शिवछत्रपतींचे स्वराज्य म्हणजे "राष्ट्रहित सर्वोपरी"

    छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हे खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य होते. स्वयंस्फुर्तिने तयार झालेले व स्वयंप्रेरित असलेले स्वराज्य हे 'राष्ट्रहित सर्वोपरी' या महान विचाराचे उत्कृष्ट उदाहरणच आहे. एप्रिल १६६३ मधे औरंगजेबाला लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराजांनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे. फारसी भाषेत असलेल्या त्या पत्रात ते एक ओळ लिहितात, " इं कसरा मुहाफिजते वतन खुद लाजिम " याचा अर्थ होतो "माझ्या देशाचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे." या एका ओळीतच स्वराज्याची  प्रेरणा काय असेल हे आपल्याला समजून येईल. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन शिवरायांनी घौडदौडीला प्रारंभ केला. अनेक संकटांना तोंड देत स्वराज्य निर्मितीच कार्य शिवरायांनी केलं. जर शिवाजी महाराजांनी ठरवले असते तर ते ऐशआरामाचे जीवन जगू शकले असते कारण ते एका शूरवीर सरदाराचे पुत्र होते, राजे होते. परंतू वीर शहाजी व थोर जिजाऊंच्या संस्कारांमुळे त्यांनी स्वराज्याची संकटांनी भरलेली खडतर परंतू आत्मसन्मानाने जगवणारी, रयतेचे आणि त्यायोगे देशाचे कल्याण करणारी वाट निवडली.


    स्वराज्याचा उद्योग वाढत असतांना त्याला लगाम घालण्यासाठी व हे स्वप्न धूळीस मिळवण्यासाठी अफजलखानाचे मोठे संकट स्वराज्यावर चाल करून आहे. यावेळेस राजगडावर शिवबांच्या प्रिय राणीसाहेब व शंभूबाळाच्या आईसाहेब सईबाई या क्षयरोगाने ग्रासलेल्या होत्या त्या आता काही दिवसांसाठीच्याच सोबतीण होत्या. मात्र स्वराज्यासाठी मोह आवरून शिवराय अफजलखानाशी दोन हात करण्यासाठी प्रतापगडावर आले आणि काही दिवसातच बातमी आली की सईबाई देवाघरी गेल्या. काय मनःस्थिती झाली असेल महाराजांची. इकडे राजगडावर अडीच वर्षांच्या शंभूबाळाला मांडीवर घेऊन प्रतापगडावर क्रूर अफजलखानाशी लढायला गेलेल्या शिवबांचा विचार करतांना त्या राजमाता जिजाऊला काय वाटले असेल.

    अफजलखानाने आधी त्या थोर जिजाऊच्या पतीची धिंड काढली होती व एका पुत्राचा जीव घेतला होता हे आठवून त्या मातेला आपल्या दुसऱ्या प्राणप्रिय पुत्राची किती काळजी वाटली असेल. परंतू स्वराज्यासाठी आणि राष्ट्रप्रथम म्हणून शिवबांनी व आऊसाहेबांनी स्वतःच्या सुखाची आहुती दिली. पुढे अफजलखानाला फाडल्यावर लगेच विजयोत्सव न साजरा करता या संधीचे सोने करत स्वराज्याचा विस्तार शिवबांनी केला. हा प्रताप काय सहज झाला असेल का. किती त्याग असेल यामागे. परंतू शिवरायांसाठी या वैयक्तिक अडचणींपेक्षा  स्वराज्य महत्त्वाचे होते आणि वैयक्तिक हितापेक्षा एकच हित महत्त्वाचे होते आणि ते म्हणजे राष्ट्रहित.

    खंडोजी खोपड्याने स्वराज्याशी गद्दारी केली होती परंतू अफजल वधानंतर तो कान्होजींना विनवू लागला व शिवबाच्या क्रोधापासून वाचवा असे म्हणू लागला. म्हणून त्याची रदबदली स्वराज्याचे सच्चे सेवक कान्होजी जेध्यांनी शिवरायांसमोर केली परंतू शिवरायांनी एके दिवशी  त्या खोपड्याचा उजवा हात व डावा पाय तोडून त्याला गद्दारीची सजा दिली आणि या शिक्षेने नाराज झालेल्या कान्होजी काकांना समजवतांना म्हटले," जर या हरामखोराला आज आपण असेच शिक्षा न करता सोडले तर उद्या कोणीही स्वराज्य द्रोह करायला घाबरणार नाही" हे ऐकूण कान्होजी काकांची नाराजी दूर झाली. या घटनेतून असे दिसते की कुणी सन्माननीय व्यक्ती जर स्वराज्यद्रोह्याचा वशिला लावत असेल तर तेथे वैयक्तिक नात्यांपेक्षा शिवराय स्वराज्यहिताला महत्व देत. 

    बेलवडिच्या सावित्री बाई प्रकरणात छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या सख्ख्या मेहूण्याचे सखोजी राजे गायकवाड याचे डोळे काढल्याची कथा प्रचलित आहे. स्वराज्यद्रोहि असो कि स्रीयांकडे  वक्र दृष्टीने बघणारा अत्याचार  करणारा नराधम यांना शिवरायांनी कठोर शिक्षा केलेली आहे आणि शिक्षेची अंमलबजावनी तात्काळ केली आहे आणि म्हणून स्वराज्यात असल्या प्रकारचे गुन्हे करायची कुणाची हिंमत होत नसे. आज महाराष्ट्रात "हिंगणाघाट" सारख्या अनेक घटना घटत आहेत परंतू शिक्षा न झाल्यामुळे अनेक नराधमांचे फावते आहे आणि दिवसेंदिवस इथलीअब्रू राख होत आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.  स्वराज्यासाठी अनेकवेळा शिवाजी महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. स्वराज्याच्या विचाराच्या विरोधात जर कुणी रक्ताच्या नात्याचाही गेला असेल तर त्याची गय महाराजांनी कधी केली नाही आणि म्हणून सख्खे मेहूणे आणि राणीसाहेब सकवारबाईंचे भाऊ सरदार सखोजी गायकवाडांचे डोळे काढतांना नात्यांचे पदर महाराजांना कधीच आड आले नाहीत. रयतेला काडीचाही त्रास न व्हावा यासाठी हा शिवकल्याण राजा सतत दक्ष असे आणि म्हणून चारित्र्याने आणि कर्तृत्वाने श्रीमंत योगी असलेला हा राजा सर्वांना प्राणप्रिय झाला होता. सर्व सरदार, मावळे, रयत या जाणता राजासाठी आणि स्वराज्यासाठी मरायला आणि मारायला तयार झाली होती.
                 
    छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रहिताच्या विचारांचा परिसस्पर्श सर्व मावळ्यांना व रयतेला झाला होता. घोडखिंडीत मृत्यू समोरून साक्षात येतांना दिसत असल्यावर वीर बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना पुढे जायला सांगत होते व मी खिंड अडवतो अन् लढवतो हे सांगत होते. मात्र शिवराय नाही म्हणत तेथेच थांबून लढण्याचा हट्ट करू लागले. बाजीप्रभू शिवरायांना म्हटले,  "आपण साहेब कामावरी मरतो. साहेब कामावरी पडलो तरी मुलांलेकरास अन्न देणार महाराज आहेत." या वाक्यातून महाराजांप्रती असलेला बाजी प्रभूंचा विश्वास  दिसून येतो आणि जणू काही त्यांचा भाव "आमच्यासारखे लाख मेले चालतील पण शिवरायांसारखा  लाखांचा पोशिंदा जगायला पाहीजे" हा दिसून येतो. बाजीप्रभूंच्या हट्टामुळे शिवराय जडअंतकरणाने विशाळगडाकडे जायला निघाले. त्यावेळी बाजीप्रभू व तिनशे बांदल सेनेनी पराक्रम गाजवून स्वतःच्या पवित्र रक्ताने ती घोडखिंड पावन केली.

    बाजीप्रभूंच्या त्या वाक्यामध्ये व कर्तृत्वामध्ये त्यांना स्वतःच्या प्राणापेक्षाहि राष्ट्रहित  जास्त महत्त्वाचे वाटते. शिवरायांनी अशीच राष्ट्रहित सर्वोपरी असणारी माणसं मिळवली आणि घडवली होती. आणि म्हणून पुढे स्वतःच्या मुलाच्या लग्नापेक्षा कोंढाण्याला स्वराज्यात आणण्यासाठी गेलेले आणि धारातीर्थी अमर झालेले वीर तान्हाजी असोत, स्वतःचा वाडा विकून स्वराज्याची राजधानी मोठ्या कष्टाने बांधणारे हिरोजी इंदुलकर असोत, आग्राच्या कैदेत असतांना जीवाची पर्वा न करता महाराजांच्या जागेवर झोपणारे हिरोजी फर्जंद असोत, सिद्दी जौहरच्या समोर जाऊन स्वराज्यासाठी बलिदान केलेले शिवा काशीद असोत असे अनेक शूर वीर स्वराज्यासाठी , स्वराष्ट्रासाठी लढले आणि वेळप्रसंगी त्यांनी  सर्वोच्च बलिदान सुद्धा दिले कारण त्यांना एकच मंत्र प्राणप्रिय होता तो होता स्वराज्याचा म्हणजेच राष्ट्रहित सर्वोपरी.

    छत्रपती  शिवराय स्वराज्याबाहेर खुप दिवस जरी असले आणि त्यावेळेस स्वराज्यावर कुठलेही संकट जरी आले तरी स्वराज्याला काहीच त्रास होत नसे. सगळे मावळे व रयत या संकटांवर राजा नसतांना देखील मात करत. स्वतः शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात आणि औरंगजेबाच्या जाळ्यात अडकले असतानाही स्वराज्याचा कारभार नीट चालत राहिला कारण शिवरायांनी व्यक्तीनिष्ठेपेक्षा राष्ट्रनिष्ठा महत्त्वाची हा विचार सर्वांमधे रूजवला होता.या विचारामुळेच शिवरायांच्या निधनानंतरही महाराष्ट्र बलाढ्य औरंगजेबाशी २७ वर्ष झुंजत राहीला. आणि पुढे स्वराज्याचा विस्तार होऊन दिल्लीचे तख्तही महाराष्ट्र राखायला लागला. ही सगळी ताकद होती शिवरायांच्या स्वराज्याच्या राष्ट्रहिताच्या विचारांची व कर्तृत्वांची. आजही छत्रपतींचे नाव जरी उच्चारले तरी रोमांच उभे राहतात व राष्ट्रहित सर्वोपरी चा मंत्र आठवतो आणि म्हणूनच आपल्या शूर सैनिकांची , मराठा बटालियनचीही युद्ध घोषणा आहे "छत्रपती शिवाजी महाराज की जय."

    जेव्हा देशातील जनता स्वार्थी होते तेव्हा देशाचा घात होतो आणि जेव्हा देशातील जनता देशाच्या हिताचा विचार करते तेव्हा मात्र देश खुप प्रगती करतो आणि महानसुद्धा होतो.  परंतू आपल्या समाजाला आत्मविस्मृती नावाचा भयानक रोग नेहमी जडत असतो आणि आपला  राष्ट्रहिताचा विचार लोप पावत असतो अशावेळी छत्रपती शिवरायांचे चरित्र आपण जर वाचले आणि आचरण केले तर मात्र जीवनभर आपण देशाचा विचार करून आणि पुन्हा हे स्वराज्य सुराज्यात परिवर्तित करू शकतो कारण छत्रपती शिवरायांचे चरित्र सांगते "राष्ट्रहित सर्वोपरी."
                                                                             
---- प्रविण प्रल्हाद नायसे (९९७०७३८७६९)

#devgirivsk

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या