@प्रवीण नायसे
आपली महान मातृभूमी "भारत" ही हजारो वर्षांची वैभवशाली व गौरवशाली परंपरा लाभलेली भूमी आहे. भू-राजनैतिकदृष्ट्या आम्ही वेगवेगळे होतो. आपल्या भारतात लहान-मोठे राज्य अस्तित्वात होते , अगदी पुराणातही त्यांचा उल्लेख आढळतो.असे असले तरी आपण सर्व भारतवासी भारतीय संस्कृतीच्या समान धाग्यात पूर्वीपासूनच बांधलेलो आहोत आणि म्हणून भू-सांस्कृतिकदृष्ट्या आपण एकच होतो आणि आहोत. सर्वात प्रथम भारताला भू-राजनैतिकदृष्ट्या एकत्र आणण्याचे महान कार्य आर्य चाणक्यांनी केले, तसाच विचार आधुनिक भारतात आपल्या नेत्यांनी केला व त्यात अग्रणी भुमिका व जबाबदारी घेणारे नेते "लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल " हे होते.
अनेक लोकांना असे वाटते कि आपला देश जो आज असा एकसंध आहे तो इंग्रजांमुळे. परंतू वास्तव हे नाही. जेव्हा इंग्रज भारताला सोडून जाणार होते तेव्हा त्यांनी ज्या-ज्या योजना प्रस्तुत केल्या त्यात मुस्लिम लीग ला अवास्तव महत्त्व देऊन भारताचे तुकडे पाडण्याचाच घाट त्यांचा होता. मोहम्मद अली जीनांचा आडमुठेपणा भारताची फाळणी निश्चित करत होता तसेच इंग्रजांच्या योजना देशातील संस्थानिकांना स्वातंत्र्य देऊन भारताचे अनेक तुकडे पाडण्याचे मनसुबे तयार करत होत्या. हा कुटील डाव सरदार पटेलांना कळला होता आणि म्हणून ते आधीपासूनच सर्व संस्थानिकांना भारतात सामील होण्याचे आवाहन करत होते. सरदारांचे राष्ट्रहिताचे विचार त्यांच्या भरदार वाणीतून ऐकूण खुप संस्थानिक राजांना भारतात सामील होण्यासाठी विश्वास निर्माण झाला. सरदारांची भाषा अतिशय नम्र होती मात्र आपल्या भूमिकेवर ते तेवढेच ठाम सुद्धा होते. ते संस्थानिक राजांना, नवाबांना सांगत होते कि तुम्ही आता जर भारतात सामील झालात तर तुमचा यथायोग्य मानसन्मान राखला जाईल , देशहिताचे कार्य करण्याची संधी तुम्हाला मिळेल परंतू तुम्ही आता सामील नाही झालात तर नंतर तुम्हाला व्हावेच लागेल परंतू मानसन्मान तुम्हाला मिळणार नाही. आधी नम्रता आणि मग न ऐकल्यास राष्ट्रहितासाठी कणखरता या दोन्हींचा उपयोग सरदारांनी केला. खुप सारे संस्थान तर भारतात सामील होण्यासाठी रांगेतच लागले हे सरदार पटेलांच्या कुटनीतीचे यश होते. याचे विशेष म्हणजे त्यांनी रक्ताचा एक थेंबही यासाठी सांडला नाही.
भोपाळ, जुनागढ, हैद्राबाद सारख्या संस्थानांनी आडमुठेपणा दाखवला परंतू तरी सरदार डगमगले नाही त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा निर्णय घेऊन प्रसंगी आर्य चाणक्यांसारखा साम, दाम, दंड आणि भेद या सर्व मार्गांनी या संस्थानांना अखंड भारतात सामील करून घेतले. जुनागढ ला लोकांचे सार्वमत घेतले तर हैद्राबादला लष्करी कार्यवाही करून, अॉपरेशन पोलो करून तेथल्या रझाकारांना व त्यांच्या निजामाला १०८ तासांत शरण आणले, भारतीय सैन्याचा तो भीमपराक्रम होता. निजाम शरण आल्यानंतर त्याच्याशी सरदारांनी अतिशय नम्रतेने व्यवहार केला आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन साऱ्या जगाला घडवले याने निजामही भारावून गेला. हैद्राबादला भारतात जोडून सरदारांनी भारताचे खंडित राष्ट्र होण्यापासून वाचवले अशाप्रकारे सरदारांनी भारताला भू-राजनैतिकदृष्ट्या एकत्र करण्याचे महान कार्य केले. काश्मीरमधे पाकिस्तानी घुसखोर टोळीवाल्यांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा तातडीने निर्णय घेऊन , काश्मीरला दळणवळणाची मुख्य व्यवस्था निर्माण करून व लष्कर पाठवून काश्मीरला पाकिस्तानच्या घशात जाण्यापासून सरदारांनी वाचवले हे फार महान राष्ट्रकार्य सरदार पटेलांच्या हातून झाले. माऊंटबॕटन यांनी भारत सोडत असतांना सरदारांना एक पत्र लिहिल आणि त्यात ते म्हणतात, "भारताचं एकीकरण झालं नसत तर तुमच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला असता. तुमच्या सरकारची हि सर्वोच्च कामगिरी आहे." अशाप्रकारे एकसंध देश ऊभा करण्याची अजोड कामगिरी सरदारांनी करून दाखविली होती.
गांधीजींचे एक सहकारी आचार्य काका कालेलकर यांना सरदार पटेलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तीमत्वाचा भास व्हायचा. सरदार आणि लोकमान्य टिळकांची शरीरयष्टि बळकट होती व चेहरा करारी होता. स्वच्छ चारित्र्य , कणखर मन, धाडस, अविचल निष्ठा, साधी राहणी, त्याग आणि कष्टमय जीवन हे दोघांचं समान वैशिष्ट्य. सरदार पटेल हे शिवाजीमहाराजांप्रमाणे लढवय्ये होते आणि त्यांच्यासारखेच नेतृत्वगुणहि त्यांच्यात होते. सरदार पटेलांचा चेहरा जसा करारी होता तसेच त्यांच्या अंतर्मनात कमालीची विनम्रता होती.राष्ट्रहित करणाऱ्या लोकांचे ते मित्र होते तर राष्ट्रद्रोह्यांचे तेवढेच विरोधक शत्रू.
गांधीजींचे सच्चे सेनापती म्हणून सरदार शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहिले. गांधीजींचे विचार ते मानत असत परंतू जर एखादा विचार जर पटला नाही तर ते त्याला सरळ विरोध करत असत. गांधीजी व पटेलांमध्ये अनेक विचारांवर मतभेद होते मात्र त्यांच्यात मनभेद कधीच झाला नाही. १५ पैकी १२ काँग्रेस प्रदेश समित्यांचा पाठिंबा असल्यावर सुद्धा सरदारांनी गांधीजींच्या एका शब्दावर पंतप्रधान पदाच्या दावेदारीतून माघार घेतली होती. देशहितास्तव कुठलाही त्याग करणाऱ्या एका सैनिकासारखे सरदार वल्लभ भाई पटेल होते. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रहित सर्वोपरी हाच त्यांचा मंत्र होता. आपल्या एवढ्या मोठ्या हिंदुस्थानाला अखंड जोडणारे व देशात सर्वांमध्ये एकत्वाची भावना निर्माण करणारे सरदार पटेल हे खऱ्या अर्थाने भारताचे "लोहपुरूष" होते. सरदारांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन....
©️ विश्व संवाद केंद्र, देवगिरी
4 टिप्पण्या
.. त्यांच्या स्मृतीला अभिवादन!
🌹🙏🌹