{स्व. मधुकर (दाजी) जाधव यांच्या विषयी आपल्या स्वतःच्या काही आठवणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर व्यक्त कराव्यात...}
--------------------------------------------------------

@हरीश कुलकर्णी

     आपण काहीतरी गमावल्याची तीव्र भावना निर्माण झाली. आणि जे गमावलं ते परत मिळवण्यास आपण हतबल आहोत ही आपली दुर्बलता पण लक्षात आली. दाजी गेले. मधूकर श्रीरंग जाधव, देवगिरी प्रांताचे मा. प्रांत संघचालक, पण सर्वांचे दाजी. 

     कधीकाळी घरात घेतलं जाणार नाव कित्येक वर्षांपासून संघच ज्यांनी आपल कुटुंब मानलं होतं, त्या संपूर्ण संघाचे ते दाजीच झाले होते. संघ आणि दाजींमध्ये कधी द्वैत नव्हतच. संघात आल्यापासून जीवनाच्या पूर्णाहूती पर्यंत अपवादाने, पण एखादे वर्ष नाही जेंव्हा त्यांच्याकडे संघाची जबाबदारी नव्हती. अनथक अविरत साधना त्यांनी कधी सोडलीच नाही. अगदी जाण्यापूर्वी चार दिवसआधी झालेल्या वर्षप्रतिपदेच्या आॅनलाईन ऊत्सवात सहभागी होऊन आद्यसरसंघचालक प्रणाम दिला गेला पाहीजे यासाठी त्यांची धडपड आणि उत्सवात सहभाग होता. ते आल्याऩंतरचे समाधान
त्यांची संघावरची अविचल निष्ठा जाणवून देणारी आहे. 

     बोलण्यात सहजपणे येणारे तुकाराम महाराजांचे अभंग, त्यांचा गाथेचा अभ्यास हे त्यांचा अध्यात्मिक पिंड  लक्षात आणून देणारा होता. स्वाभाविक उत्स्फूर्त पणे त्यांनी रचलेल्या अभंगाच संकलन 'अभंगमधू' सर्वांनाच भावून गेलं.

     ४५-५० वर्षांचा त्यांचा संघातला प्रदीर्घ प्रवास होता. या संपूर्ण काळात किती घटना, प्रसंग, आव्हाने आणि त्याच्यावरचे तात्कालिक व दीर्घकालीन स्थायी उपाय याचे ते साक्षीदार नव्हे, तर विचार विनिमयातले प्रमुख घटक राहीले याची गणनाच होऊ शकत नाही. पण हा तर त्यांच्यावर आलेल्या अनेक जबाबदा-या त्यांनी कशा समर्थपणे पेलल्या याचा संदर्भ. संघाच्या सदासर्वकाळ जबाबदारीत असताना कार्यकर्त्यांना आणि संपर्कात आलेल्या सर्वांना त्यांनी दिलेली सलगी कायम स्मरणात रहाणारी आहे. 

     आपल्याला संधी मिळावी अशी मागणी घेऊन जाणा-याची अपेक्षा त्या वेळेस पूर्ण करू शकत नसले तरी त्या स्वयंसेवकाचं स्मरण ठेवून त्याला संधी मिळवून देण्यासाठीची त्यांची धडपड, प्रत्येकाविषयी त्याच्या मनातला आत्मीयतेचा भाव दाखवून देणारी होती. 

     समाजातील विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील व्यक्ती,  विविध प्रश्नात  संघाचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी त्यांच्याकडे जात. नेहमीच संघ म्हणजे समाजहीत डोळ्यासमोर ठेवून दाजींनी दिलेला सल्ला पटो अथवा न पटो त्यांच्या शांत पण ठाम पणे सांगण्याच्या शैलीमुळे सर्वजण त्यांचा सल्ला आनंदाने स्वीकारत याची कितीतरी उदाहरणं सांगता येतील.

      देवगिरी प्रांतातील संघकामाच्या प्रत्येक टप्यावर दाजींचे अस्तित्व आहे.  हे सर्व असताना  स्वीकारणे व सोडण्यातली त्यांची सहजता विलक्षण होती. संघाचे नवीन नवीन येणारे आयाम संघाच्या मूलभूत चिंतनातील विकासाची प्रक्रिया कशी आहे हे समजावून सांगतानाची त्यांची कुशलता त्यांचा संघकामाचा अनुभव व आकलन लक्षात आणून देणारी होती. ओघवती बोलण्याची शैली, विचारांची स्पष्टता, योग्य उदाहरणांची पेरणी, झालेल्या बैठकीचे सार आपल्या बोलण्यात आणण्याची त्यांची हातोटी हे ठळक पणे जाणवणारे होते. 

     छत्रपती शिवाजीमहाराज, संत वाङग्मय याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. पहिल्या लाॅकडाऊन मध्ये संताच्या आॅनलाइन बैठकीत संघाचं काम करणारे दाजी एक संतच आहेत असे एक महाराज म्हणाले, हे त्यांच्या सात्विक जीवनाकडे पाहिल्यावर जाणवल्याशिवाय राहणार नाही.
संघाच्या देवगिरी प्रांताच्या सर्वोच्च जबाबदारीवर काम करत असतानासूद्धा त्यांच्या जीवनशैलीतील साधेपणा सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शकच आहे. आपल्या आई-वडीलांप्रती त्यांचा स्नेह व आदर त्यांच्या वागण्या बोलण्यातून नेहमीच जाणवत होता. त्याच आत्मियतेने त्यांनी आपल्या वडीलांची सेवा केली.

     एक ग्रामीण भागातला युवक आपल्या परिश्रमाने स्वतःची भौतिक आणि अध्यात्मिक प्रगती साधत, मुल्याधारित समाजाभिमूख जीवन जगता येऊ शकतं आणि ते यथार्थ करता येऊ शकतं, या यशस्वी ग्रंथाचं नाव आहे दाजी ऊर्फ मधूकर श्रीरंग जाधव.

     उणीव तर जाणवणारच, पण पांगळं करणारं मार्गदर्शन त्यांनी कधी केलच नाही. म्हणून त्यांच्या जीवन प्रकाशात त्यांनी दाखवलेला अनथक अविरत साधनेचा मार्ग आणि संघ विचारावरील अविचल निष्ठेची शिकवण लक्षात ठेवून पूढे चालत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होऊ शकते..!

- हरीश कुलकर्णी
देवगिरी प्रांत कार्यवाह

Published by @VSKDevgiri