"जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा है", ही घोषणा मी लहानपणापासून शाखेत देत आलो आहे. परंतु त्यावेळी वाटायचे देशातील हजारो क्रांतिकारकांप्रमाणे हे सुद्धा क्रांतिकारकच असतील. परंतु जेव्हा ३७० कलम रद्द झाले, त्यावेळी त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली. आणि असे लक्षात आले, ही व्यक्ती तर प्रखर राष्ट्राभिमानी, त्यागी, प्रकांड पंडित, ज्ञानी होती. म्हणून आमच्या सारख्या तरुण पिढीला त्यांचे त्यागमय जीवन समजावे म्हणून हा लेखन प्रपंच.
श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म बंगालमधील कलकत्ता या गावी ६ जुलै १९०१ ला सर आशुतोष मुखर्जी व योगमाय या दाम्पत्याच्या पोटी झाला. वडील समाजसेवक, न्यायाधीश, गणिततज्ञ, उपकुलपती होते. वडिलांचा राष्ट्रभक्ती, निर्भीडता आणि समाजसेवेचा वारसा आणि बंगालच्या मातीचा आदर्श घेऊन जन्मलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे संपूर्ण जीवन हे सुद्धा नुसते बंगालच नव्हे तर संपूर्ण भारताला त्याग समर्पण आणि बलिदानाचा आदर्श घालून देणारेच आहे.
लहानपणापासून त्यांना पुस्तक वाचनाची खूप आवड होती. घरात सर्वत्र पुस्तकेच पुस्तके असत. लहान वयातच त्यांची अनेक पुस्तके वाचून झालेली होती. गरजू लोकांचे दुःख, त्यांच्या यातना त्यांना नेहमी आपल्याशा वाटत. त्यांच्या साठी आपण काही तरी केले पाहीजे ही भावना लहान वयातच त्यांच्या मनात रुजली होती. ते मॅट्रिक ला असतांना त्यांच्या वर्गातील एका हुशार विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क भरण्याचे पैसे नसल्याने परीक्षेला बसता येणार नव्हते, परंतु एका शुल्लक कारणावरून एका हुशार मुलाचे नुकसान होईल म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलून शाळेच्या फंड मधून त्या मुलाचे शुल्क भरायला लावून त्या मुलाला न्याय मिळवून दिला. असा हा अडचणीतून मार्ग काढण्याचा, योग्य व्यक्तीस न्याय देण्याचा स्वभाव लहानपणापासूनच श्यामाप्रसादजींचा होता.
१९१७ साली मॅट्रिक पास झाल्यावर, १९२१ साली विद्यालयात प्रथम क्रमांकाने बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले. आणि १९२३ साली एम.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर वकिलीचा शिक्षणासाठी इंग्लंड ला गेले. इंग्लंडमधून भारतात परत आल्यावर ज्या कलकत्ता विश्वविद्यालयात प्रोफेसर असणे ही सुद्धा मोठी गोष्ट होती, त्या कलकत्ता विश्वविद्यालयाचे सर्वात कमी वयाचे म्हणजे अवघ्या ३३ वर्षाचे असतांना उपकुलपती झालेत. आपल्या या कार्यकाळात त्यांनी विश्वविद्यालयात अनेक बदल करून उच्च शिक्षण प्रणाली राबवली. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी प्रेरणा दिली. त्यांना जमेल ती सर्व मदत करून शिक्षण संस्थांना एक वेगळाच आदर्श घालून दिला. १९३८ साली कलकत्ता विश्वविद्यालयाने डी.लिट. आणि त्याच बरोबर बनारस विश्वविद्यालयाने L.L.B. या मानद पदवी दिल्या.
१९२२ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा विवाह झाला. दोन मुलं आणि दोन मुली असे अपत्य झालेत. उत्तम संसार सुरू असतानाच अवघ्या ११ वर्षांनंतरच म्हणजे १९३३ साली सुधा चक्रवर्ती यांचे निधन झाले. परंतु त्या काळात दुसऱ्या लग्नाची पद्धत असताना सुद्धा श्यामाप्रसादजींनी पुन्हा लग्न न करता आपले संपूर्ण आयुष्य भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित केले. त्यानंतर त्यांनी बंगालच्या राजकारणात प्रवेश केला. १९४३ साली बंगाल मध्ये भीषण दुष्काळ पडला. जवळ जवळ ३० लाख लोक मृत्युमुखी पडले. परंतु इंग्रज सरकारने सामान्य नागरिकांना काहीही मदत देऊ केली नाही. तेव्हा राजकारणी, व्यापारी, स्वयंसेवी संस्था यांच्या सोबत एक समिती गठीत करून डॉ. मुखर्जींनी सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल असे कार्य केले.
याच बरोबर देशभरातील अनेक क्रांतिकारक, समाज सुधारक यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध येऊ लागला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अखिल भारतीय हिंदु महासभेचे ते सक्रिय कार्यकर्ते झालेत. १९४० मध्ये ते कार्यकारी अध्यक्ष तर १९४४ मध्ये त्यांना हिंदू महासभेचे अध्यक्ष करण्यात आले. इंग्रज सरकारने स्वातंत्र्य देताना आखलेल्या फाळणीच्या योजनेला काँग्रेसी नेत्यांची मान्यता होती. जवळ जवळ संपूर्ण बंगाल, आसाम आणि पंजाब हे पाकिस्तानात जाणार हे समजल्यावर डॉ. मुखर्जी लगेच गांधीजींना भेटायला गेलेत. संपूर्ण भारतात या ब्रिटिश फाळणी विरुद्ध जागृती निर्माण केली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याकडे अर्धा का होईना बंगाल, पंजाब आणि पूर्ण आसाम राहिले. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. या संपूर्ण फाळणी वेळी झालेली दुर्दशा डॉ.मुखर्जींना बघवत नसे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदूंना भारतात आणण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. महात्मा गांधींच्या आग्रहावरून स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात वाणिज्य आणि उद्योगमंत्री असे महत्त्वाचे मंत्रीपद सांभाळली. अवघ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी बंगलोर एअरपोर्ट, चित्तरंजन रेल्वे इंजिन कारखाना असे अनेक प्रकल्प सुरु करून भारताच्या उद्योग क्षेत्रातील पाया मजबूत केला. परंतु पाकिस्तानात होणाऱ्या अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार आणि नेहरू-लियाकत यांच्या सामंजस्य करारामुळे केंद्रीय सरकारच्या निष्क्रियतेवर नाराज होत मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. श्री गुरुजींशी विचारविनिमय करून 'भारतीय जनसंघ' या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली. एका राष्ट्रवादी पक्षाची वाटचाल त्यांच्या सारख्या परिश्रमी आणि अटल नेतृत्वामुळे संपूर्ण भारतभर पसरली आणि एक प्रखर विरोधी नेता म्हणून त्यांनी एक वेगळीच ओळख देशाला दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरच्या विशेषाधिकाराच्या विरुद्ध देशभर आंदोलन पेटले, 'एक देश में-दो निशान, दो विधान और दो प्रधान' नही हो सकते, असे म्हणत डॉ. मुखर्जी ८ मे ला पंजाबमधून जम्मू ला जाण्यासाठी रवाना झालेत.
एक तर जम्मू आणि काश्मीरला भारताचे संविधान प्राप्त करून देईल, अन्यथा माझे प्राण तरी जातील असे म्हणत विनापरवाना ते जम्मू-काश्मीरमध्ये ११ मे ला दाखल झाले. रावी नदी वरील पूल ओलांडताना जम्मू पोलिसांनी त्यांना अटक करून जेलमध्ये टाकले आणि त्याच जेलमध्ये रहस्यमयरित्या २३ जून १९५३ ला त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे जम्मू काश्मीरचा प्रश्न तसाच अधांतरी राहीला आणि त्याची देशाला फार मोठी किंमत मोजावी लागली. मात्र ५ ऑगस्ट २०१९ ला भारतीय संसदेने जेव्हा ३७० वे कलम रद्द केले, आणि काश्मीर ते कन्याकुमारी भारत एक झाला त्यादिवशी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे या देशासाठी केलेल्या बलिदानाचे सार्थक झाले.
हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरली!
लेखक - प्रणव नागराज
©️विश्व संवाद केंद्र, देवगिरी
2 टिप्पण्या