खिलाफत चळवळ: प्रासंगीकता आणि चर्चा - डॉ. श्रीरंग गोडबोले

लेख क्रमांक-1

                                     

खिलाफत चळवळ भारतीय मुस्लिमांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचाच परिणाम होता. हा तणाव प्रथम विश्व युद्धाच्या अखेरीस तुर्कस्तान ऑटोमन साम्राज्याचे विखंडन आणि खलिफापदाच्या अस्ताच्या चाहुलीतून निर्माण झाला होता. खलिफाची (अर्थ : उत्तराधिकारीजगभरातील मुस्लिमांचे धार्मिक आणि लौकिक प्रमुख) पुनर्स्थापना ही खिलाफत चळवळीची प्रमुख मागणी होती.  यंदा खिलाफत चळवळीस १०० वर्षे पूर्ण होत आहेत व १०० वर्षानंतरही ही चळवळ अनेक संघर्षांना प्रेरणा देत आहे. खिलाफत चळवळ कोणती सर्वसाधारण ऐतिहासिक चळवळ नव्हती. तिला धार्मिक-ग्रांथिक स्वीकृती आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. या चळवळीने आपल्या स्वातंत्र्य संग्रामावर परिणाम केला आणि अखेरीस फाळणी प्रक्रिया ही तीव्र केली.  खिलाफत चळवळीचा प्रतिध्वनी आजही उमटतो आहे.


खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ

अनेक भारतीयांना खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळीचा संबंध माहिती नाही. असहकार चळवळ ही महात्मा गांधी यांनी ४ सप्टेंबर १९२० रोजी सुरु केली. स्वराज्य आणि संपूर्ण स्वातंत्र्य हा या चळवळीचा उद्देश होता, हेच मागील अनेक पिढ्यांना शिकविले गेले आहे. २१ मार्च १९१९ रोजी झालेला रौलट कायदा आणि १३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश सुधारणा प्रक्रियेतून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस बाहेर पडली, ही विकिपीडियाने दिलेली माहिती असून आधुनिक शिक्षितांसाठी तेच ज्ञानाचे भांडार आहे.

स्वतःस इतिहासकार म्हणवणारे, राजकीय पक्षांशी जोडले गेलेले विचारवंत भारतीयांना सांगतात की, असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ यांच्या मागण्या एकत्रितरीत्या मांडल्या गेल्या तर हिंदू आणि मुस्लीम हे भारतातील दोन प्रमुख समुदाय एकत्र येऊन वसाहतवादी शासनाचा अंत करतील, अशी गांधीजीना आशा होती. वसाहतवादी भारतात अभूतपूर्व असा एक लोकप्रिय उठाव या चळवळीनी तयार केला. (थीम्स इन इंडियन हिस्ट्रीभाग III, इयत्ता १२वी इतिहासाचेक्रमिक पुस्तक,  एनसीईआरटीच्या माध्यमातून प्रकाशितपृ.350)

स्वराज्यप्राप्ती हे लक्ष्य असणारी ‘असहकार चळवळ’ हा कॉंग्रेसचा मौलिक विचार होता, स्वराज्यप्राप्तीसाठी ही चळवळ सुरु करण्यात आली होती, ही तथ्ये एखाद्याने कॉंग्रेसचा अधिकृत इतिहास वाचला तर समोर येतात.(द हिस्ट्री ऑफ़ इंडियन नेशनल कांग्रेसपट्टाभि सीतारामय्या,  सीडब्ल्यूसीमद्रास१९३५पृ. ३३४३३५) सत्य ही जर इतिहासाची जननी असेल तर त्या इतिहासाशी छेडछाड केली जात नाही ना, हे इतिहासकाराने तपासून पाहिले पाहिजे.

खिलाफत चळवळीचे बारकाईने व निष्पक्ष विश्लेषण होणे आवश्यक आहे. जेव्हा समाजात असत्यावर आधारित चर्चा केली जाते तेव्हा सत्य त्याआड लपून जाते. साधारणतः ही चर्चा पक्षीय राजकारणाने प्रेरित असते. खिलाफत चळवळ ही याला अपवाद नाही. 


राजकीय चर्चा

खिलाफत चळवळीबाबत २५ ऑक्टोबर २०१८ रोजी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावर एक लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्यात म्हटले होते, भारताला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी करण्यात आलेल्या अनेक प्रयत्नांमधील खिलाफत चळवळ हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न होता. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली हिंदू आणि मुस्लीम यांनी एकत्रितरीत्या हे आंदोलन केले होते. साम्राज्यवादाच्या विरोधातील आक्रोश अधिक प्रखर करण्यासाठी खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ एकत्र आणण्याचा महात्मा गांधी यांनी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे यश अधिक दृढ झाले. शोषण आणि वर्चस्व गाजविणाऱ्या सत्तेच्या विरोधात हिंदू आणि मुस्लिमांना व त्यांच्याशी संबंधित उद्देशांना एकत्र आणणारी खिलाफत चळवळ ही एक मोठी संधी असल्याचे महात्मा गांधी यांना जाणवले. महात्मा गांधीनी स्वशासनाचा प्रस्ताव हा ‘स्वराज्या’च्या रुपात व्यवस्थित जाणला होता. खिलाफतशी जोडलेल्या समस्या आणि मागण्या स्वराज्याशी जोडल्या व या दोन्ही उद्दिष्टांसाठी असहकार चळवळ आरंभिली. भारताच्या स्वतंत्र चळवळीत हिंदू आणि मुस्लीम एकतेबाबत सर्वात महत्त्वपूर्ण विचार खिलाफत चळवळीच्या निमित्ताने मांडला गेला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते आणि खिलाफत चळवळीचे नेते एकत्र आल्यामुळे हे घडले होते. हिंदू आणि मुस्लीम जर एकत्र आले व आपल्या स्वातंत्र्यासाठी सामूहिक संघर्ष केला तरच ब्रिटीश साम्राज्यापासून मुक्ती मिळू शकते या महात्मा गांधी यांच्या विचारसरणीला हिंदू-मुस्लीम सहमतीचे हे दृश्य अनुरूप होते. ”(https://www.inc.in/en/in-focus/the-khilafat-movement-a-landmark-movement-in-indias-journey-to-freedom)

 

संदर्भिक चर्चा

पूर्वग्रहदुषित इतिहासकारांनी काही भ्रम पसरविले आहेत. खिलाफत चळवळ ही वाढत्या हिंदू राष्ट्रवादावरील प्रतिक्रिया आहे असे स्कॉटिश इतिहासकार सर हमिल्टन गिब(१८९५-१९७१) यांनी म्हटले आहे. जगभरात मुस्लीम समाज पसरलेला असताना केवळ भारतातच इस्लामच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर भर देण्यात आला. हिंदू राष्ट्रवादाच्या समोर एक बचावात्मक पवित्रा घेण्याचा त्यांचा उद्देश होता, असे या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे. (विदर इस्लामअ सर्व्हे ऑफ मॉडर्न मुव्हमेंट इन द मॉस्लेम वर्ल्ड1932रूटलेजपृ.73) काही वेळा इतिहासकारांमधील ही चर्चा मूर्खपणाच्या पदाला पोचते. कानडी मुस्लीम इतिहासकार विल्फ्रेड केंटवेल स्मिथ(१९१६-२०००) यांनी आपल्या ‘मॉडर्न इस्लाम इन इंडिया : अ सोशल अनालिसिस’(मिनर्वा बुक शॉप, लाहोर) या पुस्तकात लिहिले आहे – “खिलाफत’ या शब्दाचा अनेक ग्रामीण क्षेत्रांमध्ये वेगळाच अर्थ आहे. ‘खिलाफ’ हा शब्द उर्दू आहे, ज्याचा अर्थ आहे ‘विरोध’ किंवा ‘विरुध्द’ असा विचार लोकांनी केला. त्याच संदर्भाने त्याचा अर्थ ‘सरकारच्या विरोधात’ असा घेतला. नेहमीप्रमाणे ते इस्लामबाबत जागृत होते मात्र मोहम्मद आणि ऑटोमन तुर्की साम्राज्याबद्दल त्यांना क्वचितच माहिती असावी(पृ.२३४)”. महात्मा : लाईफ ऑफ मोहनदास करमचंद गांधी(खंड २, पृ.४७) या आपल्या पुस्तकात डी.जी. तेंडूलकर यांनी या मूर्खपणाची पुनरावृत्ती केली. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने प्रकाशित केलेल्या आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते प्रकाशन झालेल्या सेंटेनरी हिस्ट्री ऑफ इंडियन नशनल कॉंग्रेस १८८५-१९८५(सैंदर्भिक  फौंडेशन, दिल्ली, १९८५, खंड २, पृ.६६) या पुस्तकातही हाच मुद्दा पुन्हा लिहिला आहे. हा खंड आणि या ग्रंथमालेचे संपादक क्रमशः रवींद्र कुमार आणि बीएन पांडे होते यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. हे दोघेही नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांताचे आग्रही होते. खिलाफत चळवळीस ‘अखिल इस्लाम’च्या ऐवजी ‘अखिल भारतीय इस्लाम’च्या रूपात चित्रित करणात आले(खिलाफत चळवळ : रीलीजीयास सिंबॉलीझम अॅड पॉलिटीकल मोबिलायझेशन, गेट मीनॉल्ट, कोलंबिया युनिवर्सिटी प्रेस, १९८२) हे देखील सैंदर्भिक  कुतर्काचे एक उदाहरण आहे. ‘बिहारमधील १०२०-२२ या काळातील खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ यातील धर्मनिरपेक्ष मुद्द्यांचा शोध’ यावर प्रख्यात इतिहासकार भोजनंदन प्रसाद यांनी भर दिला आहे.( प्रोसीडिंग्स ऑफ इंडियन हिस्ट्री कांग्रेस, खंड ६३, २००२, पृ.६१५-६२१) ते म्हणतात, या दोन्ही धार्मिक बाजूवर जोर देण्यासाठी आणि त्यांचे धर्मनिरपेक्ष चरित्र कमी लेखण्यासाठी जाणीवपूर्वक भ्रम पसरविला गेला. चळवळीचा नामोल्लेखही सोयीस्कररीत्या काढून टाकण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी रफिक जकारिया यांच्या लेखाचा उल्लेख केला. आपल्या  द ट्रूथ अबाउट द खिलाफत मुव्हमेंट’ (द हिंदुस्तान टाइम्सवी दिल्ली२४ ऑगस्ट १९९७) मध्ये या भ्रम पसरविण्याच्या प्रयत्नांना रफिक यांनी कसा विरोध केला आहे हे ते आवर्जून सांगतात. या प्रसिद्ध इतिहासकाराने म्हटले आहे कि, खिलाफत चळवळ हे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाच्या गांधीवादी रणनीतीचे फलित होते. यात अनेक मुद्दे आहेत. “जिथे अनेक संप्रदायांचे लोक बंधुभावाने एकत्र राहतील अशा एका स्वतंत्र आणि लोकशाही असणाऱ्या भारताचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून झालेली धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय आंदोलन म्हणून गांधी यांची असहकार चळवळ आणि खिलाफत चळवळ ओळखली गेली.” किंवा  “अहिंसा, असहकार आणि खिलाफत चळवळ एक अनिवार्य अट होती” असे या महाशयांनी म्हटले आहे.

 

इतिहासाकडे पाठ

ज्याला कोणतीही धार्मिक वा ऐतिहासिक पार्श्वभूमी नाही अशा एका आकस्मिक घडलेल्या घटनेच्या रूपात खिलाफत चळवळ लोकांसमोर मांडली गेली. या चळवळीचे हिंदुविरोधी स्वरूप दूर करण्याचे प्रयत्न आता करण्यात येत आहेत. गार्गी चक्रवर्ती मेनस्ट्रीम’ (खंड ५३ क्रमांक नई दिल्ली२५ जानेवारी २०२०) मध्ये लिहितात की, अखिल इस्लामवादी विचारधारेने जगभरातील मुस्लिमांना पाश्चात्य साम्राज्यवादाच्याविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. मात्र १९११ साली पहिले महायुद्ध सुरु होऊन इटली आणि तुर्कस्तान यांच्यात युद्धाची ठिणगी पडेपर्यंत भारतात ही एकजूट करणे जमले नाही. ब्रिटनने इटलीशी गुप्त संधान साधले आणि भारतीय मुस्लिमांच्या मनात ब्रिटिशांबाबत परकेपणा निर्माण झाला. ब्रिटीश साम्राज्यवाद त्याची इस्लामी संस्कृती नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे असे त्यांना वाटले. ‘इस्लाम धोक्यात आहे’ असे भय वाटल्याने त्यांच्या मनात ख्रिस्ती संप्रदाय आणि ब्रिटीश वसाहतवादी यांच्याबाबत कट्टर द्वेष भरला होता. परंतु ही भावना हिंदूंबाबत नव्हती. ‘ग्लोबलाजेशन अँड रिलिजियस डावर्सिटी : इश्यूज़,पर्सपेक्टिव्स अँड द रेलेवेन्स ऑफ गांधीयन फिलॉसफी’ असे शीर्षक असणारा चक्रवर्ती यांचा शोधनिबंध होता. हा निबंध ८-१४ जानेवारी २०२० दरम्यान, डॉ. आंबेडकर विद्यापीठ, दिल्ली आणि आर्हूस विद्यापीठ आयोजित आंतरराष्ट्रीय विंटर स्कूलमध्ये प्रस्तुत करण्यात आला. अखिल इस्लामवादास पाश्चात्य साम्राज्यवादाची प्रतिक्रिया म्हणून चित्रित केले जात आहे हे लक्षात घ्या. 

जर स्वयंघोषित धर्मनिरपेक्षतावादी मंडळींची ही अवस्था असेल तर कट्टर इस्लामवाद्यांचे काय झाले असेल याची कल्पना करा. त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकारचे परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी इम्रान शेख हुसेन यांनी १९८५ साली इस्लामच्या मिशनसाठी आपले जीवन समर्पित करता यावे याकरिता नोकरी सोडली. ते खिलाफत चळवळीबाबत म्हणतात की, ब्रिटीश वसाहतवादी शासनाने इस्लामला पर्याय म्हणून युरोपीय राजकीय धर्मनिरपेक्षता लागू केली. हिंदू आणि मुस्लिमांनी ‘धर्मनिरपेक्षते’च्या या नव्या युरोपीय धर्मास आव्हान दिले व आपली स्वदेशी राजकीय संस्कृती लागू करण्याची व संरक्षित करण्याची मागणी केली. वसाहतवादी पाश्चात्य देश श्वेतवर्णीय नसणाऱ्या जगावर लादत असलेली आपली धर्मनिरपेक्ष आणि घटनात्मक लोकशाही व्यवस्था संपवून टाकण्याचे आव्हान खिलाफत चळवळीने दिले होते. म्हणूनच तुर्की खिलाफत नष्ट करण्यासाठी मुस्तफा कमाल याच्या धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाबरोबर हातमिळवणी करून ब्रिटिशांनी आपली रणनीती आखली. ज्या रणनीतीमुळे खिलाफत चळवळ आणि हिंदू मुस्लीम एकतेस निष्प्रभ आणि नष्ट करता येईल. (द रिटर्न ऑफ खिलात) लक्षात घ्या, इथे कशा तऱ्हेने खिलाफत चळवळीस स्वदेशी संस्कृतीचे रक्षण आणि वांशिक वर्चस्वाविरुद्धचा संघर्ष याच्या रूपात प्रस्तुत करण्यात आले आहे.

 

भूतकाळापासून भविष्यापर्यंत

इतिहासकारांच्या वेशात एका विशिष्ट विचारांशी जोडलेली विचारवंतांची एक प्रजात आहे. या प्रजातीला खिलाफत चळवळीचा वापर करून भारताच्या वर्तमानकालीन राजकीय व्यवस्थेत बदल घडवण्याची इच्छा आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून खिलाफत चळवळ आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला होणारा विरोध यात साम्य असल्याचे प्रिंटसन विद्यापीठातील इतिहास शिक्षक ज्ञानप्रकाश यांनी म्हटले आहे. 

ते लिहितात, आम्ही मुस्लीम आहोत आणि भारतीयही आहोत, मुस्लीम विरुद्ध भारतीय नाही, असे भारतात रा. स्व. संघ प्रेरित हल्ल्यांचा सामना करणारे मुस्लीम सांगत आहे. खिलाफत चळवळीतील मुस्लीम तक्रारींचा उपयोग करून ब्रिटीशविरोधी राष्ट्रवादी आंदोलन छेडण्याच्या महात्मा गांधी यांच्या प्रयत्नांचे स्मरण होते. ती ही मुस्लीम आणि भारतीय यांची एक जोडणी होती. (व्हाय द प्रोटेस्ट रिमाइंड अस ऑफ गांधीज खिलाफत मुव्हमेंटइकॉनोमिक टाइम्स१२ जानेवारी२०२०)

खिलाफत चळवळीसंबंधी नवी चर्चा पुढील मुद्द्याच्या आधारे केली जाऊ शकते : वसाहतवादी धोरणांच्या विरोधात एका पीडित समूहाने खिलाफत चळवळ सुरु केली होती. गैर मुस्लीम बंधूंना सोबत घेऊन, महात्मा गांधी यांच्या व्यापक नेतृत्वात ही चळवळीचे संचालन करण्यात आले. वसाहतवादी धोरणांच्या ऐवजी हिंदू बहुसंख्याकवाद आणि गैरमुस्लिमांच्या जागी हिंदू ब्राह्मणवादी व्यवस्थेची शिकार असणारे दलित असा विचार केला तर वर्तमानकालीन संदर्भात एक विषारी चर्चा आपल्या डोळ्यासमोर येते.

खिलाफत चळवळीशी संबंधित ही नवी चर्चा तात्काळ थांबवली पाहिजे. १०० वर्षांपूर्वी ही चळवळ सुरु करणाऱ्यांची मानसिकता  अजूनही अस्तित्वात असल्याने खिलाफत चळवळीची प्रासंगिकता आजही आहे हे नाकारता येणार नाही. या मानसिकतेला वर्तमान संस्कृतीस पुन्हा सातव्या शतकाच्या वातावरण घेऊन जाणाऱ्या धर्माचे मार्गदर्शन आहे. जे इतिहास विसरतात त्यांना इतिहास पुन्हा आठवावा लागतो हे सत्य आहे. त्याचप्रमाणे जे खोटा इतिहास सांगतात त्यांना इतिहास पुन्हा आठवण्याची संधी मिळत नाही हे देखील सत्य आहे. पुन्हा एकदा नीर क्षीर विवेक वापरण्याची वेळ आली आहे.

क्रमश: 

(श्रीरंग गोडबोले हे इस्लाम, ख्रिस्ती धर्म, समकालीन बौद्ध-मुस्लीम संबंध, शुद्धी आंदोलन आणि धार्मिक लोकसंख्या या विषयांवरील पुस्तकांचे लेखक आहेत.)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या