शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आज समाधी दिवस. नाथ षष्ठी.
मूळ हिंदू जीवनपद्धतीतील
“समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्।विनश्यत्स्वविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति।।”
सारख्या एकत्वाच्या तत्वज्ञानाला डाग लावणाऱ्या व्यवहार रुढी समाजात घुसल्या. संतांनी त्या काढून टाकण्यासाठी प्रबोधन आणि कृती दोन्हींची पराकाष्ठा केली. या मालिकेतील अजून एक नांव संत एकनाथ.
आपण रेडीयो टीव्हीवर त्यांच्या अनेक लोकप्रिय रचना ऐकतो (‘वारियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले’; ‘नको वाजवू श्रीहरी मुरली’, ‘काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल’, ‘ॐकार स्वरूपा सद्गुरु समर्था’ ‘अरे कृष्णा, अरे कान्हा, मनरंजन मोहना’.. किंवा ‘विंचू चावला..) पण या थोर संताने सामाजिक समरसतेसंबंधी फार मोठं काम केलंय हे फारसं पुढे येत नाही. क्वचित त्यांची तथाकथित अस्पृश्याच्या मुलाला कडेवर उचलून घेतल्याची किंवा घरातील समारंभात ब्राह्मणांआधी अंत्यजांची पंगत वाढली या कथा सांगितल्या जातात पण त्यांनी अभंग, ओवी, गवळण, भारूड या विविध लोकमाध्यमांतून जे प्रबोधन केलंय त्याचा आवर्जून उल्लेख केला पाहीजे!
समाजात घुसलेल्या विकृतींवर कोरडे ओढताना तथाकथित अस्पृश्याचा स्पर्श देवाला (मूर्तीला) झाला म्हणून पाण्याने धुता.. देवापेक्षा पाणी शक्तीशाली झालं काय? असा परखड सवाल ते करतात.
“नीचाचेनि स्पर्शे देवो विटाळला।
पाणियें प्रक्षाळूनी सोंवळा केला।।
देवापरिस जळ सबळ केले।
ज्ञान ते दुर्बल होऊनी ठेलें।।
एका जनार्दनी सात नाही भाव।
संशये चि देव नाही केला।।”
संत तुकोबारायांप्रमाणेच पंढरीला कुठलेही जन्माधारित कृत्रिम भेद नाहीत; हे सांगताना नाथमहाराज म्हणतात:
“अठरा वर्ण याति। भेद नाही तेथें जाती।।
अवघें रंगले चिंतनी। मुखीं नाम गाती कीर्तनी।।
शुद्ध अशुद्धची बाधा।एका जनार्दनी नोहे कदा।।”
तो काळ लक्षात घेतला तर त्यांचं-
“आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण।
यातीकुळ नाही लहान ॥१॥
आम्हा सोवळें वोवळे नाही।
विटाळ न देखो कवणे ठायी॥२॥
आम्हा सोयरे जे जाहले।
ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥
एकाजनार्दनी बोधु।
यातिकुळींचा फिटला संबंधु॥४॥
हे प्रबोधन किती क्रांतीकारी होतं हे लक्षात येतं.
देव तर सगळ्यांतच आहे. मग लहान- मोठं असं जन्मावरून कोण कसं ठरेल?
निसर्ग भेद करीत नाही. मग तुम्ही (माणसं) तरी कशाला करता? काळ्या आणि पांढऱ्या गायींचं दूध एक केलं तर वेगळं करता येत नाही. एकात्म होऊन जातं. मग तुम्ही कसले वेगवेगळे वर्ण घेऊन बसलात?
नातरी श्वेत कृष्ण गाई।
दोहोनी क्षीर मेळविता एके ठायी।
केले तेथे भेदू नाही। वर्णावर्णाचा।।
तैसे अद्वितीयेचा गावी। वर्णावर्ण पदवी।
नसोनिया अनुभवी। सुखवस्ती वासु।।
प्रबोधन रोखठोक आणि स्पष्ट आहे-
“जया म्हणती नीच वर्ण।स्री शुद्रादी हीनजन॥
सर्वांभूती देव वसे।नीचाठायी काय नसे?॥
नीच कोठोनि जन्मला।पंचभूता वेगळा जाला।
तया नाही जनन।सवेचि होत पतन॥
नीच म्हणोनि काय भुलि।एकाजनार्दनी देखिली॥”
‘दादला नलगे बाई’ या लोकप्रिय भारूडात तर चक्क ‘समरस’ शब्द वापरलाय!
“एका जनार्दनी समरस झाले। तो रस येथे नाही।”
‘बोधाचा’ झेंडा हाती घेऊन ‘भेदरहीत’ वारी करायचं त्यांचं स्वप्न आहे.
आईचा जोगवा जोगवा मागेन।
द्वैत सारूनी माळव मी घालीन।।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन।
भेदरहीत वारीसी जाईन।।
@प्रसन्न पाटील
- विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या