शिर्षक वाचून आश्चर्य वाटेल. पण प्रसंग असाच प्रेरक व अविस्मरणीय आहे. जळगावातील हरी विठ्ठल नगरात विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभागाचे सचिव प्रशांत जी हरताळकर आले होते. राम मंदिर निर्माण कार्यासाठी निधी संकलन अभियानानिमित्त त्यांनी काही सहकाऱ्यांसह भेट दिली. प्रशांत जी येतील अशी माहिती मला अगोदरच मिळाली असल्याने मी इथल्या नागरिकांना पूर्व सूचना दिली होती.
लॉकडाऊन नंतर नुकतीच पूर्वपदावर आलेली परिस्थिती आणि गरीबीसोबत रोजचे जीवन जगताना आता पुन्हा देणगी द्यायची तर कशी द्यायची असा साहजिक प्रश्न अनेकांना पडला... तरीही राममंदिर साठी आपल्याला काहीतरी योगदान देऊन पुण्याचं काम करता येईल या हेतूने या भिल्ल वस्तीतील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी खारीचा वाटा उचला असं म्हणून मी त्यांना सांगितलं.
ठरल्यानुसार नंतर दुसऱ्या दिवशी प्रशांतजी हरताळकर जेव्हा या वस्तीत आले तेव्हा त्यांनी तेथील लोकांचे राहणीमान बघितले. अत्यंत गरिबी व हलाखीचे जीवन हे लोक जगत आहेत तरीही राम मंदिरासाठी आपल्याला काहीतरी करता येतंय या भावानेने ते तयार झाले आहेत हे पाहून त्यांना मोठं आत्मिक समाधान वाटलं आणि त्या वस्तीतील सर्व समाजाविषयी आपुलकी वाटली. आपल्या भाषणात त्यांनी या सर्व बंधू भगिनींना "मी आपल्याकडे देणगी घेण्यासाठी नाही तर आपल्या रामासाठी भिक्षा मागायला आलो आहे" असे सांगून आवाहन केलं. त्यांच्या या आवाहनाला जमलेल्या सगळ्यांनी ऐकले आणि प्रत्येकाने वर्गणी गोळा करत एकूण २६ जणांनी प्रत्येकी १०० रू. प्रमाणे निधी दिला. पहिला मान एका दिव्यांग आजींना दिला. "आपण रामाला दिलं तर राम आपल्याला भरभरून देतो... आपल्याकडे जे काही आहे ते रामानेच दिलेलं आहे" अशी भावना एकंदरीत या ठिकाणी जमलेल्या लोकांनी बोलून दाखवली.
ज्या लोकांचे घर सुद्धा पक्क्या बांधणीचे नाही, दिवसभर काम केलं की रात्री चूल पेटते अशी अवस्था. पण तरीही त्यांच्या मनातील रामभाव किती विशाल आहे याचा विचार करावा लागतो. आपण रोज बातम्या किंवा सोशल मीडियातून बघतोय की कोणी 1 लाख रुपये दिले, कोणी 1 कोटी दिले, कोणी हजार रुपये दिले... या सर्वातून एकच लक्षात येते... प्रभू रामचंद्राला ज्याच्याकडून जितकं घ्यायचं तितकं तो घेणारच आणि ज्याला जितकं द्यायचं तितकं देणारच... आपण रामासाठी काय करू शकतो... हे मात्र आपल्यालाच ठरवावं लागणार. रामाने वनवासात असताना राजा असलेल्या निषाद महाराजांसोबत भेट घेतली आणि कित्येक वर्षांपासून वाट पाहत असलेल्या शबरीमातेच्या झोपडीलाही आपला पदस्पर्श केला, हे प्रसंग तर आपल्याला माहीतच आहे.
- दीपक दाभाडे, जळगांव

0 टिप्पण्या