आहेत
उंचवणाऱ्या भुवया अन्
सरसावणारे हात आहेत
तरीही भिऊ नकोस तूच तूझ्या पाठीशी भक्कम उभी रहा...
अन पादाक्रांत कर दसदिशा घे गगनभरारी तुझ्या अपार शक्तीनिशी
आता काळ बदललाय
इथे येणार नाही कृष्ण वा
भरसभेत आवाज ही उठवणार नाही एखादा विकर्ण
तरीही भिऊ नकोस तूच तूझ्या पाठीशी भक्कम उभी रहा...
पाड मुडदे ,फोडून काढ अंग अंग तुझा उपहास करू पाहणाऱ्या नामर्दांचे
होय नामर्दच ते !
कारण खरा मर्द तुझ्या वाटेला येणारच नाही.."""
ही हिम्मत ठेऊन जगणे हेच या काळाचे उत्तर आहे.याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे. असो! शेवटी विशेष उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे नांदेड जिल्हा प्रशासनाने या वर्षी सुरू केलेल्या मुलीचे नाव घराची शान ,माझी मुलगी माझा अभिमान या कौतुकास्पद उपक्रमाचा. याबद्दल मा.जिल्हाधिकारी महोदय डॉ.विपीनजी सर व मा.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाजी यांचे मी आभार मानते.निश्चीतच एक सकारात्मक विचार यामुळे घरोघरी रूजेल व तोच विचार समाजात मूळ धरेल व भारतीय संस्कृतीतील तो सन्मान तीला पुन्हा मिळेल.खरे तर स्त्री मुळातच एका उच्च प्रतीच्या सन्मानाची हक्कदार आहे परंतू हा हारवलेला सन्मान तीने स्वतःच्या हिम्मतीवर पुन्हा मिळविला आहे तरी तो तीचा तीला देण्याची मानसिकता नसणाऱ्यांची मानसिकता बदलणारा ठरावा एवढीच अपेक्षा आजच्या या दिवशी व्यक्त करते.
- स्नेहलता स्वामी
ना.तहसिलदार हदगाव जि.नांदेड
७७२१८२९७८०
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#internationalwomensday2021
#WomensHistoryMonth
#जागतिक_महिला_दिवस
0 टिप्पण्या