अनेक महिन्यांची निःस्वार्थ मेहनत, घरो-घरी जाऊन केलेला संपर्क, मतदारांना मत देण्यासाठी दिलेलं प्रोत्साहन या सगळ्यांचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रात भारतीय जनसंघाचा निवडून आलेला पहिला उमेदवार.... कार्यकर्ते एकदम खुश होते, सर्वत्र धुमधडाक्यात स्वागत होत होतं, मोठे मोठे राजकीय नेते त्या विजयी उमेदवाराचे अभिनंदन करायला पुष्पगुच्छ घेऊन आलेले होते. पहिलं यश मिळालं म्हणून खुल्या वाहनातून त्या आमदाराची मिरवणूक काढायचे ठरले.
उघडी गाडी फुलांच्या माळांनी सजवली गेली, ढोल ताशांचा मोठा आवाज सुरू होता, हजारो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक सुरू झाली. विजयी उमेदवार मतदारांना हात जोडून विनम्रतेने आभार व्यक्त करत होता. नागरिक सुद्धा त्या मिरवणुकीत त्या आमदारा जवळ येत आणि फुलांचा हार त्याच्या गळ्यात घालत त्याचे अभिनंदन करत. काही लोक फटाके फोडून त्या मिरवणुकीचे स्वागत करीत. एकंदरीत सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
अश्यातच मिरवणूक मध्यात आली असतांना खुल्या गाडीत सगळ्या नागरिकांना अभिवादन करत असलेल्या त्या आमदाराचे लक्ष दूर असलेल्या एका मैदानाकडे गेले. काही लोक एकत्र जमून काही तरी करत असावेत असे दुरून जाणवत होते, थोडं नीट बघितल्यावर त्या आमदाराला दिसले तिथे एक भगवा ध्वज सुद्धा दिसतोय. आणि एकदम गाडी वर थोडी हालचाल झाली... आपल्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्ती च्या गळ्यात आपल्या गळ्यातील सगळे हार टाकून त्याला सांगितले तुम्ही मिरवणूक पुढे सुरू ठेवा मी येतोच आणि हा एकमात्र विजयी उमेदवार अचानक गाडीतून उतरला आणि कुठे तरी गेला. कुठे गेला असावा बरं...??? दुसऱ्या पक्षाने दिलेल्या थोड्या पैशांच्या आमिशामुळे पक्ष सोडून...??? नाही नाही ते शक्यच नाही. तो विजयी आमदार गेला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये ध्वजाला प्रणाम करायला. थोडा वेळ तिथे थांबून तिथल्या मुख्य शिक्षकांना आपली अडचण सांगून परत निघण्यासाठी विचारणा केली आणि आपल्या कामाला (मिरवणुकीत) निघून गेले.
उद्देश एकच भगव्या ध्वजाला माझा रोजच प्रणाम झाला पाहिजे... त्या आमदारांचे नाव होते स्वर्गीय "-रामभाऊ म्हाळगी".
एक संघ स्वयंसेवक, संघ प्रचारक संघ सांगेल त्या क्षेत्रात काम करायला जातो परंतु संघ शाखेपासून कधीच दूर जात नाही. आपल्या विजयी मिरवणुकीतून सुद्धा ध्वज आणि शाखा दिसल्यावर लगेच ध्वजाला प्रणाम करायला जाणाऱ्या रामभाऊ यांच्या सारखे आपण होणे हीच त्यांना स्मृतिदिनी खरी आदरांजली होय...
...भारत माता की जय...
🖋️प्रणव अनंत नागराज, भुसावळ
८०५५५२३७७९
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या