कर्तव्याचे पालन राम


@ मधुरा डांगे

प्रजाहितदक्ष राजाला जसे अनेक अधिकार मिळतात तशीच अनेक कर्तव्यांची जबाबदारी येते. 'यथा राजा तथा प्रजा' ही उक्ती आपल्याकडे प्रचलित आहे. याचा अर्थ राजाच्या वर्तणुकीवर प्रजेची मानसिकता घडत असते. रामराज्यात सर्वत्र अत्यंत शांततेचे, समृद्धीचे वातावरण होते असे रामायणकार सांगतात. या काळातील प्रजा अधिकार आणि कर्तव्यांच्या बाबतीत अत्यंत सजग होती कारण आधी दशरथ आणि नंतर राम अधिकार आणि कर्तव्यांचे पालन अत्यंत निष्ठेने करीत होते.



रामाचे जीवन म्हणजे अखंड कर्तव्य पालनाचे व्रत होते. संपूर्ण रामायण या कर्तव्य पालनाच्या धाग्याने गुंफले गेले आहे. रामायणातील प्रत्येक व्यक्तिरेखा आपल्या कर्तव्यांच्या प्रति सजग आहे. रामाच्या जीवनातील काही ठळक प्रसंगांचा उल्लेख इथे करणार आहे.

रामाने 'पितृवचन पालन करणे' हे आपले कर्तव्य मानले आणि राजपदाचा, राजसुखाचा त्याग करून वनवास पत्करला. रामाचे परिवारजन, प्रजा यांनी थांबविण्याचा खूप प्रयत्न करूनही राम थांबला नाही. भरताला सर्व वार्ता कळल्यावर तो वनात गेला आणि रामाला परत येण्याची विनंती केली परंतु राम मोहात न गुंतता त्याला समजावतात -

'नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ,
पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ ।'

गीत रामायणात रामाच्या मुखी असणारी ही वाक्ये रामाची कर्तव्य परायणता स्पष्ट करतात.

सीतेचे हरण झाल्याचे कळल्यावर राम व्यथित होतो, व्याकुळ होतो; पण गलितगात्र होत नाही. भावनांना मागे सारून सैन्याचे संघटन आणि संचालन करतो. एक खंबीर नेतृत्व म्हणून राम आपल्यासमोर सक्षमपणे उभा राहतो. तो असे करतो कारण सीतेला सोडवत असतांना एक बाजूला अधर्माला दंड करण्याचे कर्तव्य तो जाणतो.

रामाच्या कर्तव्य परायणतेची पराकाष्ठा सीता भेटीच्या प्रसंगात दिसते. रावण वधानंतर राम सीतेच्या भेटीच्या अत्यंत भावविभोर क्षणी राम तिला म्हणतात की सगळे घडण्याला तू निमित्त ठरलीस, उद्दिष्ट नाही. आज तुझ्या निमित्ताने असत्याचा, अधर्माचा नाश झाला. रघुकुलाची कीर्ती वाढली. असे बोलून पत्नीच्या भेटीची आतुरता बाजूला ठेऊन राम तिला अग्निपरीक्षा करायला सांगतो हे जसे तिला दिव्य तसे त्यालाही दिव्य होते. या प्रसंगात भावना आणि कर्तव्यात 'कर्तव्य' जिंकले होते. सीतेची अग्निपरीक्षा सफल झाल्यावर गीत रामायणात रामाच्या मुखी सुरेख वाक्य आहे. राम म्हणतो -

'ज्ञात काय नव्हते मजसि हिचे शुद्ध शील
लोक कोप उपजवितो का कधी लोकपाल'.
लोकमान्यता ही शक्ती लोकनायकाची'.

रामाच्या आत असलेला एक कर्तव्यदक्ष राजा या ओळींमधून स्पष्ट लक्षात येतो. उत्तर रामायणात राम सीतेचा त्याग करतो त्या प्रसंगाचे देखील स्पष्टीकरण वरील ओळींमधून अगदी सहज लक्षात येते.

लोकपाल असणारा राम आपले कर्तव्य चोख बजावत होता म्हणून त्याला मान्यता होती हे सत्य नाकारता येत नाही. कोणतीही कर्तव्य पारायण व्यक्ती वरकरणी अत्यंत कठोर वाटते, कधी कधी अन्यायी वाटते पण त्यामागे असणारी कर्तव्याची भावना शुद्ध असते. ही शुद्ध भावनाच त्याला एक आदर्श आणि उत्कृष्ट लोकपाल बनवते. अशा वर्तनाने प्रजेला राजाचा आदर्श तर मिळतोच पण प्रजेवर एक नैतिक अधिकार प्रस्थापित होतो जो सत्तेच्या अधिकारापेक्षा खूप मोठा ठरतो. रामाचे जीवन या दृष्टीने अभ्यासनीय आहे, अनुकरणीय आहे.

'राम' आपल्या सगळ्यांच्या जीवनात अंगिकारण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्या जीवनात कठोर कर्तव्य परायणतेचा स्वीकार होय. राम मंदिर उभारणे आणि आपल्या आराध्याचे उन्नत तत्त्व जगाला स्पष्टपणे समजावून सांगणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. एक विकसनशील समाज म्हणून आपल्या नैतिक कर्तव्यांचा पाया अधिकाधिक पक्का व्हावा यासाठी राम मंदिराचे महत्त्व मोठे आहे.

- मधुरा गजानन डांगे, नंदुरबार

©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या