अ.भा.हिंदू गोरबंजारा, लबाना - नायकडा समाजकुंभात अध्यात्म, संस्कृती, परंपरेचे दर्शन होणार



गोद्री येथील महाकुंभाच्या भूमिपूजनानंतर संत बाबूसिंग महाराज यांची पत्रकार परिषदेत माहिती

१६ डिसेंबर : भारत हा संतांचा देश आहे. या संताच्या भूमीत अध्यात्म आणि संस्कृतीला वेगळे महत्व आहे. गोंद्री येथे होणारा अखिल भारतीय हिदू गोरबंजारा, लबाना -नायकवाडा समाजकुंभात देशभरातील संत सहभागी होणार आहेत. त्या माध्यमातून या समाजकुंभात अध्यात्म, संस्कृती, परंपरा, वेषभूषा आदीचे दर्शन आपल्याला या माध्यमातून होणार असल्याची माहिती पोहरा गडचे गादीपती संत बाबूसिंग महाराज यांनी दिली. १६ डिसेंबर रोजी जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे महाकुंभाच्या भूमिपूजनानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे २५ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा, लबाना -नायकवाडा समाजकुंभ होत आहे. त्या कुंभाचा भुमीपूजन सोहळा प्रमुख संताच्या उपस्थित पार पडला.


ते पुढे म्हणाले की, बंजारा समाजात महान संत सेवादास महाराज होऊन गेले. हा समाज अनादी काळापासून मागासलेला समाज आहे. या समाजाला पूूजा-पाठ करण्याबाबत मागदर्शन महाकुंभात संत करणार आहेत. तसेच समाजात होणारे धर्म परिवर्तनाच्या अनुषंगाने या कुंभातील देशभरातील संत बंजारा समाजाचे प्रबोधन करणार आहेत. या कुंभमेळ्यात देशभरातून सर्व संत सहभागी होणार आहेत. काही लोक समाजकुंभाला विरोध करीत आहेत. धर्मकार्यात विरोध होत राहतो. कुंभमेळा करणारेही आपलेच अन् विरोध करणारेही आपलेच असल्याचे त्यांनी सांगितले. होमहवन, हनुमानाची आज पूजा होऊन याठिकाणी समाज कुंभाचे भूमिपूजनही करण्यात आले. बंजारा समाजाला महान संत सेवादास महाराज यांचा वारसा आहे. पोहरादेवी बंजारा समाजाची काशी आहे. त्यामुळे या समाजकुंभामुळे पोहरादेवीचे महत्व कदापिही कमी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळा पोहरादेवी येथे व्हायला हवा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. बंजारा समाजाला न्याय मिळावा, यासाठी पोहरा येथे येणार्‍या काळात महाकुंभ पर्व पार पडावे. या कुंभास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सर्व संत, बंजारा समाजातील संत, सकल बंजारा समाजाने या महाकुंभास मोठ्या संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या समाज कुंभाच्या आयोजनासाठी अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे समन्वयक शरदराव ढोले, सामाजिक कार्यकर्ते रामेश्‍वर नाईक, कुंभमेळा संचालन समिती अध्यक्ष श्यामचैतन्य महाराज महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे त्यांनी सांगितले.


या कुंभाच्या भूमिपूजन सोहळ्याला पोहरा गड गादीपती संत बाबूसिंग महाराज, पाल आश्रमाचे गादीपती गोपाल चैतन्य महाराज, जनार्दन हरीजी महाराज, कुंभमेळा संचालन समिती अध्यक्ष श्यामचैतन्य महाराज, रामसिंग महाराज, सुरेश महाराज, चंद्रसिंग महाराज, सामाजिक कार्यकर्ते रामेश्‍वर नाईक यांचीही उपस्थिती होती
.
समाजातील धर्मांतरण रोखले गेले पाहिजे : श्यामचैतन्य महाराज

देशभरात विखुरला गेलेला बंजारा समाज कुंभाच्या माध्यमातून एका छताखाली येणार आहे. आज युवक भरकटत आहे. संस्कृती जपण्यासाठी आणि आपल्या परंपरा यांची पुन्हा उजळणी या कुंभात होणार आहे. या माध्यमातून समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास कसा साधता येईल, यासाठी संत समाजाला मार्गदर्शन करणार आहेत. सध्या या समाजात धर्मांतर होत आहे, त्याला रोखणे गरजेचे असल्याचे कुंभमेळा संचालन समिती अध्यक्ष श्यामचैतन्य महाराज यांनी सांगितले. आम्ही धर्मांचे रक्षण केले तर धर्म आमचे रक्षण करणार असल्याचे त्यांनी म्हटले. काही लोकांना व संघटनांना वाटते की यात राजकारण आहे. मात्र यात कुठलेही राजकारण नाही. सर्व पक्ष, संघटनांचा हा कार्यक्रम आहे. सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमातून समाजाचा विकास व्हावा, हीच सर्व संताची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम माझा आहे, हिंदूत्वाचा आहे. या भावनेने एकत्र येण्याचे आवाहन श्यामचैतन्य महाराज यांनी केले.
या संताची राहणार उपस्थिती

गुरू शरणानंदजी महाराज वृंदावन, रामजन्मभूमी न्यास कोषाध्यक्ष गोविंदगिरीजी महाराज, दीदी साध्वी ऋंतंभरा देवी, महामंडलेश्‍वर स्वामी प्रणवानंद इंदूर, पू.अखिलेश्‍वराजी जबलपूर, महामंडालेश्‍वर विश्‍वेश्‍वरानंदजी मुंबई, महंत रघुमणिजी (बडा उदासिन आखाडा), बाबा हरनामसिंगजी पंजाब दमदमी टकसाळ, संत मुरारी बापू, माता अमृतानंद मयी, भास्करगिरीजी महाराज देवगड, महामंडालेश्‍वर जनार्दन स्वामी आदी या समाज कुंभासाठी उपस्थित राहणार आहेत.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार

विविध राज्यभरातून मुख्यमंत्री, मंत्री या कुंभमेळ्यात येणार असून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या समाजकुंभात येणार असल्याचे श्यामचैतन्य महाराज यांनी सांगितले. त्यांचे कुंभमेळ्यात येण्याचे निश्‍चित झाल्याचे त्यांनी सांगितले. इतर राज्याचे मुख्यमंत्री कुंभमेळ्यात येण्याबाबतचे अद्याप स्पष्टता नसल्याचे त्यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या