कोरोना आपदा सेवाकार्य स्मरणिका – ई बुक चे अनावरण
संभाजीनगर। कोरोना संकटकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देशभरात व्यापक स्वरूपात सेवाकार्य राबविले असून देवगिरी प्रांतात १० लाख समाज बांधवांपर्यंत सेवाकार्य पोहोचल्याची माहिती देवगिरी विश्व संवाद केंद्रातर्फे देण्यात आली. 'कोरोना आपदा सेवाकार्य - स्मरणिका' या ई-बुक च्या ऑनलाईन अनावरण कार्यक्रमादरम्यान ही माहिती देण्यात आली. मार्च महिन्यात लॉकडाऊन लागल्यानंतर आपत्ती विमोचन समितीमार्फत देवगिरी प्रांतातील मराठवाडा व खान्देशातील १५ जिल्ह्यात हे सेवाकार्य सुरू होते. जवळपास २ कोटी रुपये इतका खर्च या सेवकार्यासाठी आला असून १० हजाराहून अधिक स्वयंसेवकांनी या सेवाकार्यात सहभाग घेतला असेही यावेळी सांगण्यात आले. रा. स्व. संघाचे प्रांत सह प्रचार प्रमुख संतोष तिवारी यांनी ही माहिती दिली.
देशात अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे अनेक परिवार, माणसे, स्त्रिया, शिक्षणासाठी बाहेर पडलेले तरुण आपल्या घरादारापासून दूर अडकलेले होते. त्यांना भोजन व जीवनावश्यक वस्तू स्वयंसेवकांनी पुरविल्या. रुग्णालयात भरती झालेले व रस्त्याने पायपीट करणाऱ्या कुटुंबाना भोजन व फूड पाकीट स्वयंसेवक पुरवीत होते. या दरम्यान देवगिरी प्रांतात ५ लाख ५८ हजार फूड पॅकेट्स आणि ४३ हजार जीवनावश्यक वस्तू व किराणा सामानाच्या किट वितरित करण्यात आल्या. जून अखेरपर्यंत एकूण ८ लाख ४५ हजार जणांना सेवा पोहचविण्यात आली होती. ज्यामध्ये ५ लाख ५८ हजार जणांना घरोघरी किंवा रुग्णालयात जाऊन फूड पॅकेट देण्यात आले. २४ हजारहुन अधिक ठिकाणी कोरोना संक्रमणपासून काळजी कशी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यात आली. ४३ हजारहून अधिक ठिकाणी किराणा सामान किट वाटप केली, तर जवळपास ४ हजारहून अधिक स्वयंसेवकांनी रक्तदान केले आहे. तसेच ठिकठिकाणी स्वास्थ्य सहायता केंद्र स्थापन करून वृद्ध सहायता व सोशल डिस्टन्सिंगसाठी रेखांकनही करण्यात आले. बंदोबस्तावर असलेल पोलीस व स्वच्छता कर्मचारी यांना प्रांतात २६ हजारपेक्षा अधिक कप चहावाटप करण्यात आला, तर जवळपास ९० हजार जणांना मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले आहे. सप्टेबर महिन्याच्या अखेरपर्यंत या सेवाकार्यासाठी तब्बल २ कोटी रुपये एवढा खर्च आला, तर १० हजाराहून अधिक स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष सेवाकार्यात सहभाग घेतला अशी माहिती देण्यात आली.
यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे देशाचे व समाजाचे मोठे नुकसान झाले. तरीही भारतीय समाज या महामारीच्या विरोधात मोठ्या धैर्याने उभा ठाकला व अजूनही त्याचा सामना करत आहे. देशभरात अनेक जणांना आपले जीव गमवावा लागले. या काळात प्रशासनाने कर्तव्यदक्ष राहून आपली कामगिरी बजावली. स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवक, डॉक्टर, नर्सेस, प्रशासकीय कर्मचारी अश्या सर्व कोरोना योद्ध्यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. भारताला लागलेला भ्रष्ट्राचार व नकारात्मकतेचा डाग पुसून भारतीय संकटापासून पाठ फिरवीत नाही, तर संकटाचा यशस्वी सामना करतात हे दिसून आले आहे, असे पश्चिम क्षेत्राचे सेवाप्रमुख उपेंद्रभाऊ कुळकर्णी यांनी सांगितले. स्वयंसेवकांनी केलेले हे सेवाकार्य समाज पाठीशी उभा राहिला म्हणून शक्य झाले असेही ते म्हणाले.
स्वयंसेवकांचे कार्य प्रेरणादायी - पुखराजजी पगारिया
संघाच्या स्वयंसेवकांनी लॉकडाऊन काळात केलेले सेवाकार्य अत्यंत प्रेरणादायी असून लक्षावधी लोकांच्या दुःखाला फुंकर घालण्याचे कार्य स्वयंसेवकांनी केले त्यांना सलाम करावासा वाटतो अश्या भावना पगारिया फाऊंडेशन चे अध्यक्ष पुखराजजी पगारीया यांनी व्यक्त केल्या. ई बुक अनावरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पुखराजजी उपस्थित होते. पुखराज जी म्हणाले, मी संघाचा स्वयंसेवक नाही. कधी शाखेत गेलो नाही. मात्र जळगावी असताना स्व. अविनाश आचार्य यांनी आमच्यावर संघ संस्कार केले त्याचा आज अभिमान वाटतो. स्वयंसेवक आजवर राष्ट्रीय आपत्ती व समाजसेवा म्हणून व्यापक स्तरावर सेवाकार्य करत आले आहेत पण त्याची कधीही प्रसिद्धी संघाने केली नाही. प्रसिद्धी वगळता समजाला माहिती व्हावी म्हणून तरी संघाच्या सेवाकार्याची माहिती मिळावी असे वारंवार वाटे. देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या माध्यमातून ही इच्छा अप्रत्यक्षपणे पूर्ण झाली याचा आनंद वाटतो.
स्मरणिका ई-बुक चे अनावरण
आपत्ती विमोचन समितीतर्फे राबविलेल्या या कोरोना आपदा सेवाकार्याची माहिती देवगिरी विश्व संवाद केंद्राने ई-बुक स्मरणिका स्वरूपात तयार केले असून पगारिया फाऊंडेशनचे अध्यक्ष पुखराजजी पगारिया व रा.स्व.संघ पश्चिम क्षेत्र सेवा प्रमुख उपेंद्र कुळकर्णी यांच्या उपस्थितीत या सेवाकार्याचे अनावरण करण्यात आले.
सेवाकार्य माहिती, निवडक प्रेरक प्रसंग, स्वयंसेवकांना आलेले अनुभव, समाजाच्या प्रतिक्रिया व भावना याचा समावेश या ई-बुक मध्ये करण्यात आला आहे. ही स्मरणिका - ई बुक समाजाला प्रेरणा व सकारात्मकता प्रदान करेल असा विश्वास देवगिरी विश्व संवाद केंद्राचे संयोजक ओंकार रत्नाकर शेलदरकर यांनी व्यक्त केला.
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
1 टिप्पण्या