नरकचतुर्दशी: मातृशक्तीचा सन्मान करणारा ऐतिहासिक दिवस



आज नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामाच्या मदतीने सज्जन शक्तीवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या नरकासुराचा वध केला, तो दिवस. ह्याच दिवशी सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराच्या बंदीगृहातील स्त्रियांना मुक्त करून सन्मानित केले. कोणतीही बंदिवान स्त्री अथवा व्यक्ती ही केवळ दुर्जनांच्या सहवासात आल्याने त्याज्य, अपवित्र होऊ शकत नाही, हा संदेश समाजाला दिला. 

भागवत पुराणात या घटनेचे वर्णन आले आहे. राजा परीक्षिताला शुकदेवांनी ही घटना सांगितली होती. नरकासुराने आपल्या बंदीखान्यात हजारो स्त्री- पुरुष व बालकांना बंदिस्त करून ठेवले होते. शिवाय देवी आदीतीचे कुंडल, वरुणराजाचे छत्र व मणीपर्वतावर कब्जा केला होता. असुरांतर्फे लोकांवर प्रचंड अत्याचार सुरू होते. स्त्रियांचे शील भ्रष्ट करण्याचे दुष्कर्म देखील असुर करीत होते. 

इंद्र देवांनी ही माहिती सांगितली तेव्हा भगवान श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामा तिथेच होती. नरकासुराच्या अत्याचाराच्या वार्ता ऐकून श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करण्याचे ठरवले. मातृशक्तीला पीडा देणाऱ्या दैत्याचा वध करण्यासाठी श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामा हिला सोबत घेतले होते. नरकासुराच्या प्रागज्योतिष राजधानीवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या युद्धात श्रीकृष्णाने तेथील शक्तिशाली दैत्य मुर व त्याच्या सात पुत्रांचा वध केला व नंतर नरकासुराचा (भौमसुर) घनघोर युद्धात वध केला. 

यानंतर नरकासुराने कैद केलेल्या सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. त्यात हजारो स्त्री कैदी होत्या. नरकासुराचा वध करून आपल्याला मुक्त करण्यासाठीच भगवान श्रीकृष्ण आले आहेत हा विश्वास त्यांच्या मनात होता. श्रीकृष्णाच्या विजयाने बंदीशाळेत मोठा आनंद पसरला. सर्व बंदी, पीडित स्त्रियांनी तर श्रीकृष्णाला मनोमन आपला पती मानून टाकले होते. 

श्रीकृष्णांनी जेव्हा युद्ध जिंकून राजवाड्यात प्रवेश केला तेंव्हा त्यांना अश्या हजारो कैदी स्त्रियांचे दर्शन झाले. श्रीकृष्णाला पाहून त्या स्त्रियांचे डोळ्याचे पारणेच फिटले. त्यांनी श्रीकृष्णाकडे आपल्या मनातली अतीव इच्छा बोलून दाखवली. हा समाज आम्हाला स्वीकारणार नाही. आम्ही आता पतित झालो. आम्ही सर्वांसाठी त्याज्य झालो अशी त्यांच्या मनात भीती होती. ही भीती निरर्थक मुळीच नव्हती. तेव्हा आपली पत्नी देवी सत्यभामा हिच्या समक्ष श्रीकृष्णाने त्या सर्व सोळा सहस्त्र शंभर स्त्रियांचा पत्नी म्हणून स्वीकार केला व त्यांचा पूर्ण सन्मान करून स्वीकार केला. तसेच त्यांना पालख्यात बसवून द्वारकेला पाठवून दिले.  

असुरांच्या स्पर्शाने कोणी व्यक्ती हीन पतित होत नाही. मानवता श्रेष्ठ आहे, स्त्री शक्ती पावन आहे असा संदेश त्यांनी या कृतीतून दिला. मथुरेचा राजा आणि अवघ्या सृष्टीचा पालनकर्ता श्रीकृष्ण या स्त्रियांना स्वीकारू शकतो, मग आपण का नाही?माता भगिनींना या दिवशी स्त्रीला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाली. म्हणून स्त्रीशक्तीचा सन्मान म्हणून या दिवसाचे खास महत्व आहे. तो दिवस आपण दिवाळी म्हणून साजरी करतो. म्हणूनच दिवाळीचा उत्सव जसा प्रकाशाचा उत्सव आहे, तसाच तो पराक्रमाचा व शक्ती सन्मानाचाही आहे हा यातील संदेश आहे.

संदर्भ - श्री महर्षी व्यास रचित भागवतपुराण

लेखन - श्री निजानंदशास्त्री जोशी, नांदेड

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

© विश्व संवाद केंद्र, देवगिरी
_______________________________________________
राष्ट्रीय विचारांची सत्य , स्पष्ट व योग्य माहिती मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला Like व Follow करा. 
https://www.facebook.com/vskdevgiri/ 
________________________________________________

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
असहाय्य पिडीत स्त्री बद्दल उद्धारक माहिती दिल्यामुळे सामाजिक गैरसमज अज्ञान दूर होतात
धन्यवाद 🙏