माधवराव सदाशिव गोळवलकर उर्फ प. पु. श्री गुरुजी यांचा जन्म माघ कृष्ण एकादशी शके 1827 म्हणजेच 19 फेब्रुवारी इ.स. 1906 रोजी झाला ते 1930 साली काशी हिंदू विद्यापीठात प्राणिशास्त्राचे प्राध्यापक होते. प्राध्यापक या नात्याने त्यांना विद्यार्थ्यांचे एवढं प्रेम मिळाले की विद्यार्थी त्यांना गुरुजी म्हणू लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.
श्री गुरुजींचे जीवन समर्पण भावनेचे मूर्तिमंत आदर्श आपली आई, महान भारतमाता आणि या विश्वाची जननी आदिशक्ती अशा त्रिविध स्वरूपातील मातेची त्यांनी उपासना केली, प्रत्येक स्री कडे मातेच्या रूपात पाहिले, या मातृस्वरूपाला त्यांनी मातृशक्ती मानले. श्रीगुरुजींच्या व्यक्तिगत जीवनात त्यांच्या आईचे स्थान अनन्य साधारण असेच होते ते म्हणत ' मी काही मातृभक्त नाही, पण माझी आई खरोखर माता होती, माझ्या कर्तव्यात स्वतःच्या आजारपणाची बाधासुद्धा तिने उत्पन्न होऊ दिली नाही.'
संघ आणि समिती ह्या जरी समविचारी संघटना असल्या तरी ही त्या दोन्ही संघटना म्हणजे समांतर असणारे रेल्वे चे दोन रूळ. श्रीगुरुजींनी राष्ट्रविकासात महिलांचे योगदान तीन रूपात मांडले आहे.
1)मातेच्या रूपाने आपल्या मुलांवर ती वीरवृत्तीचे संस्कार करू शकते. त्यांच्यात ईश्वर भक्तीची भावना, देशप्रेम व समाजसेवेसाठी त्यांना निर्माण करू शकते.
2) सामाजिक रूपाने तिने आपले काम सिमीत न ठेवता आसपासच्या गरजू महिलांची व मुलांची काळजी घेतली पाहिजे.
3) संघटनेच्या रूपाने त्या आपले कार्य करू शकता, तसें त्यांनी केले पाहिजे.
स्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता असते याचे उदाहरण मा. सुशीलाताई अभ्यंकर यांनी छान दिले आहे. त्यांचे भाऊ हे संघांचे स्वयंसेवक होते, तेव्हा त्यावेळी त्यांना एक स्वयंसेवकाची बहीण म्हणून ओळखत, नंतर त्यांना मा. अभ्यंकर यांची पत्नी म्हणून ओळखत, त्यांना मुलगा झाला आता त्यांना जयंताच्या आई म्हणून ओळखत. त्यांनी मातृत्वाचे उदाहरण असे सोप्या भाषेत पटवून दिले.
जे ठरवेल ते मातृशक्ती करू शकते किंवा घडवून आणू शकते. इतकी प्रचंड शक्ती ही प्रत्येक स्री मध्ये असते. ती मुलांवर उत्तम संस्कार करते. आपण पहिला प्रणाम आईला करतो, दुसरा प्रणाम पित्याला व तिसरा गुरूला, तसे पाहिले तर मुलांचा पहिला गुरु ही आईच असते ती त्याला चालायला शिकवते, बोलायला शिकवते. आईच मुलांना संस्कारक्षम बनवते. अशी संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी महिला मेळावे घेणे आवश्यक आहे. संकटाना सामोरे जायचे असेल तर संघटन आवश्यक आहे. अजूनही खुप महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालेला नाही.
बऱ्याच महिलांना न्यूनगंड असतो की एखादी जबाबदारी आपण पार पाडू शकतो की नाही.आपण आता पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागलो आहोत. जगात कोणी लहान मोठे नसते याचे उदाहरण आहे नेपोलियन. नेपोलियन हा उंचीने कमी होता. एकदा त्याला कपाटावरून एक वस्तू काढायची होती, त्याचा सेनापती त्याच्या माघेच उभा होता.तो पुढे होऊन म्हणाला, " सर मी तुम्हाला तुमची वस्तू काढून देतो, तर नेपोलियन त्याला म्हणाला, " तु उंच नाहीस लांब आहे मी छोटा असेल पण लहान नाही". अशी जिद्द बाळगली तर जगात अशक्य असे काहीच नाही, हेच मत गुरुजींचे होते. ते म्हणत, ' सतीत्व म्हणजे चितेत जळून मरणे अशी संकल्पना नाही, अत्यंत पवित्र, ध्येयनिष्ठ, कर्मनिष्ठ, समाज समर्पित जीवन जगणे यात सतीत्व आहे. देशासाठी मारण्यापेक्षा देशासाठी समर्पित जीवन जगणे स्तुत्य आहे. एका कार्यासाठी क्षणात आवेगाने हौतात्म्य पत्करणे सोपे आहे. एखादे कार्यपूर्ती साठी सतत कार्य करून परिश्रम घ्यावे लागतात, त्यात टिकून राहणाऱ्या व्यक्ती दुर्मिळ. ते म्हणत समिती सारख्या संघटनेला क्षणक्षणाने राष्ट्र जीवन जगणारी व कणाकणाने राष्ट्रा साठी झिजणारी सेविका हवी असते.
श्रीगुरुजींनी सांगितलेले एक कॉलेज मधील उदाहरण, एक मुलगी नेहमी प्रमाणे कॉलेजमध्ये येत होती, तिला एका मुलाने धक्का मारला, त्यावेळी त्यामुलीने त्यामुलाला चांगलाच चोप दिला. त्यावेळी त्या मुलाचे पतनाचे दुःख न करता मुलीने पवित्रता श्रेष्ठ मानली म्हणून तिची प्रशंसा करणे योग्य ठरेल असे गुरुजींनी ह्या उदाहरणावरून सुचवले. स्रीयांनी असेच निर्भीड पणे अशा प्रसंगी सामोरे जावे. आज आपण बघतो स्रिया खुप शिकून उच्चपदावर नोकऱ्या करू लागल्या आहेत, तरी सुद्धा त्या, त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत, बऱ्याचदा आपण वृत्तपत्रात वाचत असतो की ऑफिस मधील मोठया अधिकाऱ्यांनी बरोबरीन काम करणाऱ्या महिलेस छेडले तर अशा ठिकाणी महिलांनी न घाबरता तोंड द्यावे.
राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका वं. ताई आपटे. ताईचा व गुरुजींचा चांगला परिचय होता कारण ताईचे पती हे संघाचे स्वयंसेवक होते. त्यामुळे ताईच्या घरात नेहमी स्वयंसेवकांची वर्दळ असायची, गुरुजी कायम ताईकडे गेल्यावर त्यांचे अनुभव सांगत असत. ते गंमतिने म्हणत, 'आज एका स्वयंसेवकाकडे गेलो होतो, त्यांच्या पत्नीला त्यानी चहा ठेवायला सांगितला म्हणाले की चहा ठेवताना घरात खूपच भांड्याचा आवाज येत होता म्हणजे त्या घरात अजून समिती पोहचली नाही, बरका ताई! त्यासाठी प्रयत्न कमी पडताय ' अशी प्रत्येक घरातील घटना गुरुजी सांगत असत आणि सेविकाना कसे घडावावे हे बोधक उदाहरणे देऊन ताईना समजवून सांगत असत.प्रत्येक घरात काय घडत याची गुरुजींना कल्पना असायची, बऱ्याच घरांमध्ये गैरसमज असायचे घरात दोन बायका असल्या म्हणजे मतभिन्नता असतेच.
एकदा गुरुजी ताईंकडे आले, त्यावेळी ताईंना वयाची 60 वर्ष पूर्ण झाली होती, तेव्हा एक चित्र गुरुजींनी त्यांना दिले ते चित्र असे होते की भवानी माता शिवाजी महाराजांना तलवार देत आहे. यावरून श्रीगुरुजींना महिलांकडून काय अपेक्षा आहेत या कळून चुकल्या. आजच्या भरकटत चाललेल्या पिढीला योग्य ते वळण लावणे, त्याच्यावर संस्कार करणे हे गरजेचे झाले आहे, वाईट गोष्टीना आळा कसा घालता येईल, आपली कर्तव्य निभावून कर्तव्ये कशी करता येतील, हे बघणे अत्यंत गरजेचे आहे आणि ह्या साठीच सर्व मातांनी जागृत झाले पाहिजे. देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देता येणारी पिढी ही घडवली पाहिजे. श्रीगुरुजी म्हणतात,' माझा विश्वास आहे की समाजाचे पुनरुत्थान करण्याचे हे कार्य, जर आपल्या मातांनी निर्धाराने हाती घेतले तर त्यांना पराभूत करू शकेल अशी कोणतीही शक्ती या लोकात नाही, परलोकात नाही, जिच्यासमोर यमराजही हार मानेल, त्या सावित्रीसारख्याच एकाग्र निष्ठ, विशुद्ध चरित्र आणि असामान्य वीरवृत्ती अंगी बनवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. मला खात्री आहे, आपण एवढे केले म्हणजे ही प्रदीर्घ काल यात्रा संपेल. नवप्रभातीची सुवर्णप्रभा फक्त भारताच्याच नव्हे तर साऱ्या जगाच्या क्षितिजापर्यंत पसरेल.
आपला धर्म नव्याने प्राप्त झालेल्या तेजासह जगाच्या काना कोपऱ्यात जाऊन पोचेल. श्रेष्ठ ऋषींच्या परंपरेतील महान तपस्वी श्रीगुरुजींचे जीवन आणि संदेश आपल्या सर्वाना आवाहन करत आहे की, आपल्या महान मातृभूमीच्या सेवेसाठी आपण आपला वेळ आणि जीवन कारणी लावूयात.
- सौ. विंदा विजय नाईक
साभार- संवाद समिती, देवगिरी प्रांत
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
#श्रीगुरुजी_आणि_मातृशक्ती
#श्रीगुरुजी #shrigurujirss
0 टिप्पण्या