शहाद्यातील स्वातंत्र्यसंग्राम - खानदेशातील पहिला हुतात्मा तुळशीराम


           होळकरांबरोबर मंदसौरचा तह झाल्यानंतर ब्रिटिशांनी खान्देशचा प्रदेश ताब्यात घेण्यास सुरुवात केली. इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लाॅप याच्यावर ही जबाबदारी होती. शिरपूर जवळील थाळनेर येथील किल्ला मात्र इंग्रजांना सहजासहजी मिळाला नाही. त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला.  थाळनेरच्या किल्ल्याचा किल्लेदार तुळशीराम याने इंग्रजी सैन्याशी प्राणपणाने लढा दिला. किल्ल्यामध्ये असलेल्या तोफांच्या मदतीने इंग्रजी सैन्यावर हल्ले सुरू केले. या लढाईत बरेच इंग्रजी सैन्य कामी येऊ लागले. त्यामुळे हिस्लाॅप अधिकच चिडला व त्याने किल्ल्याच्या दरवाजासमोर तोफांनी मारा सुरू केला. या माऱ्यात किल्ल्याचे दोन्ही दरवाजे फुटले व इंग्रजी  सैन्याने आत प्रवेश केला. 

         तिसऱ्या दरवाज्यापाशी मात्र इंग्रजांना घनघोर लढाईचा सामना करावा लागला. किल्ल्यामध्ये असलेल्या 300 अरब सैन्याच्या तुकडीच्या मदतीने किल्लेदार तुळशीराम याने इंग्रजांशी प्रतिकार केला. शेवटी किल्लेदार तुळशीराम याने आपला पराभव मान्य केला. इंग्रजांनी त्याला कैद करून मार्शल कोर्टात त्याच्यावर खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली. थाळनेरच्या एका बुरुजावर सर्वांसमक्ष तुळशीराम याला २७ फेब्रुवारी १८१८ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. 


        तुळशीराम हा आपल्या सत्तेशी एकनिष्ठ होता, प्रामाणिकपणे त्याने इंग्रजी शत्रूंपासून किल्ला वाचवला हाच त्याचा गुन्हा(?) होता. स्थानिक लोकांमध्ये इंग्रजांविषयी भीती निर्माण करणे, दहशत निर्माण करणे हा या फाशी मागील उद्देश होता. तुळशीराम खानदेशातील पहिला हुतात्मा ठरतो.

आधार- प्राचार्य डॉ. जी. बी. शहा, खानदेश मधील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास.
छायाचित्र सौजन्य गुगल - थाळनेरचा किल्ला 

लेखन - श्री पुष्कर शास्त्री, शहादा

Published by - विश्व संवाद केंद्र, देवगिरी 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

अनामित म्हणाले…
अमर हुतात्मा तुळशीराम