युद्धात जिंकता येत नाही ती अयोध्या. हिमालयाच्या मांडीवर सद्गुण क्रीडा करत , शरयू खडकाळ मार्ग काढून अनेक मैदानं संतृप्त करत येते. वैदिक काळापासून अखंडपणे चालू असलेला हा सद्गुण प्रवाह, आपल्यामध्ये भारताचा हजारो वर्षे जुना इतिहास साठवून आहे. या पतित पावन नदीच्या ('सरयू मैया') काठावर अयोध्या नगरीत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे यांचे वास्तव्य आहे. हे रामाचे जन्मस्थान आहे."राम" ही भारतीय संस्कृतीची दृढ आणि शाश्वत अशी अभिव्यक्ती आहे. म्हणूनच, अयोध्या ही ह्या मृत्युंजय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. राम आणि अयोध्या एकमेकांना पूरक आहेत.
दशरथनंदन रामच्या जन्मानंतर अयोध्याचे संबंध संपूर्ण जगाशी जोडले गेले. अयोध्या हे स्वर्गाचे प्रवेशद्वार बनले. जगातील सर्वात प्राचीन ज्ञानाचा संग्रह असलेल्या वेदांच्या निर्मात्याने पुढील श्लोकात अयोध्याचे
महात्म्य प्रकट केले आहे.
अष्ट चक्रा नव द्वारा देवानां यूः अयोध्या.
तस्या हिरण्यमयः कोशः स्वर्गो ज्योतिषावृतः (अथर्व वेद, १०-२-३२ )
राम हाच भारतीय जीवन मूल्यांचा विशाल ध्वज असल्यास; अयोध्याला या ध्वजाचा (भारतीय संस्कृती) ध्वजस्तंभ समजणे अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणूनच राम, अयोध्या आणि भारत हे तिन्ही सम समान भावप्रवाह आहेत आणि ते अवध्य आहेत त्यामुळे तिघांनाही पराभूत करणे अशक्य आहे.
इतिहास साक्षी आहे कि, राजा मनूने माता शरयूच्या किनाऱ्यावर अयोध्या शहर वसवले होते. अनेक गौरव गाथा अयोध्या ने अनुभवल्या आहेत. सोबतच होत गेलेली अधोगती सुद्धा पाहिली. पण नेहमीच अयोध्येने तिचे नाव सार्थ ठरवले. प्राचीन काळापासून नेहमीच परकीय आक्रमकांची गिधाड अयोध्येत घिरट्या घालत आली आहेत. भारतावर आक्रमण करणार्या प्रत्येक परदेशी आक्रमणकर्त्याने अयोध्याला आपले लक्ष्य केले. अयोध्या जिंकल्याशिवाय भारताच्या विजयाची कल्पनासुद्धा अपूर्णच होती. जणू महानगरी म्हणजेच भारताच्या राष्ट्राची उत्पत्ती. हेच कारण आहे की, भारताच्या अनेक राजांनी आणि लोकांनी हजारो वेळा बलिदान देऊन अयोध्याचे रक्षण केले.
एक काळ असा होता जेव्हा अयोध्येच्या सूर्यवंशी सुकुमारांनी अयोध्याचा पारंपारिक शत्रू महापापी पौलस्त्य राजवंश दासग्रीव (रावण परंपरा) ह्याच्या घरी जाऊन पापी लंकेचा सर्वनाश केला होता. हिंदू समाज ज्या सात तीर्थांना सर्वोत्तम मानतो. त्यांचा प्रवास करणे मोक्षप्राप्तीसाठी सर्वश्रेष्ठ मानतो, त्यांच्यामध्ये अयोध्याची गणना सर्वोपरि आहे. अयोध्याला भगवान विष्णूचे शीर्ष म्हटले जाते. महर्षिंनी अयोध्येला मोक्षदायिनी म्हटले आहे.
अयोध्या मथुरा माया, काशी कांची अवंतिका.
पुरी द्वारावतीश्चैव सप्तैता मोक्षदायिकाः
जैन आणि अयोध्या:
अयोध्या हे जैन धर्मांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. जैन धर्मात तीर्थंकरांचे विशेष स्थान असे आहे. तीर्थंकर हे जैन धर्माच्या सिद्धांतांचा प्रचार- प्रसाराचा आधारस्तंभ होते असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही. जैन धर्माचे 22 तीर्थंकर सूर्यवंशी होते. त्यातील बहुतेक जण अयोध्याचेच होते. अयोध्येतच जैन धर्माची स्थापना झाली हेही उल्लेखनीय आहे. म्हणूनच, अयोध्या भगवान राम तसेच जैन धर्माचे जन्मस्थान आहे.
बौद्ध आणि अयोध्या:
अयोध्या हे बौद्ध संस्कृतीचे एक सशक्त आणि भव्य केंद्रही राहिले आहे. प्राचीन कौशल प्रदेशाची राजधानी असलेल्या अयोध्याने अनेक बौद्ध भिक्खू आणि पंडितांना जन्म दिला. प्रसिद्ध बौद्ध दानशीला विशाखा, महादानी पिडिक
आणि कौशल प्रांताचा सम्राट, बौद्ध परोपकारी महाराजा प्रसेनजित हे सर्व अयोध्याचे रहिवासी होते. बौद्ध स्तूपांचे अवशेष आजही अयोध्येत मोठे टेकड्यांच्या रूपात दिसतात. भगवान बुद्ध देखील अयोध्येला एक पवित्र शहर मानत. भगवान बौद्ध चातुर्मासात (पावसाळ्यात) विशेष ध्यान करायचे. या तपश्चर्येसाठी ते एक पवित्र आणि विशेष आध्यात्मिक स्थान शोधत असत. बौद्ध साहित्यानुसार त्यांनी त्यांचं आयुष्यातले २५ चातुर्मास अयोध्याजवळ श्रावस्ती मध्ये आणि १४ अयोध्येत व्यतीत करून तपश्चर्या पूर्ण केली होती.
शीख धर्म आणि अयोध्या:
अयोध्येत ब्रह्मकुंड नावाच्या ठिकाणी शीख बांधवांचे प्रसिद्ध गुरुद्वारा देखील आहे. असे म्हणतात की, श्री गुरुनानक देव जी जेव्हा भारत दौर्यावर अयोध्येत गेले होते तेव्हा अकाल पुरुषांच्या पूजेमध्ये त्यांनी अनेक दिवस येथे जप केला आणि अयोध्येतील लोकांना ओंकाराच्या अस्तित्वाचा उपदेश केला.
शीख मान्यतेनुसार श्री गुरु नानक देव जी यांना येथे ब्रह्माकुंड नावाच्या ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवाने दर्शन दिले. दशमेश पिता श्री गुरुगोविंद सिंहजी यांनीही अयोध्येत तीर्थयात्रा केली. औरंगजेबाच्या काळात श्री गुरुगोविंद सिंहजी महाराजांनीही अयोध्येत रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी लढा दिला होता. त्यांनी आपला संबंध प्रभू श्रीराम यांच्या सूर्यवंशशी जोडलेला आहे. श्रीगुरुंच्या आत्मचरित्रानुसार, बेदी आणि सोधी वंश दोघेही रामचे पुत्र लव आणि कुश यांच्याशी संबंधित आहेत. म्हणूनच, अखिल भारतीयांच्या आध्यात्मिक जीवनासह अयोध्याचा इतिहास हा भारताच्या सांस्कृतिक राष्ट्र जीवनाची निर्विवाद अभिव्यक्ती आहे.
भारत राष्ट्राचे परम वैभव आणि पराभव ह्याचा अयोध्येच्या उत्थान आणि पतनशी संबंधित आहे. राम हा या राष्ट्राच्या जीवनाचा नायक आहे. ज्याप्रमाणे राम आणि अयोध्येचे विभाजन होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे राम आणि ह्या राष्ट्राचे विभाजन होऊ शकत नाही. राम ही भारताच्या राष्ट्र जीवनाची सोपी, स्पष्ट आणि अनोखी व्याख्या आहे. अयोध्या हे ह्या राष्ट्र जीवनाचे (राम) जन्मस्थान आहे. प्रभू श्रीराम यांचे भव्य मंदिर यापूर्वीही या जन्मस्थळी होते, ते आजही आहे आणि पुढेही असणार आहे.
लेखक - श्री नरेंद्र सहगल (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक )
अनुवाद - अनुप देशपांडे, संभाजीनगर
© विश्व संवाद केंद्र, देवगिरी
0 टिप्पण्या