@ मधुरा डांगे
'भाव तेथे देव' अशी एक उक्ती आपल्याकडे प्रचलित आहे. देव कुणा एकट्याचा नसतो. 'ज्याची भक्ती त्याचा देव' असे समीकरण आहे. त्याला धर्म, जात, वंश, लिंग याचा कुठलाही अडसर नाही. असे म्हणतात की श्रद्धा ही त्या व्यक्तीच्या गुणांच्या प्रति असणाऱ्या आदरातून निर्माण होते आणि हळूहळू त्या गुणांबद्दल एक आत्मीय प्रेमभाव निर्माण होतो तेव्हा भक्तीचा जन्म होतो. भारतीय पुराणांनी नवविधा भक्तीचे मोठे महत्त्व समाजात प्रस्थापित केले आहे.
रामाचे स्थान या दृष्टीने महत्वाचे आहे. रामाविषयी समाजात अपार श्रद्धा आहे, भक्ती आहे. यात भेदभाव नाही. अनेक जनजाती समूह रामलीला सादर करतात तसे अगदी शहरी जीवन जगणारे लोक देखील करतात. रामाचे जीवन रामलीलेच्या रूपाने पुन्हा पुन्हा जिवंत करावे ही उर्मी समाजातील प्रत्येक माणसाला असल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे रामाचा समाजाप्रती असणारा समरसता भाव.
समरसता म्हणजे समाजात कोणताही भेद न बाळगता अंगिकारलेला समता भाव. रामाच्या वनात जाण्याने केवळ उच्च वर्गातील लोक व्याकूळ होत नाहीत तर संपूर्ण समाज व्याकूळ होतो. याचे कारण म्हणजे रामाने नगरवासीयांच्या मध्ये भेदभाव केला नाही. एक आदर्श लोकपाल म्हणून त्याने जसे मंत्री वर्गाच्या मताचे महत्व राखले तसे अतीव प्रेमाने आणि आदराने नगरातील प्रत्येक नागरिकाच्या मताचे महत्व राखले. रामायणात रामाची एकात्म दृष्टी स्पष्ट करणारे अनेक प्रसंग आहेत. मुळात रामाचे अलौकिकत्व समाजाने मान्य केल्याने त्याच्या मनुष्य रुपात देखील त्याची भक्ती करणारे अनेक लोक होते. रामायणातील प्रसंगांचा विचार करता निषादराज पासून सुरुवात करणे संयुक्तिक ठरेल.
राम वनवासात गेल्यावर पहिलीच रात्र त्याने शृंगावेरपूरच्या सीमेवर व्यतीत केली. या सीमावर्ती भागात निषाद जनजातीचे राज्य होते. निषादराज रामाचा भक्त होता. त्याने रामाचे अत्यंत प्रेमाने आदरातिथ्य तर केलेच शिवाय वनवासात पुढचे काही दिवस साथ देखील केली. निषाद राजाने आपले सर्वस्व रामाच्या चरणी अर्पण केले. स्वतःचे राजेपण बाजूला ठेऊन रामाची सेवा केली. रामाने देखील निषाद राजावर अगदी सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम केले, निषादाचे शुद्ध प्रेम बघून आपल्या सोबत काही काळ वनात येण्याची अनुमती देखील दिली. निषादाचे 'निषाद' असणे रामसेवेच्या आणि रामाच्या प्रेमाच्या आड कधीच आले नाही. मूळ वाल्मिकी रामायणात आणि तुलसी रामायणात देखील निषाद राजा आणि रामाच्या संबंधांचे फार भावस्पर्शी वर्णन आहे.
पुढे चित्रकूट पर्वतावर झालेली शबरी आणि रामाची भेट सर्वज्ञात आहे. भिल्ल समाजाची शबरी रामाला उष्टी बोरे खायला देते आणि राम ती आनंदाने खातो. गोष्ट इथेच थांबत नाही. राम शबरीला मोक्षमार्गाचा उपदेश करतो. या उपदेशात तिचे स्त्रीत्व किंवा तिची जात याचा कोणताही अडसर येत नाही. ज्याची भक्ती आहे, तपस्या आहे त्याला मोक्षाचा मार्ग खुला आहे ही एकात्म दृष्टी रामाच्या ठायी स्पष्ट दिसते. एका अत्यंत सुप्रतिष्ठित राजवंशाचा राजकुमार असलेला राम वनवासींच्या झोपडीत आनंदाने येतो, त्यांची भेट घेतो हे रामाच्या प्रजेवरील आत्मीय प्रेमाचे आणि समत्वाचे उच्च उदाहरण आहे.
वरील दोन प्रसंग रामायणात ठळकपणे येतात; परंतु असे अनेक लहान - मोठे प्रसंग रामाची दृष्टी आपल्यासमोर स्पष्ट करतात. गंगा पार करतांना नावड्याने केलेली राम चरणांची पूजा हेदेखील याच साखळीतले एक छोटेसे उदाहरण आहे. पुढे तर वानर नामक वन्य जातीला रामाने केवळ मदत केली नाही, तर त्यांच्याच साथीने आपला कार्यभाग साधला.
राम कुणा एकट्याचा नाहीच. प्रत्येकाला दिसलेले रामाचे रूप वेगळे, प्रत्येकाचा त्याच्या प्रति असलेला भाव वेगळा; परंतु रामाचे अस्तित्व प्रत्येकाच्या मनात समान आहे. त्यामुळे राम मंदिरासाठी झालेला लढा असो किंवा आता राम मंदिर उभारणीचे काम असो; समाज एकजुटीने काम करतो आहे. लढा देणारे किंवा मदत करणारे कुण्या एका जातीचे अथवा समाजाचे नाहीत तर रामाचे आहेत. ते रामभक्त आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या अंतरात असणाऱ्या आत्मारामाच्या जागरणाचा हा काळ आहे. संपूर्ण समाजाच्या सहयोगाने उभे राहत असलेले राम मंदिर हे भारतीयांच्या श्रद्धेचे, भक्तीचे आणि भाव जागरणाचे केंद्रस्थान आहे यात शंका नाही..!!
- मधुरा गजानन डांग, नंदुरबार

0 टिप्पण्या